सावली अध्याय १५ वा

।। श्री ।।
।। अथ पंचदशोऽध्याय: ।।
श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

जानकीची सुकन्या कलावती । तिचेवर होती बहुत प्रीति । कालेचीही होती अती भक्ति । आईवरी आपुल्या ।। १ ।।

बालपणीं बहुत । लाडानें पुरविले हट्ट । दर्शन कालिकेचें घडवित । अनन्य भक्ति पाहून ।। २ ।।

चुंदडी दिली प्रसाद म्हणून । जी प्रेमें ठेविली सांभाळून । नित्य घेतसे दर्शन । त्या स्मृतिरूप जननीचें ।। ३ ।।

आईची सेवा बहुत । केली होती बालपणांत । त्याचें फलही प्राप्त होत । संसारांत तियेला ।। ४ ।।

आई प्रत्यक्ष कुलदैवत । ऐसें बिंबलें मनांत । नाम सदैव राही मुखांत । गुणगान करितसे ।। ५ ।।

जो जो भेटेल भक्त । त्याला अभिमानाने सांगत । आईसारिखें श्रेष्ठ दैवत । नाहीं नाहीं हो जगांत ।। ६ ।।

परि या कन्या किती भाग्यवंत । भगवती ज्यांची जननी प्रत्यक्ष । जणूं कल्पवृक्षाला फळें येत । सुवर्ण-सुगंध योग जणुं ।। ७ ।।

जी कल्पवृक्षाची सावली । ती या सुकन्यांची माऊली । सर्व भाग्यें तिष्ठलीं । कर जोडुनि त्यांच्यापुढें ।। ८ ।।

येथें तुम्ही मज विचाराल । मग त्या सदैव सुखी असतील । दु:खे न त्यांना शिवतील । श्रीमंत सुख समृद्धींत ।। ९।।

श्रीकृष्णासारखा असतां साथी । पांडवांचे भोग न सुटती । द्रौपदीची झाली तीच गती । कृष्णासारखा बंधु असूनि ।। १० ।।

यावरून वाटते दैवगती । भोगलीच पाहिजे सर्वांनी । तेव्हांच ते मुक्त होती । संचितातून आपुल्या ।। ११ ।।

भोग ना सुटले कोणाला । परि तयाचे उपशमाला । सद्गुरु धांवती सहाय्याला । भाव भक्तांचा पाहुनि ।। १२ ।।

परि येथें सुवर्ण योग झाला । आईत सद्गुरु लाभला । ऐशा या सद्गुरु माऊलीला । नित्य स्मरती त्या मनांत ।। १३ ।।

जेथें चाले सद्गुरुंचे स्मरण । ते तेथेच राहती निष्ठून । सहाय्यार्थ धांवती आपण । प्रेमें भक्तांपाशीं आपुल्या ।। १४ ।।

जेथें सद्गुरु-माऊली एकवटली । त्या प्रेमास सीमाच नुरली । अगम्य लीलेची प्रचिती आली । पदोपदी मुलींना ।। १५ ।।

अभिमानानें अनुभव सांगती । आईची थोरवी गाती । सहाय्यार्थ धांवली आई । कुठें, कशी तयांना ।। १६ ।।

त्यांचे अनुभव ऐकून । शरीर रोमांचित होऊन । कंठ येतो दाटून । भावभक्तिनें आपुला ।। १७ ।।

विनय पुत्र कालेचा । खेळत असतां संध्याकाळचा । आईस सांगावयाचा । पोटांत दुखतें माझिया ।। १८ ।।

दु:खाचा वेग वाढला । तैसा तो रडू लागला । त्वरीत नेती तयाला । कुटुंबाच्या डॉक्टरांकडे ।। १९ ।।

डॉक्टर पाहती तपासून । म्हणती काय अजून होता झोपून । बैसला असता गमावून । सुपुत्र आपुला हाताचा ।। २० ।।

आतडें वाढलें पोटांत । तें टंच फुगलेंसे वाटत । जरी ते फुटेल आंतल्या आत । गंभीर स्थिति ओढवेल ।। २१ ।।

