सावली अध्याय ११ वा

।। श्री ।।
।। अथ एकादशोऽध्याय: ।।
श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदैवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

संसाराच्या सारिपटावर । डाव मांडिला जीवनभर । सरशी होऊनियां सत्वर । पुढें पुढें तो चालतसे ।।१।।

मनासारिखे फांसे पडती । सोंगट्या पुढें पुढें सरकती । इच्छांची होई परिपुर्ती । जानकीच्या तेधवा ।।२।।

वत्सलेचा विवाह केला । तारेलाही पती लाभला । सौभाग्य लाभे चिमणेला । संसारांत परिपूर्ण ।।३।।

लाडकी कन्या कुसुम । तिजवरी अत्यंत प्रेम । जानकीचा पूर्ण विश्राम । पूर्ति होती जीवनाची ।।४।।

तिज बैसवोनि संसारीं । सर्व सूत्रें ठेवी स्वकरीं । म्हणे चालावे तूं वजिरापरी । सारीपाटावर आपुल्या ।।५।।

सारीपाट चालावा नीट । म्हणोनि प्रेमें असे अर्पीत । भगवदगीतेची चिमुकली प्रत । वरातीचिये समयी तिला ।।६।।

श्रध्दा ठेवावी धर्मावर । त्यागांत चालवावा संसार । अनन्य भावें चरणांवर । शरण जावें श्रीहरीच्या ।।७।।

इतुका अर्थ जरी जाणून । संसारी वागशील जाण । जीवनीं यश संपादून । सुखी होशील लाडके ।।८।।

याची स्मृति रहावी चिरंतन । यास्तव ‘ गीता ‘ दिली प्रसाद-खूण । नित्य तिचें दर्शन घेऊन । संसारारंभ करावया ।।९।।

ऐसें तिज बैसविलें संसारांत । तो कालाही उपवर होत । पुढें तिलाही सौभाग्य अर्पीत । मनासारिखें मिळवूनि ।।१०।।

तिचे मंगल कार्याकरितां । सर्व एकत्र जमले असतां । कार्य उरकोनि निश्चिंतता । पावली असे जानकी ।।११।।

सहज बैसली अंगणीं । निवांतपणें गोष्टी करोनि । कुसुमला सांगे विनोदानी । अशीच ती एकदां ।।१२।।

म्हणे तुम्हीं न पाहिलें मरण । कधीं सौभाग्यवतीचे जाण । काय विधि असतो जाणून । घ्यावा म्हणून सांगते ।।१३।।

मनुष्याच्या जीवनांत । संकटे येती असंख्यात । म्हणोनि जाणावें नित्य । व्यवहार सर्व प्रसंगीं ।।१४।।

जरी सुवासिनींचे आलें मरण । तिज अभ्यंगस्नान घालून । वाण सुवासिनींचे देऊन । चुडासाडी नेसवावी ।।१५।।

तैं कुसुम जाई संतापून । म्हणे मज न वाटे घ्यावें जाणून । महत्व न द्यावे विनाकारण । कल्पनेतल्या गोष्टीला ।।१६।।

तेव्हां जानकी सांगे हंसून । समज मलाच आलें कीं मरण । म्हणोनि ठेवितें सांगून । तुला, काय करावयाचें ते ।।१७।।

चुडा साडी ठेविली पेटींत । ओटीचा नारळ आहे सोबत । सर्व नेसवावें अंगावर । प्रसंग कधीं आलिया ।।१८।।

सुवासिनीचें करावें पूजन । तेरावा दिन येतां जाण । जो जो येईल दर्शनाकारण । भोजनास त्या बैसवावें ।।१९।।

तेव्हां कानावर ठेवुनि हात । कुसुम उठोनियां जात । म्हणे मज हें न ऐकवत । विचित्र तुझें बोलणें ।।२०।।

ऐसें विनोदांतले संभाषण । अर्धवट राहिलें तेथून । सर्व जाती गणदेवीहून । आपापल्या घरी तेधवां ।।२१।।

