सावली अध्याय १६ वा

।। श्री ।।
।। अथ षोडशोऽध्याय: ।।
श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

ऐशा जानकीच्या कथा ऐकून । श्रोते आश्चर्य पावती मनांतून । वाटे संपूं नयें हे कथन । श्रवणें पावती समाधान ।। १ ।।

हें श्रवणसुख लाभावें । तेणें चित्ताचे भान हरावें । भक्तिरसें ओथंबून यावें । हृदय आमुचें निरंतर ।। २ ।।

वाटे एकैक कथा ऐकून । हे भक्त किती भाग्यवान । जानकीचें लाभलें वरदान । आणि अभयकर तिचा शिरावरी ।। ३ ।।

जैशा श्रावणधारा वर्षती । धरणीतला तृप्त करिती । तृषार्ताची तृष्णा हरिती । सदैव आपुल्या जीवनें ।। ४ ।।

तृप्त होता वसुंधरा । बीजें अंकुरती सरसरा । पिकें फोफावती भरभरा । जीव सृष्टीस रिझवाया ।। ५ ।।

तैशाच ओव्या बरसती । भक्तहृदयांवर पडती । आकंठ होऊनियां तृप्ती । भक्तिअंकुर बहरती ।। ६ ।।

भक्तिचा येता बहर । वसंत न ये समोर । भक्तिची वेगळीच धुंद-बहार । उपमा नसे तियेला ।। ७ ।।

जेव्हां उचंबळे भक्तिबहर । देव स्वयें प्रकटे समोर । निर्गुणांतुनि होई साकार । नानाविध रूपांनीं ।। ८ ।।

कबीराचे विणले शेले । जातें जनीचें फिरविलें । विष मीरेचें प्राशिलें । प्रत्यक्षांत प्रकटोनी ।। ९ ।।

नाहीं पाहिली जात गोत । देखिलें नाहीं भेदभावादिक । भक्त झाले सुविख्यात । सर्वजातींत असंख्य ।। १० ।।

ऐसा हा भक्तीचा प्रकार । पहावया मिळे खरोखर । जानकीकथेंत वारंवार । आजही तो आमुच्या समोर ।। ११ ।।

तुवां केलेंस जे वर्णन । तेणें धन्य झाले कर्णनयन । तृप्त झालें आमुचें मन । आनंद-सागरीं डुंबून ।। १२ ।।

जैसे हळुवारपणें फुलांत । भ्रमर शिरोनियां बैसत । मधुर मध बैसती चाखत । भ्रमण आपुलें भुलोनियां ।। १३ ।।

तैं हळुच पाकळ्या मिटती । भ्रमर सहज त्यांत अडकती । तैसीच कांहींशी मन:स्थिति । श्रवणें आमुची होतसे ।। १४ ।।

जरी अध्याय गेला संपून । तरी मन गोष्टींत रंगून । मागेंच राहे रेंगाळून । हरपोनियां भान वेळेंचे ।। १५ ।।

गुलबकावलीपरी हें कथन । कधीं जाऊं नये संपून । रात्री मागून येई दिन । तैसें चक्र चालवावें ।। १६ ।।

म्हणोनि करिती विनंती । आणखी सागाव्या गंमती । जेणे जानकीवरील प्रीति । नवनवी राहील सदैव ।। १७ ।।

चंद्राचें पाहूनि पूर्णपण । सिंधू उचंबळे झेंपाऊन । वाटे देण्या प्रगाढ आलिंगन । एकमेकांसी पाहती जणुं ।। १८ ।।

तैसेंच भक्ताचें पूर्णपण । पाहतां नाचे दयाघन । परस्परां देती आलिंगन । देवपणातें भुलोनियां ।। १९ ।।

जानकींचे सारें जीवन । तैसेंच आलें दिसोन । सावलीपरी राहोन । भक्तांसी प्रेमे प्रतिपाळी ।। २० ।।

श्रोत्यांची पाहून उत्सुकता । समाधान वाटे मम चित्ता । आतां परिसावी पुढील कथा । आग्रहामुळें कथितसे ।। २१ ।।

