सावली – अध्याय १ ला

।। श्री ।।
।। अथ प्रथमोध्याय: ।।

श्रीगणेशायनम: ।श्रीसरस्वत्यै नम:
।श्रीकुलदेवतायनम: ।श्रीगुरुभ्यो नम: ।

मनोभावें वंदुनि । श्री गजाननाचे चरणीं ।
आशिर्वाद घ्यावा म्हणोनी । वारंवार प्रार्थितसे ।।१।।

गजानना गणराया । कार्यारंभातें कराया ।
देवही पडती तव पायां । गण गंधर्व तसेचही ।। २ ।।

तुझा महिमा थोर । सकल भुवनावर अधिकार ।
सर्व कार्याचा सूत्रधार । मोरेश्वरा तूंच असशी ।। ३।।

तूंच असशी ओंकार । सृष्टीमाजी निराकार ।
सगुणरुपें साकार होऊन येशी पृथ्वीवरी ।। ४ ।।

शिवशक्तीचा पुत्र थोर । मोदकप्रिय मोरेश्वर ।
दुष्ट दैत्यांचे संहार । तूच केले अनेक ।। ५ ।।

सकल विघ्नें हरोनी । मनोवांछित तें देऊनी ।
देवादिकां केले ऋणी । तव कृपाप्रसादें ।। ६ ।।

श्रीव्यासांची प्रसादवाणी । वरी चपळ तव लेखणी ।
श्रीमहाभारती अवतरोनी । अक्षर झाली जगांमाजी ।। ७ ।।

श्रीव्यासमुनी करिती कथन । विचारार्थ थांबता एक क्षण ।
तें गणेशपुराण । लिहुनी पूर्ण केलेंस तू ।। ८ ।।

ऐसी तुझी दिव्य मति । रिद्धि-सिद्धि तव सांगाती ।
सर्व गणांचा अधिपती । गौरीपुत्रा विनायका ।। ९ ।।

माझ्या मनीची वासना । पुरवावी तूं गजानना ।
देवीचरित्र-लेखन कामना । पूर्ण घ्यावी करोनी ।। १० ।।

ती देवी न अन्य कोणी । श्री भगवती तव जननी ।
तिच्या सद्गुणगायनीं । मन्मति करावी प्रकाशित ।। ११ ।।

मज करवी घ्यावें लिहून । सप्तशतीचे अभिनव कथन ।
मृत्यूलोकीं अवतरून । कैसे कार्य करीतसे ।। १२ ।।

आता वंदितो श्री सरस्वती । जी मूळ विद्येची निर्मिती ।
वाग्देवतेची साक्षात मूर्ति । नमन माझे तिच्या पायी ।। १३ ।।

कालिका, लक्ष्मी, सरस्वती । ऐसी तुझी मूळ प्रकृती ।
सर्व मायेची भ्रमंती । विश्वाला तू कारण ।। १४ ।।

तूंच विश्वाला निर्मुनी । जाहलीस जगज्जननी ।
पंचभूतांत राहुनी । प्रतिपाळीशी क्षणोक्षणीं ।। १५ ।।

सर्व भाषा ज्ञान विज्ञान । तव मुखींचे शब्द होऊन ।
प्रसादरुपें अवतरून । ज्ञानरुपें प्रकटती ।। १६ ।।

जें सकल विश्वाचें ज्ञान । जें सकल सृष्टीचें चैतन्य ।
शव्दब्रह्मांड फोडून । साकारिलेंसे तव रुपें ।। १७ ।।

मजवरी कृपा करोनी । स्फूर्ति द्यावी स्फुल्लिंगोनी ।
वाटे चालवावी लेखणी । तव गुण गौरवार्थ ।। १८ ।।

आतां नमन कुलदेवतेला । एकवीरा-नवलाईमातेला ।
तिच्या पदीं ठेवूनियां माथा । आशिर्वाद मागतसे ।। १९ ।।

मी तुझा लाडका लेक । मारोनिया आर्त हांक ।
पुरवावी माझी भाक । म्हणोनी प्रार्थितसे ।। २० ।।

ऐसें कधी न घडलें । कीं जें आईनें न ऐकलें ।
पुत्राचे लाड पुरविले । आवडीनें धांवोनी ।। २१ ।।

स्वयें यज्ञकुंडांतुनी प्रकटलीस माझे सदनी ।
माते तूं भद्रकारिणी । आमच्या कुलास जाहली ।। २२ ।।

युद्धें केलीस अपार । वरी प्रसविला एकवीर ।
दुष्टांचा करूनी संहार । बालकें रक्षीलींस युगीं युगीं ।।२३।।

ती युगा युगांची गाथा । नूतन नवीन ऐसी कथा ।
मन वांछितसे लिहिण्याकरितां । सिद्धता द्यावी प्रयत्नाला ।।२४।।

बालकाचे बोबडे बोल । आईस वाटती अनमोल ।
जरी न जुळती सुर-ताल । कौतुकाते करितसे ।। २५ ।।

म्हणोनी करितों विनंती । कीं मज द्यावी अंत:स्फूर्ति ।
तुझी गावया कीर्ति । नित्य नवनवी ऐसी ।। २६ ।।