असो, एकदा चिमणेच्या घरी । तिचे पतीच्या बरोबरी । एक मांत्रिक आला घरीं । मित्र म्हणोनि सहज ।।२२।।

त्याला जादूटोणा अवगत । त्या विद्येंत होता पारंगत । कर्णपिशाच्च होतें सेवेंत । जेठालाल पुराणीच्या ।।२३।।

लोकांत होता प्रसिध्द । मांत्रिक म्हणोनि ओळखत । जादू दाखवी असंख्यात । आश्चर्य पावतीं सकळजन ।।२४।।

ज्योतिष सांगे आपण । हात दुसर्‍यांचा पाहून । अथवा मुख अवलोकुन । भविष्य वर्तवी तयांचे ।।२५।।

चिमणाबाईस सांगे म्हणून । कीं हात द्यावा पाहून । परी ती सांगे नाकारुन । मी न दाखवी कुणाला ।।२६।।

तेव्हां तिचें मुख अवलोकुन । तिज विचारीतसे प्रश्न । की दैवी शक्ती येते दिसून । तुमच्या आईमध्यें मजला ।।२७।।

जरी सत्य गोष्ट असेल ही । तरी मी दर्शनास जाईनही । परी मज भेटतील कीं नाहीं । सांगावें त्वां झडकरी ।।२८।।

तेव्हां चिमणा सांगे हंसून । जो जाईल श्रध्दा ठेवून । त्याला ती भेटते जाण । नि:संकोचपणे जावें तुवां ।।२९।।

तें जेठालाल गेला गणदेवीस । केवळ जानकीच्या दर्शनास । तिज पाहोनिया चरणांस । साष्टांग नमन घातलें ।।३०।।

म्हणे मज केवळ तारण्यास । समर्थ एकटी तूं आहेस । मीं शरण आलों पायांस । रक्ष रक्ष मजला गे ।।३१।।

मी विद्या शिकलों मलीन । कर्म केलें स्मशानांतून । पिशाच्च केलें आधीन । मंत्रविद्येनें माझिया ।।३२।।

कुमारिकांचे केले बलिदान । कुकर्मांत रमलों आपण । पुढे गुरु गेला सोडून । अपूर्ण राहिलो विद्येंत ।।३३।।

पुढें न जाऊं शके आपण । मागें न येऊ शके परतून । मधल्या मध्येच अडकून । राहिलों असे आज मीं ।।३४।।

सर्वांगाची होते लाही । परी कोणी न सोडवी मलाही । केवळ तुझीच कृपा लवलाही । मज मुक्त करु शकेल ।।३५।।

तेव्हां जानकी सांगे पुराणीला । तू अर्धवटची राहिलास । पूर्ण पारंगत न जाहलास । आपुल्या या विद्येंत ।।३६।।

मी तुज करीन मार्गदर्शन । तू विद्या करावी परीपूर्ण । नंतर करावें विसर्जन । यज्ञामध्यें तियेंचे ।।३७।।

ऐंसें करितां तूं विसर्जन । तुझे दोष जातील जळून । तूं मुक्त होशील वचनांतून । गुरुपासून आपुल्या ।।३८।।

पुन्हा या मार्गात न पडावें । भक्तिमार्गास आचरावें । कल्याण जीवनाचें साधावें । मनुष्य जन्मा येऊनि ।।३९।।

तेव्हां तो अश्रुभरल्या नयनी । म्हणे मज घ्यावें उद्धरोनि । तयारी करितों यज्ञाकारणीं । जीव उतावीळ जाहला ।।४०।।

जानकी पंचांग देई आणून । म्हणे बघावें तू यांतून । चैत्र अष्टमीचा शुभदिन । केवळ योग्य आहे त्यासाठी ।।४१।।

हा एकच आहे शुभ दिन । कार्यसिध्दीचें साधन । नंतर न येईल घडून । ऐसी शुभसंधि कधींच ।।४२।।

पुढील चैत्रनवमीला । आम्ही जाऊ कैलासाला । भरदुपारचे समयाला । रामनवमीच्या शुभदिनी ।।४३।।

