सावली अध्याय १८ वा

।। श्री ।।
।। अथ अष्टदशोऽध्याय: ।।
श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

श्रोते मज सांगती । की अमृतघट लाविला ओठीं । तरीही न झाली मनाची तृप्ती । अधिक कांक्षा तें करितसे ।। १ ।।

आम्हीं हे आहोत जाणून । कथेस या नाहीं क्षितिजपण । ती आहे अनिर्बंध विलक्षण । स्वयंसिद्ध प्रकाशापरी ।। २ ।।

तिला नाहीं आदि-अंत । परी मन कोठे तरी व्हावें शांत । जेथोनि न चळावें चित्त । आणि पूर्ती व्हावी कांक्षेची ।। ३ ।।

ऐसें काहींतरी सांगावें । जें सर्वथा परिपूर्ण असावें । याहून कांही ऐकावें । असें वाटूच नये आम्हांला ।। ४ ।।

अहो ! तें म्हणजे श्रीसद्गुरूचरण । तेचि दृढ ठेवावे धरून । तेथेंच स्थिर करावें मन । वासना क्षय होई तोंवरी ।। ५ ।।

क्षय वासनेचा होईल । अक्षय सुख तेथेचि लाभेल । चिरंतन सुख भोगाल । पुन्हा न मागे फिराल ।। ६ ।।

ज्याला देवाहून लाभे मोठेंपण । तेंचि साक्षात् परब्रह्म जाण । जेथें जीवा-शिवाचें मीलन । सत्यं-शिवं-सुंदरम् ।। ७ ।।

जे सुंदराहुनी अति सुंदर । मंगलाहूनी अति मंगल । असती ज्ञानातील-परिपूर्ण । सद्गुरुचरण निरंतर ।। ८ ।।

तेचि मागितले संतांनी । समचरण लक्षिले लोचनीं । वाटले कीं रज:कण होऊनी । पदकमलीं रमावें निरंतर ।। ९ ।।

मग सद्गुरु तुम्हां उचलतील । आपणासारिखें करतील । देवपणातेंही विसरतील । एकात्मतेच्या भावनेनें ।। १० ।।

श्रीकृष्ण-मीरेचें झालें मीलन । अवघ्या सृष्टींत दिसला नारायण । अणु ब्रह्मांड राहिली होऊन । भक्ति-रस-प्रेमाने ।। ११ ।।

मीरेची मधुरा भक्ति । जे कोणी प्रेमानें आचरती । त्यांनाच येईल प्रचिती । ‘तुका झाला पांडुरंग’ याची ।। १२ ।।

येथेंही तेच करावें आपण । सद्गुरु जानकीचे धरावे चरण । जी सद्गुरु माऊली एकवटून । प्रकटलीसे तुम्हांपुढे ।। १३ ।।

म्हणोनियां श्रोतेजन । ज्यांनी ऐसे धरिले दृढचरण । त्यांचा उल्लेख केल्यावाचून । कथानक पूर्ण न होईल ।। १४ ।।

असो, मागील अध्यायीं कथीलें । कीं जे भक्त होते चांगले । त्यांनाच मात्र अनुभव आले । जानकीच्या अस्तित्वाचे ।। १५ ।।

परी जे होते साधारण । आणि कांहींच नव्हते जाणून ।त्यांची कुचंबणा होईल मनांतून । भ्रम निरसन होई ना ।। १६ ।।

एकेक तिच्या कथा ऐकती । कुणाला जानकीची आली प्रचिती । म्हणे आमुची कैशी दैवगती । पाहूं न शकलों तिजला ।। १७ ।।

काय आहे आमुच्यांत न्यून । जेणें न घडावें तिचें दर्शन । वाट पाहुनि शिणले लोचन । तरी दया न येई तिजला ।। १८ ।।

ताई परळीकर म्हणून । एक भक्त आहेत जाण । त्यांना नित्य मनांतून । खंत ऐसीच जाणवतसे ।। १९ ।।

काय दैवात आहे उणेपण । जेणें न दिसावे चरण । आईविना पोरकेपण । आज जाणवे आम्हांला ।। २० ।।

एकदां त्यांच्या मुलीला । उगवण आली सर्वांगाला । देवी टरटरून निघाल्या । जागा न उरली कोठेंही ।। २१ ।।