वेळ न गमवावा आपण । मोठ्या दवाखान्यांत जावें घेऊन । ऑपरेशन त्वरित घ्यावें करवून । सल्ला असे हा माझा ।। २२ ।।

काला गेली घावरुनि । पती ऑफीसांत होते ते दिनी । कोणत्या दवाखान्यांत जावें घेऊनी । निर्णय घेता येईना ।। २३ ।।

विचार कराया वेळ नुरला । इलाज कांही न सुचला । डॉक्टरांनीच निर्णय घेतला । ‘नानावटी’त करावें दाखल ।। २४ ।।

प्रसिद्ध होतें पार्ल्यात । नानावटी नामें रुग्णालय । दाखल करिती त्यांत त्वरित । विनयला आप्त मंडळी ।। २५ ।।

जैसे विनयला दाखल करिती । तैसे डॉक्टरही गोळा होती । एकत्र होऊनियां तपासती । सर्व प्रकारे रुग्णाला ।। २६ ।।

म्हणे तासाभराचे समयांत । ऑपरेशन करणें निश्चित । तयारी कराया सांगत । औषधांची नी साधनांची ।। २७ ।।

पती जवळ नव्हते म्हणून । काला घाबरली मनांतून । मनीं आईचा धांवा करुन । वाट पहात बैसली ।। २८ ।।

जय माऊली कुलस्वामिनि । वाटेकडे डोळे लावुनि । वारंवार मनीं आळवुनि । मोठ्या आशेनें बैसली ।। २९ ।।

तुवां यावें धांवून । नातवास घ्यावें सांभाळून । मज धीर द्यावा येऊन । एकलेपणा वाटतसे ।। ३० ।।

तूं जेव्हां होतीस घरांत । आम्ही निश्चिंत होतों मनांत । मुलें राहती आरोग्यांत । कृपाछत्राखालीं तुझ्याच ।। ३१ ।।

कधीं देवी येतां शरीरावर । फोड टरटरती सर्वांगावर । तू साहशी त्यांचा ज्वर । मुलें खेळत आनंदाने ।। ३२ ।।

कोणाचा घेशी विषमज्वर । कोणाचा घाव घेशी शिरावर । पडून राहशी बिछान्यावर । सर्व सहन करिशी आनंदें ।। ३३ ।।

ऐशा तुझ्या सावलींत । मुलें राहत आनंदांत । ती सावली विरली अनंतांत । कोठें तुजला पाहू मी ।। ३४ ।।

मला न काहीं आकळत । संभ्रम जाहलासे मनांत । तुवां येऊनियां सोबत । बाळ माझा रक्षावा ।। ३५ ।।

अश्रू वाहती डोळ्यांतून । पदराने ते घेई पुसून । तों हात फिरला पाठीवरून । एका पोक्त परिचारिकेचा ।। ३६ ।।

शस्त्रक्रियेच्या खोलींमधून । निघताना आली दिसून । कालेच्या जवळ येऊन । हात फिरवी ती मायेनें ।। ३७ ।।

म्हणे तुम्हीच का आई आहांत । जो रुग्ण बाबा आहे आंत । घाबरूं नका हो मनांत । सर्व होईल चांगलें ।। ३८ ।।

किती गोड बाबा दिसत । मी पाहून आले आंत । डॉक्टरांनांही केले विदित । केस माझी आहे म्हणोनियां ।। ३९ ।।

बाबासही धीर दिधला । समजावूनी प्रकार सांगितला । करणार कैसी शस्त्रक्रिया । पोटावर तुझिया ते ।। ४० ।।

नको असलेलें आतडें । तुझ्या पोटांत असे वाढलें । तें काढून जरी घेतलें । कीं तुज आराम पडेल ।। ४१ ।।

जे रुपतें तुझ्या पोटांत । तेणें पोटांत तुझ्या दुखत । जैसा पायांत काटा मोडत । काढतां आराम वाटतो ।। ४२ ।।

तुवां न जावें घाबरून । मी तुझी मावशी असें जाण । ‘बाबा’ माझा भाचा म्हणून । सांगितलें असें मी डॉक्टरांना ।। ४३ ।।