ही तारीख लिहावी पंचांगांत । गुप्तता राखावी स्वमुखांत । गौहत्येचे पाप लागत । गौप्यस्फोट केलीया ।।४४।।

तेव्हां पुराणी बोले दीनवचन । माते, अल्पसमय आहे म्हणून । त्वरीत करावे मार्गदर्शन । पुढील कार्यसिध्द व्हावया ।।४५।।

तेव्हां पुढील प्रयोग सांगून । योग्य मार्गदर्शन करुन । विद्या करुन घेतली पूर्ण । त्याचे कडून स्मशानांत ।।४६।।

तैं उजाडला शुभदिन । चैत्र अष्टमी आली म्हणून । यज्ञ आणिला घडवून । जेठालालचे हातून ।।४७।।

चैत्राच्या या उत्सवांत । भक्त येती असंख्यात । दर्शन घेण्या गणदेवींत । दूरदूरच्या गांवांचे ।।४८।।

सर्व आप्तगोत जमती । त्यांना यज्ञाची होती माहिती । आशिर्वाद घेण्यास येती । तेच दिनीं गणदेवींस ।।४९।।

जेठालालच्या हातून । असंख्य आहुती देऊन । विद्या केली विसर्जन । यज्ञामध्यें जानकीनें ।।५०।।

कोहळा देती बळी म्हणून । सुरी फिरवितां देहावरून । लाल रक्ताची धार लागून । यज्ञकुंडात पडतसे ।।५१।।

सर्व आश्चर्यचकित झाले । कैसें कोहळ्यातून रक्त निघालें । परी कोणा न कारण कळलें । गौडबंगाल यज्ञाचें ।।५२।।

यज्ञाची झाली पूर्णाहुती । पुराणीस मिळे विद्यामुक्ती । मनास लाभे परम शांती । दास जाहला चरणींचा ।।५३।।

जे भक्त दर्शनास येती । जानकीचा आशीर्वाद घेती । प्रसाद भोजनही करिती । स्वगृहा जाती आनंदानें ।।५४।।

असो, ऐसे मासामागुनी मास गेले । पुन्हां चैत्राचे दिवस उजाडले । वसंताचें आगमन झालें । धरा सुमनसौंदर्यें बहरली ।।५५।।

परीं फुलांत नव्हता सुगंध । शिशीर येतां रेंगाळत । उभे वृक्ष पर्णें गाळत । ग्रीष्माच्या आठवणीनें ।।५६।।

जरी देवीचें चालें पूजन । परी मुख तिचें दिसे म्लान । कोणा न कळें कार्यकारण । खिन्नता दाटें मनांत ।।५७।।

जरी पूजा होती स्वीकारीत । परी चित्त नव्हतें देहांत । कोठेंतरी तें भिरभिरत । लक्ष होतें शून्याकडे ।।५८।।

ज्याची वाट होती पाहत । तो दूत आला धांवत । म्हणे सर्व सिद्धता आहे स्वर्गात । आगमनाची केली असे ।।५९।।

ब्रह्मा, विष्णू, महेश्वर । देवगंधर्व, ऋषिश्वर । लक्ष्मी, सरस्वती सत्वर । पार्वतीसह पातल्या ।।६०।।

सभेंत बसती सर्वजण । म्हणे जानकी करील स्वर्गारोहण । तिच्या स्वागताकारण । जाणें असे सर्वांना ।।६१।।

तिचे कोणीं करावें स्वागत । यांत ठराव झाला संम्मत । प्रभु रामचंद्राला करिती नियुक्त । धरतीवरुन आणावया ।।६२।।

म्हणे चैत्र शुद्ध नवमीला । तुम्हीं पृथ्वीवरी अवतरला । साजरी करिती उत्सवलीला । धरतीवरी मंदिरांत ।।६३।।

म्हणोनी जावें तुम्ही पृथ्वीवर । जानकीस आणावें बरोबर । तिचा अधिकार आहे थोर । जगदंबा ह्रदयी विराजेल ।।६४।।

असंख्य तारे लखलखतील । मुनी वेदघोष करतील । गण गंधर्वही करतील । स्तुती स्तोत्रांनी स्वागत ।।६५।।