ऐसी असतां ती चिंतेत । समोर जानकी दिसली अवचित । करीं पिशवी घेऊन उभी रस्त्यांत । सस्मित सांगे ताईला ।। २२ ।।

घरीं आले रहावयास । वास्तव्य करीन कांही दिवस । तुवां निश्चिंत असावें, कन्येस । कांहीं न होईल तुझिया ।। २३ ।।

ऐसें म्हणोनियां दारांत । अदृश्य जाहलीसे अवचित । तों ताई सर्वत्र शोधित । आतां दिसून गेली कोठें ।। २४ ।।

ऐसे जाती कांही दिवस । तों कन्येला येई पहावयास । कुसुम अवचित एक दिवस । ताईचे घरीं एकदां ।। २५ ।।

म्हणे जोर उगवण्याचा आहे देहांत । घटस्थापना करावी घरांत । आरती करावी तिन्हीं प्रहारांत । कमी होईल तेव्हां तो ।। २६ ।।

मी परवांच सांगितलें तुजला । कीं मी आले रहावयाला । अजून न ओळखिलेंस आम्हंला प्रत्यक्ष राहुनियां घरांत ।। २७ ।।

तेव्हां प्रकाश पडला डोक्यांत । हें तों जानकीच आहे बोलत । प्रत्यक्ष भेटली दारांत । आज कन्येमुखीं बोलतसे ।। २८ ।।

देह बदलोनि आलीस । आज कन्येमुखीं बोललीस । उपकृत केलेंस आम्हांस । आई परतोनी लाभली ।। २९ ।।

आजवरी होतों वंचित । दृष्टी तुला होती शोधित । आज भेटलीस अवचित । कन्यादेहीं प्रकटलीस ।। ३० ।।

पुढील पूजनाचा विधी । समजावूनि सांगितला आधीं । तेणें मुक्त केली आधि-व्याधी । प्रकृति स्वास्थ्य लाभलें ।। ३१ ।।

परी जानकी मिळाली परतोन । हाचि परमानंद झाला म्हणोन । कन्यादेहीं आली संचारोन । कार्य आपुले करावया ।। ३२ ।।

परी कुसुम भक्तांना सांगत । याचा गवगवा न करावा जनांत । अनुभव येतां प्रत्यक्षात । सर्व आपोआप जाणतील ।। ३३ ।।

ऐसी ती परतोनी आली । आपुल्या वचनास जागली । कार्य करावया सिद्ध झाली । उप-सावलींत आपुल्या ।। ३४ ।।

जैसे फूल उगवतें सुगंधित । भ्रमर आपोआप जाती शोधित । तैसे हे जानकीभ्रमर भक्त । तिचें भोंवती झेंपावले ।। ३५ ।।

अथवा गूळ-शर्करा सांडली । मुंगी सहपरिवार धांवली । वाट आमंत्रणाची ही न पाहिली । सहज आकर्षली तेथें जैशी ।। ३६ ।।

तैसें हे सुभक्त जन । चिंतामणी गवसला म्हणून । कुसुमताईस करिती वंदन । जय जय बायजी म्हणोनियां ।। ३७ ।।

कधीं देहांतुन संचारत। कधीं स्वप्नांतुनी सांगत । कधीं समोर बैसुनी बोलत । कन्ये पुढती आपुल्या ।। ३८ ।।

मातृदेवतेचें चिंतन । अखंड चाले रात्रंदिन । सद्गुरु प्रकटे हृदयांतुन । वरदहस्त शिरावरी ।। ३९ ।।

जरी सर्व संसार केला । तो कर्म-मार्ग म्हणोनि आचरला । वाचा-मनें-देह वाहिला । सद्गुरु चरणीं निरंतर ।। ४० ।।

तेणें वास्तव्य राही देहांत । एकरूप झाले अद्वैत । कुसुम होऊनि रूपांतरित । जानकी झालीसे आपण ।। ४१ ।।

तिनें सांभाळिला भक्तगण । भार उचलिला जाणून । केवळ निमित्त मात्र राहून । आज्ञा शिरोधार्य केली असे ।। ४२ ।।

हेंचि झाले द्वितीय स्थान । मातृदेवतेचें ठिकाण । नूतन पवित्र महान । स्थान भक्तां लाभलें ।। ४३ ।।

स्थानमहिमा जाणून । भक्त येती दर्शना लागुन । इच्छित फलप्राप्ती होऊन । आशिर्वाद लाभे तयांना ।। ४४ ।।