कालेचा द्वितीय पुत्र शेखर । त्याची वेगळीच आवड सुंदर । वाटे चढावें पर्वतांवर । तंत्र त्याचें घ्यावें शिकोन ।। २२ ।।

पूर्वी मावळे कैसे चढले । त्यांनी पर्वतावर किल्ले बांधिले । शौर्य तेथें गाजविलें । मराठेशाहीत आपल्या ।। २३ ।।

जरी आतां नसे तो प्रकार । तरी धाडस-शौर्य असावें खरोखर । पादाक्रांत करावें शिखर । यांत भूषण वाटे शेखरासी ।। २४ ।।

तेनसिंग चढला गौरीशंकर । तेणें सौंदर्य पाहिले अपूर्व । तें चढणारा पहिला मानव । जगभर झाला प्रसिद्ध ।। २५ ।।

तेणें भारता लाभलें भूषण । भारतीय चढला हिमालय म्हणून । त्याची दिगंत कीर्ति पाहून । स्फूर्ति घेती तरुण मनें ।। २६ ।।

शेखरलाही वाटे म्हणून । आपणही करावें पर्वतारोहण । कला अवगत घ्वावी करून । शिबिरांत झाला दाखल ।। २७ ।।

मुंबईच्या कर्जत ह्या ठिकाणीं । त्यांची पडलीसे छावणी । चांदरी डोंगरावरूनी पर्वतारोहण करावया ।। २८ ।।

डोंगर दूर गांवापासून । तज्ज्ञ तेथें देती शिक्षण । दोर खिळे जाती घेऊन । मार्गदर्शन करावया ।। २९ ।।

एकेक ऐसा खिळा ठोकून । त्याला दोर्यानें घट्ट बांधून । पाऊल टाकती जपून । सावधानपणें चढती वर ।। ३० ।।

शेखर जाई चढून । एका कठीण सुळक्यावरून । तोंच अवधान त्याचे सुटून । खालीं अचानक कोसळला ।। ३१ ।।

साठ फुटांवरून । त्याला पडतांना पाहून । पडला पडला म्हणून । ओरडती सर्व मित्रगण ।। ३२ ।।

सर्व भरभर उतरती । मनांत उपजोनिया भिती । या पोराची काय स्थिती । झाली असे म्हणोनियां ।। ३३ ।।

जवळ जाऊनियां पाहती । ह्याची शुद्ध हरपली होती । रक्तानें माखली होती । देहाकृति सर्वही ।। ३४ ।।

त्याला आणिती उचलोन । पाहिलें अंग गेलें ठेंचाळुन । तो कण्हत होता म्हणून । असह्य देह-वेदनांनीं ।। ३५ ।।

हळू हळू आणिती उचलोन । तैं दिन गेला मावळून । शिबीर होतें दूर म्हणून । ओढ्या जवळी ठेविती ।। ३६ ।।

एक लांब शिळा पाहून । वरी त्याला ठेवितीं झोंपवून । सर्व बसती दोर धरून । सभोंवताली तयाच्या ।। ३७ ।।

जवळ नव्हतें काहीं साधन । जेणें त्याला न्यावें उचलोन । आणि रात्र झाली म्हणून । दळण-वळण होतें थंडावलें ।। ३८ ।।

रक्त पुसोनियां पाहतीं । तोंच शेखरला येई जागृति । म्हणे स्पर्श न करावा देहांसी । शर्ट माझा काढू नका ।। ३९ ।।

अंगांत आहे आईचा शर्ट । त्याला न करावा स्पर्श । वाटे शरीर त्याचें दुखत । म्हणून ऐसें सांगतो ।। ४० ।।

पुन्हां थोड्या वेळानें पाहती । रक्त पुसण्याचा प्रयत्न करिती । तेव्हांच येऊनी पुन्हां जागृति । तेंचि शब्द बोलतसे ।। ४१ ।।

आईचा शर्ट आहें अंगात । तो काढू नये म्हणत । आजी जवळ बैसली सोबत । तुम्हीं मला स्पर्शू नये ।। ४२ ।।

कोणा न होई अर्थबोध । वाटे बेशुद्धीत आहे बडबडत । रात्र जागोनियां काढत । अन्य उपाय नव्हता ।। ४३ ।।