आम्हीं सामोरे जाऊ सीमेवरी । जेव्हा जानकीची येईल स्वारी । ऐरावत पाठवूं स्वर्गदारीं । तुम्हां सहीत घ्यावया ।।६६।।

देवी, देव, चौसष्ट योगिनी । तिज ओवाळतील सुवासिनी । असंख्य दीपज्योती घेऊनी । त्रिभुवनीं करितील आरती ।।६७।।

तिचें करावया पूजन । आतुरले स्वर्गी सारेजण । जानकीसारखे संतजन । प्राण असती ईश्वराचें ।।६८।।

दूताचें ऐकून निवेदन । देवीचें ह्रदय आलें भरुन । नीर वाहे नयनांतून । खंड न पडे मुळींच ।।६९।।

म्हणे बालपणीं जानकीस । आपण वचन दिलें खास । कीं स्वर्गसुख सहवास । तुज लाभेल की अंती ।।७०।।

तिचें कार्य झालेसे पूर्ण । वचनास जागावें आपण । म्हणोनि देई दिव्यदर्शन । चैत्र अष्टमीला जानकीस ।।७१।।

उभी राहिली समोर । नयनांतून झरे नीर । कोमजलेले मुख सुंदर । वंदन करीती झाली ।।७२।।

तिज पाहता जानकीनें । आलिंगन दिले प्रेमानें । परी मुखावर पाहतां प्रश्नचिन्हें । उभी राहिली समोर ।।७३।।

कां मुख जाहलेंसे म्लान । काय घडलेंसे कारण । धैर्याचें खचते धीरपण । हें तों कधी न पाहीलें ।।७४।।

तें जगदंबा बोले हांसून । हात अंगावरी फिरवून । तिचें चुंबन घेऊन । म्हणे माझ्या लाडके प्राणप्रिये ।।७५।।

या पृथ्वीवरील सहवास । अल्प राहिला तुम्हांस । उदईक जाणें स्वर्गास । रामनवमीच्या शुभदिनीं ।।७६।।

स्वत: प्रभू रामचंद्र येतील । ते तुमचें स्वागत करतील । सवें तुम्हा घेऊन जातील । भर दुपारच्या समयाला ।।७७।।

तुम्हीं जाल स्वर्गात । माझा तुटेल सहवास । माया जडलीसे बहुत । म्हणुनी लोचन पाणावले ।।७८।।

तेव्हां जानकी बोलें हंसून । मायाच न सोडी मायेस जाण । हें तों अभिनव आलें दिसून । प्रेम अपार माझेवरी ।।७९।।

परी माझी पूर्ण आहे तयारी । संसारमाया आवरिली सारी । तुम्ही कष्टी न व्हावें मनांतरी । सिद्ध असे मी आनंदानें ।।८०।।

जानकीचें हे संभाषण । आसमंतात पसरलें जाण । देवादिक येती दर्शनाकारण । पृथ्वी सभोंवतालचे ।।८१।।

सर्व नद्या आल्या धांवत । गंगा, नर्मदा, सिंधू येत । तापी, कृष्णा, गोदावरी येत । कलश आणिले भरोनी ।।८२।।

नवमीचे सकाळ पासोनी । धांवपळ येई दिसोनी । जानकीस घालिती स्वकरांनी । अभ्यंग स्नान सार्‍या जणीं ।।८३।।

स्नानें उद्धरती पापीजन । तेणें कलुषित होतें जीवन । नद्या घालितीं संतां स्नान । पावन स्वत: व्हावया ।।८४।।

सर्व नद्या भारतांतल्या । चरणतल धुण्या पातल्या । आळीपाळींने बैसल्या । सुवर्णकलश घेऊनी ।।८५।।

जिला खेळविले अंगावरुन । तिचें न पहावे स्वर्गारोहण । म्हणोन धुके जणूं पांघरुन । सृष्टी गुरगुटून बैसली ।।८६।।