रामनवमीचे शुभदिनी । उत्सव करिती आनंदुनी । आणि तिचे गुणगायनी । रंगून जाती भक्तजन ।। ४५ ।।

जय जय जानकी म्हणून । कीर्तन करिती मोठे लहान । भक्ति-प्रेमें नाचून । गाऊन दिन घालविती ।। ४६ ।।

जैसे आषाढी कार्तिकींत । भक्त गण येती पंढरपुरांत । तैसे येथेंही जमती बहुत । रामनवमीचें शुभदिनीं ।। ४७ ।।

नवरात्रीचें नऊ दिवसांत । जानकी सदैव राहे अंगात । गण देवीचा राही सोबत । साक्षात्कारें दाखवितसे ।। ४८ ।।

वास फुलांचा राही दरवळत । कधी गुलाल कुंकु येई उधळत । हिना-मोगरा येई धांवत । अस्तित्व देवीचें सांगावया ।। ४९ ।।

सुवासिनी पूजिती बहूत । कोणीही न जाती रिक्त हस्त । संतुष्ट होती सर्व भक्त । देव-देवीच्या दर्शनें ।। ५० ।।

प्रति गणदेवीच अवतरली । कीं प्रति पंढरीच लाभली । अबू-अंबाजी एकवटली । जणूं येथेंच की प्रत्यक्ष ।। ५१ ।।

वटसावित्रीची कथा सांगती । वडाभोवती पूजन करिती । त्या वृक्षालाच देती सद्गती । पूर्व जन्म सांगोनी ।। ५२ ।।

पूर्वजन्माच्या कथा सांगती । जन्मोजन्मीचीं नातीं जुळविती । नागदंपतीला मुक्ती देती । सकल भक्तजनां पुढे ।। ५३ ।।

गिरनारीं जाती दर्शना लागुन । कपी मार्गात करिती वंदन । सिंहीण घालितसे लोटांगण । लोचनीं अश्रु वाहती ।। ५४ ।।

आशीर्वाद तिजला देती । पूर्वजन्म तिचा सांगती । तिची होय शापमुक्ति । देह सोडून जातसे ।। ५५ ।।

ऐशा विस्मयकारक कथा । किती सांगो म्हणोनि आतां । ही पुण्यप्रदायक गाथा । जणूं अमृताची आरवंटी ।। ५६ ।।

प्राणीमात्रावर केली दया । चराचरावर धरिली छाया । ऐसी ही जानकीची माया । प्रतिमारूपें प्रकटली ।। ५७ ।।

म्हणोनियां भक्तजन । तिज कराया पूर्ण प्रसन्न । मानसपूजा श्रेष्ठ साधन । सहज सुलभ सोपी ।। ५८ ।।

याला न लागे कवडी दमडी । प्रेमरसाची पाहिजे आवडी । सर्व सुखा त्वरित जोडी । मानसपूजा निरंतर ।। ५९ ।।

म्हणोनि बैसलों मांडी घालुन । शांत निर्मळ करूनि मन । जानकीची प्रतिमा समोर आणून । सुस्वागत केलें मनोमनीं ।। ६० ।।

हृदयस्थ कल्पिले सिंहासन । सुवर्ण-रत्नजडित छान । मी तिज बैसवलें विनवून । सुहास्यवदनें पाहतसे ।। ६१ ।।

येई येई गे माऊली । तुझी वाट किती मी पाहिली । सारी गात्रें अधीर झालीं । दर्शन तुझे घ्यावया ।। ६२ ।।

आदरें बैसविलें सिंहासिनीं । वारंवार वंदनें करूनि । विंझण घातलें स्वकरांनी । श्रमपरिहार कराया ।। ६३ ।।

सुवर्ण पात्र घेतलें करीं । पदयुग्म ठेविले त्याचे वरी । शिर ठेविलें चरणावरी जय जानकी म्हणोनियां ।। ६४ ।।

विविध सुगंधित तेलांनीं । पदप्रक्षालन केलें मनीं । ते पुशिले मी स्वकरांनी । हळुवारपणे सावकाश ।। ६५ ।।

गोरस, दधि-धृत । मधुशर्करा पंचामृत । सर्व करोनियां मिश्रित । पूजनास मी प्रारंभिले ।। ६६ ।।