खेकडे होते खडकांत । ते सर्व शरीरावर नाचत । परी देह पडला निपचित । भान कांही नव्हतें तयाला ।। ४४ ।।

ऐसी संपली रात्र भयाण । दिवस आला उजाडून । मुंबईस येती घेऊन । घरीं त्याला पोंचविती ।। ४५।।

त्या दिवशीं न झाला उपचार । दवाखान्यांत नेती सत्वर । डॉक्टरांना सांगती प्रकार । घडलेला सर्व ।। ४६ ।।

सर्व देह ठेंचाळलेला पाहून । डॉक्टरही गेले घाबरून । काहीँ हाडें गेलींत मोडून । शंका उद्भवली तयांना ।। ४७ ।।

‘क्ष’ किरणानें पाहिलें तपासून । तो आश्चर्य आलें दिसून । कोठेंही गेला तडा न । सर्व हाडे होती सुरक्षित ।। ४८ ।।

तैं शर्ट पाहती काढून । देह रक्तानें माखला म्हणून । तो स्वच्छ करिती पुसून । बाह्योपचार करिती मग ।। ४९ ।।

उत्तम पाहून देह स्थिति । डॉक्टर मनीं आश्चर्य करिती । कैसी हाडे सुरक्षित राहती । उंचावरुन पडूनही ।। ५० ।।

साठ फुटांवरून पडला । उपचारा विना राहिला । आईच्या शर्टानें वांचविला । आश्चर्य करिती सकल जण ।। ५१ ।।

शेखर असतां बेशुद्धींत । त्याला आजी बैसलेली दिसत । म्हणे शर्ट ठेवावा अंगांत । काढूं नये ती सांगतसे ।। ५२ ।।

तैसेंची तो होता बडबडत । परि अर्थ नव्हता कोणास कळत । आजी त्यास होती संरक्षित । आपुल्याच करस्पर्शानें ।। ५३ ।।

जरी शेखर पडला वरून । तरी जानकीनें घेतला झेलून । जानकीकृपेचे हे लक्षण । अन्य कैसे जाणुं शकती ? ।। ५४ ।।

प्रल्हादास झेलती नारायण । तैशीच जानकी आली धावून । भक्तांस देई संरक्षण । जे भजती अनन्यभावें ।। ५५ ।।

जे अनन्यभावें भजतीं । देव सदैव असतो सांगाती । कळीकाळाची नाहीँ भीति । हें भक्तानें घ्यावें जाणून ।। ५६ ।।

पुढें घेऊनिया विश्रांति । शेखरची झाली उत्तम प्रकृति । उपकार आईचे मानिती । चरणीं शरण जाऊनियां ।। ५७ ।।

कालेंने मज सांगितला । एक प्रसंग जीवनांतला । जो तिने स्वत: अनुभवला । काहीं वर्षांपूर्वी एकदां ।। ५८ ।।

तिच्या डाव्या वक्षस्थलीं । एक गांठ उत्पन्न झाली । हळू हळू ती दुखुं लागली । लालबुंद होऊनी ।। ५९ ।।

कुटुंब डॉक्टरकडे जाती । ते भीत भीत सांगती । घ्यावें तपासून एकांती । ‘टाटा’ दवाखान्यांत जाऊन ।। ६० ।।

‘टाटा’ चें नांव ऐकून । काला जाई घाबरून । वाटे कॅंसरचें प्रकरण । तेथे नित्य तपासती ।। ६१ ।।

जरी गांठ असेल कॅंसरची । तरी तुटेल दोरी आयुष्याची । ही गांठ वाटते मिठी काळाची । देहाभोंवती बैसलेली ।। ६२ ।।

तेव्हां जीव गेला घाबरून । आईचे सुरू झालें स्मरण । म्हणे काय तुझ्या मनांतून । मारावें ऐसे झुरून ? ।। ६३ ।।

कोणता अपराध झाला । तेणें शिक्षा देशी बालकाला । तुझा आधार आम्हांला । आज संपला काय कीं ? ।। ६४ ।।

प्रत्यक्ष वेदनेहून जाण । तिचें चिंतेनें घेरलें मन । आपणांस जाणें जगांतून । संसार हा सोडूनियां ।। ६५ ।।

