श्री बायजी मानसपूजा

नमो देवै महादेवै शिवायै सततं नम:
नम: प्रकृत्यै भद्रायै नियत: प्रणत:स्मताम्

सर्वमंगल मांगलै शिवे सर्वार्थसाधिके
शरण्यै त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते

करण्या मानस पूजन | शांत निर्मळ करुनि मन |
जानकीची प्रतिमा समोर आणून | सुस्वागत केले मनोमनी || १ ||

ह्रुदयस्थ कल्पिले सिंहासन | सुवर्ण-रत्नजडित छान |
मी तिज बैसविले विनवून सुहास्यवदने पाहतसे ..२

येई येई गे माऊली तुझी वाट किती मी पाहिली
सारी गात्रे अधीर झाली दर्शन तुझे घ्यावया ..३

आदरे बैसविले सिंहासनी वारंवार वंदने करुनिं
विंझण घातले स्वकरांनी श्रमपरिहार कराया ..४

सुवर्णपात्र घेतले करी पदयुग्म ठेविले त्यांचे वरि
शिर ठेविले चरणावरी जय जानकी म्हणोनियां ..५

विविध सुगंधित तेलांनी पदप्रक्षालन केले मनी
ते पुशिले मी स्वकरांनी हळुवारपणे सावकाश ..६

गोरस दधि-धृत मधुशर्करा पंचामृत
सर्व करोनियां मिश्रित पूजनास मी प्रारंभिले ..७

गंगा यमुना गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी
चांदीच्या भरोनियां घागरी पूजनासाठी कल्पिल्या ..८

केशरमिश्रित उटी घेऊनी पदयुग्मास दिली चर्चुनी
एकैक पवित्र जलाने अभिषेक मनी आरंभिला ..९

सुवर्णपात्र घेतले भरोनी हर गंगे नर्मदे म्हणूनि
पदयुग्मावर घातले भरभरोनी अति हर्षुनियां अंतरी ..१०

चरणतीर्थ केले प्राशन स्वशरिरी केले प्रोक्षण
करावया पापक्षालन मी प्रार्थिलेंसे तिजला ..११

शालु रेशमी दिला सुंदर चोळी त्या साजेसी रंगदार
शाल घातली मी अंगावर पुन्हा बैसविले सिंहासनी ..१२

ऐसें वस्त्रातें देऊनी कुंकुम अक्षता भाळी लावुनी
केसांची बांधावया वेणी फणी सुंदर दिली करांत ..१३

बहुविध सुगंधित पुष्पांनी शमी बिल्वादिक गुलाबांनी
मोगरा चंपक गुंफोनी पुष्पमाला घातल्या ..१४

भांगी भरला शेदुर लाविला हिना, केवडा, अत्तर
नथ नाकांत दिली सुंदर तिज प्रिय असे म्हणोनियां ..१५

कल्पिले सुवर्णालंकार गळी माणिकमोत्यांचे हार
बाजुबंद दिले नागाकार कंबरपट्टा नक्षीदार ..१६

पायी तोरड्यांचा झंकार जोडवी पदांगुलीत सुंदर
घातले विविध अलंकार नखशिखांत माऊलीला ..१७

धुप-दिप दिले उजळोनी शुद्ध प्रेम-भावें भरोनी
आरती करितसे मनोमनीं जय जय जानकी म्हणोनियां ..१८

जय जानकी दुर्गेश्वरी अनंत नमने चरणांवरी
जन्म घेतला भूवरि जड मूढ उद्धराया ..१९

जे त्रिविध तापें पोळले त्यांवरिच तुम्ही प्रेम केले
दु:ख तपादि हरिले सुखी केलें भक्तजनां ..२०

जे तव पदकमलीं रमले त्यांना तुम्हींच हो तारिलें
उच्च नीच न पाहिले समदृष्टिने सांभाळिलें तयांना ..२१

तरी हे करुणाघन माऊली तव पूर्ण कृपेची सावली
मानसपूजेनें लाभली ती शिरीं राहो निरंतर ..२२

ऐसें करितां गुणगायन अष्टभाव आले दाटून
माऊलीचे धरुनियां चरण आनंदाश्रुंनी धुतले मी ..२३

आतां भूक लागली म्हणून सुवर्णाचें ताट घेतले कल्पून
षड्रस परिकर पक्वान्न मिष्टान्न वाढीले मनोमनीं ….२४

स्वकरे भरविला गोड घांस जेवण्यास कथिले सावकाश
जें जें आवडले माऊलीस तें तें आग्रहाने वाढलें ..२५

उशीर झाला म्हणून क्षमा घेतलीसे मागून
शेष मजकरीं दिले उचलोन प्रसाद म्हणूनी भक्षिला ..२६

ऐसें प्रेमें केल्या भोजन आणि करितां मुखप्रक्षालन
तांबूल श्रीफळ देऊन सुवर्ण दक्षिणा दिल्या मी ..२७

रत्नदीपांची पंचारती घेऊनी मनोभावें तिज ओवाळूनी
प्रदक्षिणा सावकाश करोनी लीन झालो तिचे पायी ..२८

आतां केलें गायन भजन जय जगदंबे जानकी म्हणून
तुमचें कराया गुणगायन स्फुर्ति द्यावी मजला ..२९

तूं लावण्यमयी, तारुण्यमयी तूं कारुण्यमयी, चैतन्य-मयी
तूं कल्याणमयी, आनंदमयी तूं कल्पनातीत, ज्योतिर्मयी ..३०

तूंच परा मध्यमा, पश्यंती आद्या, वेदगर्भा शारदा भारती
जगदव्यापिनी, सर्वा शुक्ला वीणावती वागीश्वरी. प्रज्ञा, ब्रह्मकुमारी ..३१

सर्व जगाचें करितसे धारण पोषण तूंच ती महादेवी जाणून
चरणी अनंत करितो नमनें कल्याणमयी शिवे तुला ..३२

तूंच वसशी दृष्य-अदृश्यांत तैसीच स्थूळ-सूक्ष्मरुपांत
ऐशा चित्शक्तीचे रुपांत विश्व-विश्वेश्वर व्यापिला ..३३

तरी आम्हांस द्यावे अभयदान अमृत दृष्टिने न्याहाळून
भवसागर जाया तरुन चरणी ठाव द्यावा निरंतर ..३४

ऐसे माऊलीला आळवून भावपुष्पांजली अर्पून
प्रदक्षिणा भोंवताली करुन मानसपजा पूर्ण केली ..३५

मस्तक ठेवितां चरणावरी तो अभयकर ठेविला शिरावरी
म्हणे संतुष्ट जाहले तुजवरी सेवा गोड स्वीकारली ..३६

सदभक्त माझा होशील तुज पूर्ण गुरुकृपा लाभेल
सर्व सौख्यें मिळतील आशीर्वाद आहे निरंतर ..३७

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*