सावली अध्याय १० वा

।। श्री ।।
।। अथ दशमोऽध्याय: ।।
श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

जानकीची ही अगम्य लीला । गंमत वाटे ऐकावयाला । परि बोध पाहिजे घेतला । जीवनगाथेमधून ।। १ ।।

सदैव परोपकारार्थ । स्वत: झिजली जीवनांत । दु:ख दुसर्यांचे हासत । ओढून घेई स्वत:वरी ।। २ ।।

फुलांनी नित्य फुलावें । मुलांनी सदैव बागडावें । सुखे संसारांत नांदावें । सकल जनांनी ।। ३ ।।

ऐशा केवळ शुद्ध भावनेनें । सदैव प्रयत्न करणें । आणि अभागी भक्तजिणें । समृद्ध केलें जानकीनें ।। ४ ।।

बाबू म्हणून । एक भक्त होता जाण । जानकीस आत्या म्हणून । संबोधितसे प्रेमानें ।। ५ ।।

त्याचे आत्येवर अतिप्रेम । कोणतेंही असतां काम । तिज विचारण्याचा नेम । कधींही तो टाळत नसे ।। ६ ।।

एके सकाळीं उठला झोंपेतुन । तों त्याला आले कळून । आपणांस न दिसे कांहीं म्हणून । घाबरलासे मनांत ।। ७ ।।

डोळे चोळून पाहिले । डोळे धुवून पाहिले । परि सर्व व्यर्थ गेलें । काहीं न दिसे तयाला ।। ८ ।।

मनांत गेला घाबरून । आणि रडूं लागला तत्क्षण । सर्व आले धांवून । काय झालें म्हणोनियां ।। ९ ।।

सांगे न मला कांही दिसत । सर्व अंधार असे वाटत । मज न्यावें त्वरित । आत्येकडे उचलोनि ।। १० ।।

मंडळी जाती घाबरुन । कैसे आले आंधळेपण । एका रात्रींत घडून । बाबूच्या या दैवात ।। ११ ।।

म्हणे डॉक्टरास दाखवून । डोळे घेऊं तपासून । उपचार पहिला करुन । पुढें जाउं गणदेवीस ।। १२ ।।

परी बाबूनें हट्ट धरिला । प्रथम गणदेवीस चला । नंतर करूं उपचाराला । आत्याच्या सल्ल्यानें ।। १३ ।।

दुपारीं जाती घेउन । तेव्हां रडूं लागला कर धरून । आत्या मला न दिसते म्हणून । आंधळा झालों असें मी ।। १४ ।।

जानकी धरूनियां हात । आपणा जवळी बैसवित । म्हणे तुला दिसेल रे निश्चित । उद्यां सकाळपर्यंत ।। १५ ।।

तुवां असावें निश्चिंत । काळजी न करावी मनांत । सर्व होईल व्यवस्थित । विश्वासावें मजवरी ।। १६ ।।

तेव्हां बाबू सांगे निक्षून । जेव्हा मज येईल दिसून । तुझे घडावें दर्शन । नव्या दृष्टीस माझीया ।। १७ ।।

जानकी सांगे हांसून । आतां शांत जावें झोपून । उद्यां सकाळी येईल दिसून । हळू हळू तुजला रे ।। १८ ।।

तोंचि दादा येती बाहेरून । त्यांना सर्व प्रकार सांगून । म्हणे त्वरित आणावें बोलावून । बाबूचे वडिलांना ।। १९ ।।

तैसे दादा बाहेर पडती । परि शोधण्याची आपत्ती । ते कधी घरीं न सांपडती । गुत्त्यांत फिरती सदैव ।। २० ।।

परी सुदैवानें ते सांपडले । तैसे त्यांना घेऊन आले । जानकीसमोर । उभे केले । झिंगलेल्या अवस्थेंत ।। २१ ।।

जानकी बोले संतापून । अजून न उघडती लोचन । सदैव उकिरडा फुंकून । जिणें जगतोस नालायका ।। २२ ।।