गंगा यमुना गोदावरी । नर्मदा सिंधू कावेरी । चांदीच्या भरोनियां घागरी । पूजनासाठीं कल्पिल्या ।। ६७ ।।

केशरमिश्रित उटी घेऊनी । पदयुग्मास दिली चर्चुनी । एकैक पवित्र जलानें । अभिषेक मनीं आरंभिला ।। ६८ ।।

सुवर्णपात्र घेतलें भरोनी । हर गंगे ! नर्मदे म्हणूनि । पदयुग्मावर घातलें भरभरोनी । अति हर्षोनियां अंतरी ।। ६९ ।।

चरणतीर्थ केलें प्राशन । स्वशरिरीं केले प्रोक्षण । करावया पाप क्षालन । मी प्रार्थिलेंसी तिजला ।। ७० ।।

शालु रेशमी दिला सुंदर । चोळी त्या साजेसी रंगदार । शाल घातली मी अंगावर । पुन्हां वैसविलें सिंहासनी ।। ७१ ।।

ऐसें वस्त्रातें देऊनी । कुंकुम अक्षता भाळीं लावुनी । केसांची बांधावया वेणी । फणी सुंदर दिधली करांत ।। ७२ ।।

बहुविध सुगंधित पुष्पांनीं । शमी बिल्वादिक गुलाबांनी । मोगरा चंपक गुंफोनी । पुष्पमाला घातल्या ।। ७३ ।।

भांगी भरला शेंदुर । लाविला हिना केवडा अत्तर । नथ नाकांत दिली सुंदर । तिज प्रिय असे म्हणोनियां ।। ७४ ।।

कल्पिले सुवर्णालंकार । गळीं माणिकमोत्यांचे हार । बाजुबंद दिले नागाकार । कंबरपट्टा नक्षीदार ।। ७५ ।।

पायी तोरड्यांचा झंकार । जोडवीं पदांगुलीत सुंदर । घातले विविध अलंकार । नखशिखांत माऊलीला ।। ७६ ।।

धूप-दीप दिले उजळोनि । शुद्ध प्रेमभावें भरोनी । आरती करितसे मनोमनीं । जय जय जानकी म्हणोनियां ।। ७७ ।।

जय जानकी दुर्गेश्वरी । अनंत नमनें चरणावरी । जन्म घेतला भूवरि । जड मूढ उद्धराया ।। ७८ ।।

जे विविध तापें पोळले । त्यांवरीच तुम्हीं प्रेम केलें । दु:ख तापादे हरिले । सुखी केले भक्तजनां ।। ७९ ।।

जे तव पदकमलीं रमले । त्यांना तुम्हींच हो तारिलें । उच्च नीच न पाहिले । समदृष्टीने सांभाळिलें तयांना ।। ८० ।।

तरी हे करुणाघन माऊली । तव पूर्ण कृपेची सावली । मानसपूजेनें लाभली । ती शिरीं राहो निरंतर ।। ८१ ।।

ऐसें करितां गुणगायन । अष्टभाव आले दाटून । माऊलीचे धरोनियां चरण । आनंदाश्रुनीं धुतले मी ।। ८२ ।।

आतां भूक लागली म्हणून । सुवर्णाचें ताट घेतलें कल्पून । षड्रस परिकर पक्वान्न । मिष्टान्न वाढिलें मनोमनीं ।। ८३ ।।

स्वकरें भरविला गोड घांस । जेवण्यास कथिलें सावकाश । जें जें आवडलें माऊलीस । तें तें आग्रहानें वाढलें ।। ८४ ।।

उशीर झाला म्हणून । क्षमा घेतलीसे मागून । शेष मजकरीं दिलें उचलोन । प्रसाद म्हणूनी भक्षिला ।। ८५ ।।

ऐसें प्रेमें केल्या भोजन । आणि करितां मुखप्रक्षालन । तांबूल श्रीफळ देऊन । सुवर्ण दक्षिणा दिल्या मी ।। ८६ ।।

रत्नदीपांची पंचारती घेऊनी । मनोभावें तिज ओवाळूनी । प्रदक्षिणा सावकाश करोनी । लीन झालों तिचे पायीं ।। ८७ ।।

आतां केलें गायन भजन । जय जगदंबे जानकी म्हणून । तुमचें कराया गुण-गायन । स्फूर्ति द्यावी मजला ।। ८८ ।।