जरी वसंत होता वावरत । तरी वृक्षपर्णे होती गळत । वाटे मूक अश्रूच ते गाळत । फुलेंही जाती कोमेजून ।।८७।।

परी रवी उगवला ते दिनीं । काहीं वेगळाची भाव जाणोनि । संपूर्ण सृष्टी खडबडोनी । जागी जाहली तेधवां ।।८८।।

प्रखर सूर्याच्या किरणांनी । पायघड्या दिल्या घालोनि । खगोलापासूनी धरणीपर्यंत । वाट ती उजळली ।।८९।।

धरतीवरी मंदिरांत । कीर्तनें येती रंगांत । श्रीराम जयरामचे गजरांत । जयघोष चाले सर्वत्र ।।९०।।

जन्मोत्सव चाले मंदिरांत । तैसे प्रभु स्वर्गातुनी उतरत । रथांत बैसोनियां येत । किरण पथावरुन सूर्याच्या ।।९१।।

सप्त अश्व होते रथास । सुवर्णाचा बनविला होता खास । हिरे माणिकें पांचूस । नक्षिदारपणें लाविले ।।९२।।

चवर्‍या ढाळिती देवदूत । उभे होते रथासंगत । मध्यें प्रभु राम बैसत । रथ आला अंगणीं ।।९३।।

सुस्वर होते वाजत । गंधर्व-गण होते गात । संत मेळा जमला अंगणांत । जयजयकार करिती उच्च स्वरें ।।९४।।

प्रभु उतरलें रथांतून । तों जानकी आली घरांतून । एकमेकां सामोरे जाऊन । आलिंगले परस्परां ।।९५।।

जैसे प्रभु देती आलिंगन । जानकीचा प्राण निघे तेथून । देह धरणीवर सोडून । चाललीसे स्वर्गात ।।९६।।

टाळ मृदुंगांच्या आवाजांत । शंखनादाच्या घोषांत । रथ तेथोनियां निघत । स्वर्गवाटेने चाललासे ।।९७।।

तिचें हें स्वर्गारोहण । पहावया जमले देवगण । विमानांत उभे राहून । सोहळा बघती आनंदाने ।।९८।।

पृथ्वीवरुन येती संतजन । त्यांचे घ्यावें दर्शन । दुर्लभ देवाहूनी जाण । आम्हांला असती ते ।।९९।।

रथ आला स्वर्गाचे दारांत । तेथें ऐरावत होता डोलत । लक्ष्मी-सरस्वती करांत । आरती घेऊन पातल्या ।।१००।।

ब्रह्मा, विष्णु, महेश्वर । चौसष्ट योगिनी येती सत्वर । अप्सरा जमती सभोंवार । दर्शन घ्याया जानकीचें ।।१०१।।

जानकी ऐरावतावरी बैसत । सवें देवदेवी होत्या चालत । ऐसी मिरवणूक ती निघत । कैलासपदीं पातली ।।१०२।।

जेथें आदिमाया बैसली । तेथें ही मिरवणूक आली । जय घोषानें निनादली । स्वर्गसृष्टी तेधवां ।।१०३।।

जानकी उतरली ऐरावतावरुन । धांवत गेली दर्शनाकारण । परि ज्योतींत गेली विरुन । ज्योत प्रकाशांत आपुल्या ।।१०४।।

कोण जगदंबा जानकी कोण । दोघींचे जाहलें मीलन । आतां बाकी राहिलें शून्य । पृथ्वीवरील भक्तांना ।।१०५।।

जानकीचें हें स्वर्गारोहण । कोणीं साहूं न शके म्हणून । तिनें दूर ठेविले आप्तजन । कोणी नव्हतें जवळी ।।१०६।।

स्वत:स बरें नव्हतें म्हणून । सतरंजीवरी झोंपलीं आपण । दादा जवळ होते म्हणून । कळला तिचा स्वर्गवास ।।१०७।।

म्हणोनियां भक्तजन । आदरांजली वहावी नयनांतून । कल्पनाद्वारें स्वर्गारोहण । पाहिलें म्हणून धन्य व्हावें ।।१०८।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम एकादशोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*