हात फिरविला अंगावरुन । तैसा तो हंसला मज पाहून । किती शहाणा बाबा म्हणून । दीर्घ चुंबन घेतलें मी ।। ४४ ।।

तुम्हींही न जावे घाबरून । माझाच बाबा समजून । मी स्वत: लक्ष देईन । ऑपरेशन समयास ।। ४५ ।।

औषधें न आणावी विकत । मी व्यवस्था केली सांप्रत ।। ४६ ।। तुम्ही स्वस्थ असावें चित्तांत । सर्व चांगले होईल ।। ४६ ।।

मी येथील प्रमुख चांदेकर । या वॉर्डाची आहे सिस्टर । बाबा भाचा आहे खरोखर । सांगितलेंसे सर्वांना ।। ४७ ।।

ऐसा आधार कालेला देऊन । चांदेकर मावशी गेल्या निघून । जेथें चाललेंसे ऑपरेशन । विनय जवळी तेधवां ।। ४८ ।।

तासाभरानें बाहेर आल्या । म्हणे उत्तम झाली शस्त्रक्रिया । आतां नको चिंता कराया । बाबा दु:खमुक्त झाला असे ।। ४९ ।।

विनयला आणती बाहेर । वॉर्डात झोंपविती पलंगावर । सर्व जमती आप्त-मित्र । सभोंवताली पलंगाच्या ।। ५० ।।

परिचारिकेस बोलावून । चांदेकर सांगती समजावून । नीट सांभाळावा हा रुग्ण । बाळ माझा असे की ।। ५१ ।।

औषध द्यावें वेळेवर । मागेल तें द्यावें सत्वर । वेळेचा न करावा विचार । माझे नांव सांगावें ।। ५२ ।।

चांदेकर बाई ऐटीत । सर्वांना होत्या दटावीत । त्यांची होती कडक शिस्त । घाबरती सर्व परिचारिका ।। ५३।।

कालेस सांगे येऊन । मी मागेच राहते म्हणून । कोणतीही येतां अडचण । माझे खोलीवर त्वरित यावें ।। ५४ ।।

मी नित्य फेर्या मारीन । बाबास जाईन पाहून । तुम्ही निश्चिंत जावें येथून । ऐसें सांगून गेल्या त्या ।। ५५ ।।

कालेस वाटला धीर । पाहून मावशी चांदेकर । कोण कोठली सहोदर । माया कैसी जडली पुत्रावर ।। ५६ ।।

परि आश्चर्य वाटलें मनांत । तिनें सहाय्य केले प्रत्यक्षांत । आदर वाटला मनांत । चांदेकर बाईविषयीं ।। ५७ ।।

विनयला ठेवणें पंधरा दिवस । म्हणोनि सर्व जाती घरास । वडीलही आले बघावयास । नित्य चाललें येणें जाणें ।। ५८ ।।

तीन वेळां दिवसांतून । चांदेकर मावशी जाती बघून । किती गोड बाबा म्हणून । कौतुक करिती विनयचें ।। ५९ ।।

जेव्हां डॉक्टरांची येई फेरी । तेव्हांही त्या असती बरोबरी । विनयची घेती खबरदारी । इतरांहून विशेष ती ।। ६० ।।

परिचारिकाही जाती घाबरून । लक्षही देती विशेष करून । विनयास विचारिती कोण । हेडसिस्टर लागते तुमची ।। ६१ ।।

मावशी म्हणून सांगतां जाण । विशेषादरें पाहती सर्वजण । काहीं मागतां समय सोडून । सर्व त्याला मिळतसे ।। ६२ ।।

ऐसा हा बादशाही रुग्ण । सर्व त्याचा करिती सन्मान । चांदेकराचा भाचा म्हणून । उणें न काहीं पडूं देती ।। ६३ ।।

काला नित्य दुपारची येई । तिला विनय सांगे सर्व कांहीं । मावशी जवळ बैसून जाई । गोष्टी सांगे गोड गोड ।। ६४ ।।

ऐसे दिवस गेले काहीं । तों मावशी दुपारची येई । कालेस विचारून पाही । कैसी प्रकृती बाबाची ।। ६५ ।।