जरी झालासे कॅंसर । तरी जाणें असे लौकर । मग आईचा जयजयकार । कां न करांवा मनांत ? ।। ६६ ।।

जरी पूर्ण होत बरी । ती आईची कृपा मजवरी । अथवा न होईन तरी । अल्पसेवा तितुकी घडेल ।। ६७ ।।

ऐसा दृढ निश्चय करून । ती टाटांत आली तपासून । म्हणे ऑपरेशन घ्यावें करून । शक्य तेवढ्या लौकर ।। ६८ ।।

दिवस झालासे निश्चित । काला जाई दवाखान्यांत । तत्पूर्वी तिज तपासीत । फोटो काढुनियां पाहती ।। ६९ ।।

फोटोंत आलें दिसून । गांठच नाही म्हणून । पुन्हा पाहती स्पर्शून । तो नव्हती गांठ तेथें ।। ७० ।।

आश्वर्य करिती मनांत । कालपर्यंत होती दिसत । आतां कैसी झाली गुप्त । एकाएकीं येथून ।। ७१ ।।

म्हणती तुम्ही दिसतां भाग्यवान । शस्त्रक्रियेचें आता नाहीं कारण । गांठ गेलीसे निघोन । देहामधून तुमच्या ।। ७२ ।।

तुमच्या शुद्ध देहांत । आतां रोग नाहीं दिसत । मात्र वैद्यकीय शास्त्रांत । अपूर्व वाटे हें आम्हांला ।। ७३ ।।

तिचे डोळे आले भरून । आईचे अनंत उपकार पाहून । म्हणे तुझे फिटेल न ऋण । अनंत जन्म घेऊनियां ।। ७४ ।।

आतां पायीं एकच विनंती । चरणसेवा दे जन्मजन्मांती । आपुली कर कन्या वा शिष्या मजसी । जेणें लाभो तुझी सेवा ।। ७५ ।।

या गणदेवी गांवांत । श्रीशंकराचे देवळांत । वृद्ध पुजारी होता राहत । ब्राह्मण कर्म करितसे ।। ७६ ।।

तो नित्य येई जानकीघरी । अष्टमीला अभिषेक करी । कधीं पाठ वाचे निरंतरी । जैसे आज्ञापियेलें तयाला ।। ७७ ।।

कधीं जानकी जाई मंदिरांत । दर्शन घेण्या गाभार्यांत । ब्राह्मण तिचे पायां वंदित । शिवा समोर सदैव ।। ७८ ।।

तो जाणून होता कीर्ति । जानकी प्रत्यक्ष होती अंबा-पार्वती । हीच करिल इच्छापूर्ति । माझ्या मनींची म्हणून ।। ७९ ।।

म्हणें मज रक्षावें जीवनांत । कष्ट अपार पडती संसारात । तों ती प्रेमें उपाय सांगत । सौख्य समाधान लाभला ।। ८० ।।

जेव्हां जानकीचें झालें अवसान । तो गांवांत नव्हता म्हणून । त्याला न कळले निधन । जानकीचें झालेलें ।। ८१ ।।

कांही महिन्यांनी परतला । नित्याच्या कर्तव्यांत रमला । पूजा-अर्चा करूं लागला । यजमानाचे घरांत ।। ८२ ।।

प्रत्येक अष्टमीला येई घरीं । अभिषेकादि कार्य करी । ऐसे तीन वर्षे परोपरी । ब्राह्मण कर्म करितसे ।। ८३ ।।

मुकाट्यानें येई घरांत । अभिषेक करोनियां जात । एके दिवशी सहज विचारीत । आज आई न दिसत कशा ।। ८४ ।।

तेव्हां कुसुम सांगे हंसून । तुम्हीं कैसा विचारता प्रश्न । आज आईला जाऊन । वर्षे तीन जाहली असती ।। ८५ ।।

तेव्हां ब्राहमण गेला घाबरून । काय ऐकतों हें म्हणून । जेव्हां जेव्हां करितो पूजन । आई बैसती शेजारी ।। ८६ ।।