खंडोबास ठेविलें गहाण । तो घाण्यावर बैसला म्हणून । तेल काढीतो ओढून । बैलासवें तेल्याकडे ।। २३ ।।

कैसें तुझें हे दुर्व्यसन । कीं देवास ठेविलें गहाण । त्या खंडोबानें संतापून । आंधळे केलें पुत्राला ।। २४ ।।

अजून काहीं न पाहिलें । तो सर्वस्वाचें करील वाटोळें । जरी त्याला न सोडविलें । अटळ आहे सर्वनाश ।। २५ ।।

आतां व्हावें सावधान । दारूचें सोडावें व्यसन । कुटुंबाला घ्यावें रक्षून । सत्कृत्यानें आपुल्या ।। २६ ।।

ऐसे उघडतां लोचन । जानकीचे धरले चरण । क्षमायाचना करुन । आण घेतली पायांची ।। २७ ।।

दारूस मी न स्पर्शीन । खंडोबास घरी आणीन । सद्वर्तनानें वागेन । परी रक्षावें गा बालकास ।। २८ ।।

तैसेचि गेले धांवत । गहाण दैवत सोडवित । सुवर्णटांक करांत । जानकीच्या देती ते ।। २९ ।।

तो बाबूच्या देऊनी हातांत । भंडारा टाकिती बहुत । म्हणे प्राशन करावा सतत । पाण्यामधून भंडारा ।। ३० ।।

श्रीखंडोबाचें घ्यावें दर्शन । मनामध्यें त्याला प्रार्थून । म्हणे मज द्यावें दिसून । कोप न करावा पुत्रावरी ।। ३१ ।।

टांक समोर ठेवून । आणि खंडारा करितां प्राशन । हळुहळू दृष्टी येउन । दिसूं लागलें बाबूला ।। ३२ ।।

जेव्हां पूर्ण टांक दिसला । डोक्यावर घेऊनी नाचला । म्हणे खंडोबा माझा मिळाला । पूर्ण कृपेनें आत्याच्या ।। ३३ ।।

आत्याच्या पडला पायां । म्हणे येऊं दे आमुची दया । तुझी पूर्ण असावी माया । कुटुंबारी आमुच्या ।। ३४ ।।

त्याचे वडीलही सुधारले । पुन्हां दारुस ना शिवले । सर्व कुटुंब सुखी केलें । कुलदैवतानें त्यांचिया ।। ३५ ।।

एकदां जानकी सांगे पतीस । कीं निरोप कळवा नानास । नवरात्र बसवावें गणदेवीस । यंदाचिये वर्षी ।। ३६ ।।

दादा जाती संतापून । म्हणे ऐसें कोणते कारण । कीं दुसर्याचे देव आणून । आपुल्या घरीं बैसवावे ? ।। ३७ ।।

ऐसें कधींही न ऐकले । दुसर्यांचे नवरात्र तिसर्या घरी केलें। नी तेही नसतां कुटुंबामधले । मला न पटे कांहीं हे ।। ३८।।

वाद वाढे गोष्टीवरून । परी जानकी सांगे निक्षून । नवरात्र येईल घडोन । येथेंच आपुल्यासवें ।। ३९ ।।

रुपये तीन देती काढून । नवरात्राचे खर्चाकारण । जानकी करीं ठेवून । आपण जाती मुंबईस ।। ४० ।।

जानकीची आज्ञा म्हणून । नाना आला देव घेऊन । घटस्थापना करून । राहिले ते गणदेवीस ।। ४१ ।।

येतां नवरात्रींचे सुदिन । आनंद पर्वणीच आणून । लोक येती दर्शनाकारण । दूरदूरच्या गांवचे ।। ४२ ।।

सुवासिनी येती असंख्यात । जानकी करीतसे स्वागत । कोणी न परते रिक्तहस्त । आशिर्वाद-प्रसादाविना ।। ४३ ।।

जो ज्या कामने आला । तैसा त्याला लाभ झाला । जैसा भाव मनीं धरिला । तैसी पावली देवता ।। ४४ ।।