काला सांगे आपले । फार फार उपकार जाहले । बाळ माझें रक्षिलें । माला धीर देऊनियां ।। ६६ ।।

आपण केली जी ममता । त्याची मातेहून अधिक महत्ता । पूर्व जन्मींचे सुकृत । म्हणून आपण भेटलांत ।। ६७ ।।

मावशी म्हणती हंसून । छे ! छे ! तैसें ब आणावें मनांतून । जाण्यापूर्वी एकदां येऊन । माझ्या घरीं जावें तुम्हीं ।। ६८ ।।

गोष्टी निघती गोष्टीवरून । तुम्हांस काय आवडतें म्हणून । म्हणे यावें लोणचें घेऊन । उत्तम केलें असल्यास ।। ६९ ।।

दुसरे दिवशीं बाटली भरून । काला आली लोणचें घेऊन । दवाखान्याचें मागें जाऊन । पत्ता विचारू लागलीं ।। ७० ।।

पहारेकरी आले धावून । म्हणती दुपारची वेळ असून । त्या झोपल्या असतील म्हणून । आम्हीं न उठवूं तयांना ।। ७१ ।।

ऐसे त्यांचे चाललें भाषण । तोंच आवाज येई माडीवरुन । अरे त्यांना द्या पाठवून । मी वाट पहातें तयांची ।। ७२ ।।

तैसी जाता माडीवर । दार उघडती चांदेकर । स्वागत केलें सुंदर । कौतुक करूनी कालेंचें ।। ७३ ।।

काला बैसली खोलींत । कौतुकें होती सर्व न्याहाळीत । खोली होती सुंदर प्रशस्त । सजविलेली नेटकी ।। ७४ ।।

सर्व सुख-सोयी अद्यतन । खोलींत आल्या दिसून । पुष्पगुच्छ पडदे पाहून । प्रसन्नता वाटे कालेला ।। ७५ ।।

तेव्हां मावशी बोले हंसून । किती भाग्यवान दिसता आपण । तुमच्या मनांत चाले चिंतन । भक्त आहांत वाटतें ।। ७६ ।।

ऐसें विनोदें चाललें संभाषण । आनंदाची झाली देवाण-घेवाण । काला तयांना लोणचें देऊन । दवाखान्यांत परतली ।। ७७ ।।

ऐशा वरचेचर भेटी होती । तोंच अकराव्या दिनी सांगती । तुमच्या पुत्रास दिली मुक्ति । दवाखान्यांतून आज ।। ७८ ।।

आनंद जाहला कालेला । विनयला सर्व तयार केला । आतां वाटे भेटावें मावशीला । निघण्यापूर्वी एकदां ।। ७९ ।।

तिनें केला बहुत उपकार । जाऊन मानावेत आभार । म्हणोनि जाती पूर्वोत्तर । मावशीच्या घरीं ते ।। ८० ।।

दोघे जाती दारांत । तोच पहारेकरी अडवीत । चांदेकरांचे घरांत । जावयाचें म्हणून सांगती ।। ८१ ।।

कोण चांदेकर म्हणून विचारीत । तैसे येथें कोणी नाहीं राहत । म्हणती परवांच त्यांचे घरांत । आम्ही गेलों होतों की ।। ८२ ।।

माडीवरी दाखविती बोट । म्हणे येथेंच त्यांची घेतली भेट । पहारेकरी म्हणती पहावे नीट । खिडकी बंद असे तेथली ।। ८३ ।।

कित्येक महिन्यापासून । तो ब्लॉक रिकामा आहे जाण । वाटल्यास यावें पाहून । कुलूप आहे किंवा नाहीं ।। ८४ ।।

काला वरती आली जाऊन । तों कुलूप आलें दिसून । नामावली पाही वाचून । जिन्याजवळ लावलेली ।। ८५ ।।

परि तेथेंही न नांव दिसलें । म्हणोनि महदाश्चर्य वाटलें । परिसर निरखोनियां पाहिलें । पुन्हां पुन्हां कालेनें ।। ८६ ।।