तूं लावण्यमयी तारुण्यमयी । तूं कारुण्यमयी, चैतन्य-मयी । तूं कल्याणमयी आनंदमयी । तूं कल्पनातीत ज्योतिर्मयी ।। ८९ ।।

तूंच, परा मध्यमा, पश्यन्ती । आद्या, वेदगर्भा, शारदा भारती । जगद्व्यापिनी, सर्वा, शुक्ला वीणावती । वागीश्वरी, प्रज्ञा, ब्रह्मकुमारी ।। ९० ।।

सर्व जगाचें करितसे धारण पोषण । तूंच ती महादेवी जाणून । चरणीं अनंत करितों नमनें । कल्याणमयी शिवे तुला । ।। ९१ ।।

तूंच वसशी दृश्य अदृश्यांत । तैसीच स्थूळ-सुक्ष्मरूपांत । ऐशा चित्शक्तीचे रूपांत । विश्व-विश्वेश्वर व्यापिला ।। ९२ ।।

तरी आम्हांस द्यावें अभयदान । अमृत दृष्टिनें न्याहाळून । भवसागर जाया तरून । चरणीं ठाव द्यावा निरंतर ।। ९३ ।।

ऐसें माऊलील आळवून । भावपुष्पांजली अर्पून । प्रदक्षिणा भोंवताली करून । मानसपूजा पूर्ण केली ।। ९४ ।।

मस्तक ठेवितां चरणावरी । तो अभयकर ठेविला शिरावरी । म्हणे संतुष्ट जाहलें तुजवरी । सेवा गोड स्वीकारली ।। ९५ ।।

सद्भक्त माझा होशील । तुज पूर्ण गुरुकृपा लाभेल । सर्व सौख्यें मिळतील । आशीर्वाद आहे निरंतर ।। ९६ ।।

तुझ्या या वाड़मयसेवेंत । माझे वास्तव्य आहे मूर्तिमंत । भावे वाचील जो भक्त । सावली राहील तयावरी ।। ९७ ।।

या ‘सावलीचें’ करितां वाचन । भाव भक्तीनें जाणून । त्याचे हेतू करीन रे पूर्ण । श्रद्धा अटळ ठेवावी ।। ९८ ।।

ऐसें मिळतां आश्वासन । ग्रंथ परिपूर्ण झाला जाणून । कुसुमताईचे पदरीं अर्पून । कृतार्थ जाहलों जीवनीं ।। ९९ ।।

त्यांना सदैव वाटे मनांत । आईचे चरित्र लिहावे सुसंगत । तें भाग्य मजला लाभत । पूर्वसुकृत म्हणोनियां । ।। १०० ।।

जरी होतें पूर्व सुकृत । सद्गुरुंचा आहे वरदहस्त । त्यांनीं मज केले भाग्यवंत । ग्रंथ लिहविला मत्करानें ।। १०१ ।।

तरी या ग्रथामधील कथन । माझें काहींच नसे जाणून । भाऊकाकांनी घेतलें लिहवून । विसरू कसा मी तयांना ।। १०२ ।।

यांत जें जें काहीं चांगले । मी तें सद्गुरुकृपे लिहिलें । न्यून म्हणून कांहीं दिसलें । तो दोष माझा समजावा ।। १०३ ।।

परी भाव घ्यांवा जाणून । दुर्लक्षावें असल्यास न्यून । जानकीचे करतां गुणगायन । प्रमादांची करावी क्षमा ।। १०४ ।।

ऐसी ही वाड़मयरूपी ‘सावली’ । जींत जानकी असे विसावली । जणूं ती नूतन लाभली । सद्भक्त हो तुम्हांला ।। १०५ ।।

या ‘सावलीचें’ करितां वाचन । ‘सप्तशती’ वाचल्याचें पुण्य जाण । कुलदेवता जाईल संतोषून । सहाय्यरूप होतील ।। १०६ ।।

म्हणोनि हे अभिनव कथन । भक्तास पुण्यप्रदायक जाण । भक्तिभावें करितां वाचन । इच्छित फलप्राप्ती होईल ।। १०७ ।।

प्रथमोध्यायांत ज्यांना विनवून । आशीर्वाद घेतला मागून । त्या सर्व देवतांच्या पायीं नमून । ही ग्रंथसेवा पूर्ण केली ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम अष्टदशोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*