ऐशा आनंदोत्सवांत । नऊ दिवस पूर्ण होत । कुलदेवी आनंदे उठत । सीमोल्लंघन करावया ।। ४५ ।।

नानाची पत्नी घरांत । आवरा-आवरी होती करित । तें उसण भरुनी कमरेंत । अवघडून गेली तेधवां ।। ४६ ।।

तिला न येई उठतां । तिला न येई बसतां । तिला न येई निजतां । विचित्र अवस्था जाहली ।। ४७ ।।

तें जानकी आली धांवून । हात फिरविला कमरेवरुन । तिज ठेविलें की झोंपवून । क्षणभरीं जानकीनें ।। ४८ ।।

ऐसी गडबड चालली घरांत । एक भिक्षुक आला दारांत । गोंधळ्यापरी वेष दिसत । उभा राहिला अंगणीं ।। ४९ ।।

तें जानकीच्या गेलें श्रवणीं । भिक्षुक उभा असे अंगणी । म्हणे, तया हळद घालुनी । दूध द्यावें प्यावया ।।५० ।।

वरी नानासी असे सांगत । तांब्याचा पैसा भिजवावा हळदींत । तोही घालावा झोळींत । दारांतल्या भिक्षुकाच्या ।। ५१ ।।

परी असतां गोष्टीच्या नादांत । कोणीही ना लक्ष देत । भिक्षुक निघुनियां जात । थांबुनियां क्षणैक ।। ५२ ।।

तेव्हां जानकी अली ओट्यावर । नानाचा धरोनियां कर । म्हणे कोण आला बाहेर । माहीत का रे तुजला ।। ५३ ।।

खंडेराव होते प्रत्यक्षांत । तुज दर्शन द्याया येत । नवरात्र घालविले सौख्यांत । विघ्न तुमचें हरोनी ।। ५४ ।।

तुझ्या पत्नीस होतां घात । जेव्हां उसण भरली कमरेंत । तिज येऊनियां रक्षीत । कुलदैवत खंडेराव ।। ५५ ।।

जरी नवरात्र करितां तुमचें घरीं । पत्नीस मरण होतें खरोखरी । म्हणोनी तें माझें घरीं । नवरात्र बसविलें तुमचें मी ।। ५६ ।।

आजचा हा मंगल दिन । तुज दिसला तेणें कारण । परी तूं त्याल काहीं न देऊन । रिक्त हस्तें परतविलें ।। ५७ ।।

जरी पैसा भिजवूनी हळदींत । तूं टाकिला असता झोळींत । तुझे भाग्य उजळोनि जात । काय केलेंस तुवा हें ।। ५८ ।।

तें नाना आला भानावर । त्याची पत्नीही आली समोर । म्हणे न कळत घडला प्रकार । आतां काय करावें ।। ५९ ।।

तेव्हां जानकी म्हणे हांसून । आता स्वस्थ असावे बैसून । जे दैवांत आणिलेस लिहून । तैशाचपरी घडलें कीं ।। ६० ।।

नंतर दादा येती मुंबईहून । त्यांना एक रुपया देऊन । म्हणे दोनांतच झाले कार्य पूर्ण । संपूर्ण नवरात्र सफल हो ।। ६१ ।।

एकदां जानकी असतां मुंबईत । आपुल्या भाच्याच्या घरात । पांडुरंग सदनांत । रहात होती दादरला ।। ६२ ।।

जानकी आल्याचें पाहून । लोक येती दर्शनालागून । गर्दी होई घरांतून । सांज सकाळचे वेळीं ।। ६३ ।।

लांब लांब रांगेंतून । लोक उभे राहती तिष्ठून । वेळेचें नुरतसे भान । दर्शन घ्यावया धांवती ।। ६४ ।।

एकदां सकाळचे समयास । सदाशिव गेला फिरावयास । शिवाजी पार्कचे बाजूस । दूर एक फर्लांग ।। ६५ ।।