नित्य अभिषेक संपल्यावरी । सव्वा रुपया देती मम करीं । कैसा विश्वास करावा तरी । तीन वर्षे झालीं म्हणून ? ।। ८७ ।।

आज नाहीं दिसल्या म्हणून । सहज विचारला मी प्रस्न । तों तुमचें उत्तर ऐकून । भ्रमांत मी पडलों असें ।। ८८ ।।

घरांत येतो तीन वर्षांपासून । मज कधीं न आलें हें कळून । कीं आई गेल्या जगामधून । प्रत्यक्ष दिसतां समोर ।। ८९ ।।

ब्राह्मण गेला घाबरून । म्हणे पुन्हां कधीं न येईन । जानकी विना पूजन । यथें मज करणें नाही ।। ९० ।।

सर्वांना वाटला अभिमान । कीं हा ब्राह्मण किती भाग्यवान । आई प्रत्यक्ष देई दर्शन । जवळ बैसुनी तयाला ।। ९१ ।।

जोंवरी होते अज्ञान । तोंवरी घडलें दर्शब । ज्ञानें येतां शहाणपण । पुन्हां न तयाला दिसली आई ।। ९२ ।।

कुंदा पाटणकर म्हणून । गोंदियांत राहती जाण । जानकीस भजती रात्रंदिन । भावभक्तिनें मनोमनीं ।। ९३ ।।

जानकीच्या फोटोस पूजीती । वाटे आईच बैसली पुढती । गोड गोड गोष्ट करिती । अनेक सुखद संसाराच्या ।। ९४ ।।

संसारांत येती अडचणी । फोटोस सांगतीं मनोमनीं । म्हणे घ्यावें तुवां सांभाळोनी । मायेची पाखर करूनी ।। ९५ ।।

जोंवरीं आहे तुझी माया । तोंवरी न भीति भवभया । तुझे नांव आहे तारावया । समर्थ आम्हां जीवनी ।। ९६ ।।

गोंदिया गांवांत राहती । तेथे दिवस रात्री चोर्या होती । एकटेपणाची वाटे भिति । पुरुष मंडळी गेल्यावर ।। ९७ ।।

जरी असे जाणें बाहेर । तरी जानकीस सांगती विचार । तुवां सांभाळावें घरदार । बाहेर जाऊन येतो आम्ही ।। ९८ ।।

भीतिनें असतां वावरत । एकच स्थळ वाटे सुरक्षित । जानकीच्या फोटो लगत । दागिने ठेविती रक्षाया ।। ९९ ।।

दृढ श्रद्धा असेल तरी । दैव आपुलेही काम करी । त्यांचें घरांत झाली चोरी । संसारपयोगी वस्तूंची ।। १०० ।।

धांवत फोटोजवळ जाती । तों देवची दिसले खालीवरती । आणि दागिने तेथेच असती । कांहीही न गेले त्यांतले ।। १०१ ।।

आश्चर्य सर्वांना वाटत । कीं हे समोर होते दिसत । कैसे उचलोनिया न नेत । कोणीं अडविलें तयांना ।। १०२ ।।

होणारे होऊनियां गेलें । परि मुद्याचे मात्र नाहीं गेलें । यांतच समाधान मानिलें । रक्षिलें म्हणोनियां ।। १०३ ।।

जें जें लिहीलेंसे दैवांत । तैसें नित्यचि राही घडत । परि भक्ति देतसे साथ । दु:ख हलकें कराया ।। १०४ ।।

दैवांत जें कांहीं लिहीलें । तेंही देवानेंच घडविलें । तेहां मोडणें घडणें चाले । सर्व त्याच्या इच्छेनें ।। १०५ ।।

चोर चोरी करूनियां जाती । त्यांना कोणी दिली मती । ऋणानुबंध ऐसे फिटती । एकमेकांचे देऊन ।। १०६ ।।

म्हणोनि मागती सन्मती । जियेनें न चळे स्व-वृत्ती । तुझें स्मरण असावें चित्तीं । नी नाम निरंतर मुखांत ।। १०७ ।।

म्हणोनियां श्रोतेजन । नित्य असावें सावधान । जानकीचें केल्याविना स्मरण । दिन न एकही ढळों द्यावा ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम षोडशोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*