तैसीच आली दवाखान्यांत । तेथील परिचारिकांना विचारित । कोठें सिस्टर चांदेकर राहती । कोण चांदेकर म्हणूनि विचारित ।

ऐसे कोणी नाहीं येथें रहात । अहो ! नित्य वॉर्डात येत । प्रमुख सिस्टर आपुल्या ।। ८८ ।।

नित्य दहा दिवस तयांना । आम्ही पहात असूं येतांना । तुम्हांसवेंच करिती मंत्रणा । बाबाविषयी सांगती ।। ८९ ।।

परिचारिका सांगी हंसून । आमच्या न येई स्मराणंतून । सिस्टर चांदेकर म्हणून । प्रमुख आमुच्या नाहींत ।। ९० ।।

काला जाई गोंधळून । परिचारिकांचे ऐकून भाषण । डॉक्टरांना विचारी विनवून । चांदेकर बाई कोठें असे ।। ९१ ।।

तोच प्रश्न विचारती डॉक्टर । ह्या नांवाची कोणी नाहीं सिस्टर । कैशा येती वारंवार । दवाखान्यांत आमुच्या ।। ९२ ।।

आश्चर्य वाटलें कालेला । ऐसा केसा प्रकार घडला । काय झाला भ्रम आम्हांला । प्रत्यक्ष पाहिलें असतांना ।। ९३ ।।

कालपर्यंत भेटली । आज अचानक कैसी गेली । सर्वांनाच भुरळ पाडिली । कोणी न ओळखिती केसें हें ।। ९४ ।।

कुतूहल जागलें म्हणून । रजिस्टर पाहती शोधून । तैं चांदेकर म्हणून । नांव सापडलें तेथें ।। ९५ ।।

परी पांच वर्षांपूर्वी एक । डॉक्टर होत्या चांदेकर । तेव्हांपासून आजवर । कोणीच नाहीं त्या नांवाचें ।। ९६ ।।

घरीं आणतीं विनयला । परी कोडें न उलगडें कोणाला । कोण धांवलें मदतीला । चांदेकर या नांवानें ।। ९७ ।।

का आईच आली धांवुन । माझा आर्त धांव ऐकून । चांदेकर मावशी होऊन । संरक्षाला नातवाला ।। ९८ ।।

गणदेवीस होती प्रत्यक्षांत । तरीही प्रकटली नवसारींत । वाटे आतां न येशी साक्षात । बालकासाठी आपुल्या ।। ९९ ।।

परी तूं नवल केलेंस । मावशी म्हणून प्रकटलीस । धन्य केलेंस आम्हांस । सावली परी राहुनी ।। १०० ।।

दामाजीपंताकरितां । विठू माहार झाला होता । मोहरा झाला देता । असंख्या तो बादशहासी ।। १०१ ।।

एकनाथाच्या प्रेमास्तव । श्रीखंड्या म्हणूनी आला देव । त्याचा पाहुनी भक्तिभाव । संसार नेटका चालवी ।। १०२ ।।

भाऊकाकांचे करितां । देव वकीलरूप झाला घेता । कोर्टात सोडवी भक्ता । स्वयें केस चालवूनी ।। १०३ ।।

नरसी मेहाताची वटविण्याची हुंडी । शामळशेठ झाला जगजेठी । जगीं ऐशा केल्या गोष्टी । भक्तवेड्या देवानें ।। १०४ ।।

येथें तैसेंच आलें घडून । मुख्य परिचारिका झाली आपण । मातृप्रेम हें साकारून । कालेकरितां प्रकटली ।। १०५ ।।

जेव्हां कालेस हें आलें कळून । तेव्हां हृदय आलें भरून । अपार कष्ट पडले हें जाणून । तिच्या करितां आईला ।। १०६ ।।

पूर्वीप्रमाणेंच काढून घेशी । दु:खें मुलांची स्वत: भोगिशी । आतां होऊनियां मावशी । वचनाला जागलीस ।। १०७ ।।

धन्य धन्य गे माऊलीं । तव अपार कृपेची सावली । इहजन्मीं आम्हां लाभली । कृतार्थ केलेंस जीवन ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम पंचदशोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*