तेथें गंगाधर सुळे म्हणून । एक मित्र भेटला येऊन । गोष्टी निघती गोष्टीवरून । जानकीवर स्थिरावती ।। ६६ ।।

तेव्हां गंगाधर बोले सदाशिवा । अरे, तुझ्या घरींही तोच देखावा । भोंदूगिरीचा दिसावा । आश्चर्य वाटतें मजला ।। ६७ ।।

कैसें येतें अंगातून । लोकां भोवती जमवून । त्यांची दिशाभूल करून । फसविता की तयांना ।। ६८ ।।

मूर्ख असती अडले जन । भोंदूगिरी न ये कळून । भोळ्या आशेवर जगून । आंधळेपणानें वागती ।। ६९ ।।

तूं माझा मित्र म्हणून । तुज सुचविलें शहाणपण । तुज न शोभे लक्षण । दंभपणाचे ऐसें हे ।। ७० ।।

तेव्हां सदाशिव बोले मित्राला । माझ्याही मनीं विचार आला । कीं स्पष्ट सांगावें मामीला । योग्य संधी पाहून ।। ७१ ।।

ऐसें तयांचे झाले संभाषण । दूर फर्लांगावर घरापासून । परस्पर जाती तेथून । घरीं येती झडकरी ।। ७२ ।।

सदाशिव शिरला घरांत । तेव्हां जानकी होती न्हाणीघरांत । त्वेषानें ती बाहेरी येत । घट्ट पकडी सदाशिवा ।। ७३ ।।

म्हणे मूर्खा काय होतास बोलत । आपुल्या मित्राला तूं सांगत । असूं आम्ही लोकांना फसवत । भोंदूगिरी करुनियां ।। ७४ ।।

तूं काय समजालास मनांत । की न कोणी यावें घरांत । तुझी आहे का हिंमत । अडविण्याची भक्तांना ।। ७५ ।।

माझ्या भक्त बालकांना । कोणी न घालावें बंधना । कीं आईच्या दर्शनाविना । विन्मुख त्यांनी फिरावें ।। ७६ ।।

तुज पाहिजे असेल प्रचिती । आतांच दाखविते शक्ति । फुका खोटे विकल्पचित्तीं । आणूं नकोस सदाशिवा ।। ७७ ।।

जानकी गेली संतापून । गदगदां हालवी दंड धरून । मुख लालबुंद होऊन । नेत्रीं तेज फाकलें ।। ७८ ।।

सदाशिव गेला थिजून । घाम फुटला दरदरून । शब्दही न फुटे मुखांतुन । थरथर कापूं लागला ।। ७९ ।।

तिने प्रश्नांचा केला भडीमार । तो सदाशिव झाला थंडगार । कळें न काय द्यावे उत्तर । खाली मान घातली ।। ८० ।।

तों त्याची पत्नी आली धांवून । काय झालें ते न कळून । पायीं घातलें लोटांगण । पदर आपुला पसरोनियां ।। ८१ ।।

म्हणे माऊली घ्यावें संभाळून । अपराध पोटांत घालून । करीं घेऊनियां निरांजन । ओवाळिलें तिला तियेने ।। ८२ ।।

जानकी जाहली शांत । देह भूमीवर झोंकत । तिज उचलोनियां ठेवत । पलंगावरी नेऊनि ।। ८३ ।।

त्याचे शालक होते घरांत । तें खुणेनेंच विचारित । त्यांना नेऊनी पडवींत । सदाशिव सांगतसे ।। ८४ ।।

मीं सकाळी गेलो फिरावयाला । शिवाजीपार्कचे बाजूला । तेथें मित्र माझा भेटला । गंगाधर सुळे म्हणोनि ।। ८५ ।।

आमच्या गोष्टी झाल्या आपसांत । भोंदुगिरी वाढली जनांत । तो विनोदें मज बोलत । कीं तूंही असशी त्यांतला ।। ८६ ।।

मामीचे देवत्व जाणून । लोक येती दर्शनाकारण । परी कधीं ढोंग उघडता जाण । शरमिंदा होशील जनांत ।। ८७ ।।

तें विचार केला मनांत । कीं मामीस सांगावें हित । ऐशा विचारें शिरता घरांत । भडीमार झाला मजवरी ।। ८८ ।।

आम्ही कुजबुजलों मैलावर । तिनें कैसें जाणलें सत्वर । अद्भुत शक्तिचा प्रकार । मामीत माझ्या आहेच ।। ८९ ।।

माझें विकल्प गेले उडोन । ही अतींद्रिय शक्ती पाहून । मन शुद्ध निर्मळ होऊन । अटल श्रद्धा बैसली पायीं ।। ९० ।।

गजानन देशमुख म्हणून । एक गृहस्थ होते जाण । त्यांच्या मुलास आलें मरण । एका अल्पशा आजारांत ।। ९१ ।।

हताश झाले दोघेजण । कामांतही न लागे मन । तीव्र येई आठवण । गेलेल्या पुत्राची दोघांना ।। ९२ ।।

बहुत केले नवसायास । तरी पुत्राची ना पुरली आस । जानकीच्या ऐकून कीर्तिस । धांव घेती चरणांशी ।। ९३ ।।

अती नम्रपणे वंदिती । म्हणे कुलाची व्हाया वृद्धि । वंशद्वीप द्यावा हातीं । एकतरी आम्हांला ।। ९४ ।।

एक सुपुत्र होता पदरांत । परी दुर्दैवे केला घात । निपुत्रिक झालों संसारांत । आशा हरपली जगण्याची ।। ९५ ।।

जानकी पाही हंसून । हातावरी कुंकू काढून । म्हणे पहावें लक्ष देऊन । काय दिसतें कुंकुवांत ।। ९६ ।।

दोन बालकांच्या दिसती आकृती । एक स्पष्ट दुजी अस्पष्ट होती । पाहोनियां मनी आनंदती । पती-पत्नी देशमुख ।। ९७ ।।

म्हणे मुलें दिसती दोन । काय आमच्या नशिबांत म्हणून । तुवां दाखविलेस दर्शन । हातांमधील कुंकवात ।। ९८।।

तेव्हां पदरी कुंकू देऊन । म्हणे लेकुरवाळी होशील जाण । आशिर्वाद तिज देऊन । संतुष्ट केले मानसीं ।। ९९ ।।

पुढें जुळे पुत्र होऊन एकास आलें मरण । दुजा मात्र राहून । जगलासे जीवनीं ।। १०० ।।

जानकीनें सुचविलें कुंकवांतुन । जरी दोन पुत्र येती जन्मून । तरी एकच नशिबीं आहे जाण । अर्थ कळलासे तयांना ।। १०१ ।।

ऐसें हे जानकीचें थोरपण । निपुत्रकासि दिला पुत्र जाण । मनोवांच्छित तें देऊन । सुखी केलें भक्तजनां ।। १०२ ।।

जया मनीं जैसा भाव । तया तैसा देई अनुभव । जानकीचा ऐसा स्वभाव । सुभक्त सारे अनुभविती ।। १०३ ।।

परी ती निश्चिंत राही बसून । लक्ष शून्याकडे देऊन । संसारात असून । नसल्यासारखी वागतसे ।। १०४ ।।

सुख, दु:ख, मानापमान । त्यांची पर्वा न करी मनांतून । स्थितप्रज्ञा परी जाण । वागत असे सदैव ।। १०५ ।।

सदा राही हांसून । ओवींत बोले आपण । तंद्री राही लागून । कुठें तरी तिच्या मनाची ।। १०६ ।।

नित्य ध्यास मनांतून । देवीचा असावा म्हणून । भक्त सान्निध्य साधून । जानकीजवळ तिष्ठती ।। १०७ ।।

म्हणोनियां भक्तजन । मनीं धरावे जानकीचरण । सर्वस्व करोनियां अर्पण । आशीर्वाद घ्यावा तियेचा ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम दशमोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*