आता नमन सद्गुरुला । भाऊकाकांच्या पदकमला ।
पूर्व सुकृतें लोभ जडला । सद्गुरु भक्ती करण्याचा ।। २७ ।।

मजवरी तुमची प्रीति । म्हणोनी जडली दिव्य नाती ।
सारें जीवन तुमचे हाती । जन्मजन्मांतरीचे । केलें असे ।। २८ ।।

सत्कर्माची धरतां कास । तेथें गुरुंचा नित्य वास ।
सन्मार्ग दाविती भक्तांस । स्वयें पुढती घेऊनी ।। २९ ।।

जी जी भक्ताची कामना । ती त्या सद्गुरुचीच वासना ।
भक्त सद्गुरुची यंत्रणा । चालविता धनी वेगळाची ।। ३० ।।

सद्गुरु सारिख्या विभूती । ज्या अन्यत्र जगीं येती ।
पतितां पावन करिती । परपीडा हरोनियां ।। ३१ ।।

संत असती पतितपावन । तेची खरे लक्ष्मी-नारायण ।
त्यांचे करितां गुणगान । सुभक्त उद्धरती असंख्य ।। ३२ ।।

म्हणोनी हें संतचरित । वाटे लिहावे उत्स्फूर्त ।
गायनी तसेच सुभक्त । ऐसि इच्छा अंतरीं ।। ३३ ।।

तुमच्या सुप्त प्रेरणेनें । मज हें सत्कार्य करणें ।
जानकी जीवन सांगणें । सकल भक्त जनांपुढे ।। ३४ ।।

तरी हें जानकीजीवन । घ्यावें करोंनी पूर्ण ।
म्हणोनी करितों स्मरण । सद्गुरुराया भाऊकाका ।। ३५ ।।

आता नमन श्रीवेतोबाला । सद्गुरुच्या आराध्यदैवताला ।
ज्यांनी उपकार बहुत केला । मज दाखवोनी सन्मार्ग ।। ३६ ।।

आरवलीचें श्रेष्ठ दैवत । रुद्रावतारी आद्य भगवंत ।
माझें भाग्य असे उजळीत । सद्गुरु हाती देवोनियां ।। ३७ ।।

माझी मनीषा पूर्ण केली । ‘विसावा’ पूर्ति जाहली ।
तैशीच कामना उद्भवली । तीही करावी परिपूर्ण ।। ३८ ।।

तुमचा न पडावा विसर । स्फूर्तीत करावा विहार ।
कल्पनाद्वारें विस्तार । कथनाचा ह्या करावा ।। ३९ ।।

मज ज्या गोष्टी न माहीत । त्या तव कृपें व्हाव्या अवगत ।
जानकी जीवनाचे गुपीत । प्रकट व्हावें म्हणोनियां ।। ४० ।।

श्रीवेतोबा करुणाकरा । रुद्रप्रिया शुभंकरा ।
माझा संकल्प पूर्ण करा । कूर्म दृष्टीनें आपुल्या ।। ४१ ।।

आता सकल श्रोते जन । तुम्हांस करूनी वंदन ।
तुम्हां जानकी जीवन । पावन करी गंगेपरी ।। ४२ ।।

पूर्वी हे ऐसे कथन सावर्णिक मन्वंतरांतुन ।
मार्कंडेयपुराणामधुन । देवीमहात्म वर्णिले ।असे ।। ४३ ।।

अजन्मा जन्मासा आली । पृथ्वीवरी अवतरली ।
दैत्यां गाडूनी पाताळीं । देवादिका सुखी करी ।। ४४ ।।

ती तिची सुरम्य कथा । देव मानव नित्य ध्याता ।
आणि युध्दाची गौरवगाथा । ‘सप्तशति’ वर्णितसे ।। ४५ ।।

श्रीविष्णु असता निद्रिस्त । शेषशय्येवरी शांत ।
मधु-कैटभ राक्षस निघत । कर्णांतून विष्णूच्या ।। ४६ ।।

ते विष्णूवरी येती चालत । हें विरंची असे पाहत ।
भयें निद्रादेवीसी प्रार्थित । जागृती यावी म्हणोनियां ।। ४७।।

ऐकोनी ब्रह्मदेवाची स्तुति । माया प्रकटे ब्रह्मयापुढती ।
श्रीविष्णूस येई जागृति । सज्ज होई तो युद्धाला ।। ४८ ।।

सहस्र वर्षे चाले युद्ध । म्हणोनी माया दैत्यांना मोहीत ।
मधु-कैटभांना मारी त्वरीत । माया देवीच्या सहाय्यानें ।। ४९ ।।

जेव्हां महिषासूर झाला प्रबळ । देवादिकांची उडे तारांबळ ।
इंद्रही झाला दुर्बळ । राज्य गेले म्हणोनियां ।। ५० ।।

तेव्हां देव गंधर्व मिळोनि । ब्रह्मा-विष्णु-शिवा सांगोनी ।
कांही योजना करावी म्हणोनी । प्रार्थिती ते वारंवार ।। ५१ ।।

सर्व देव कोपले अनावर । तै घडला एक चमत्कार ।
तेज निघालें अति प्रखर । देहांमधून देवांच्या ।। ५२ ।।

प्रचंड तेजोगोळ झाला । व्योमोंपृथ्वीतलीं व्यापला ।
स्त्रीदेहांवर पावला । प्रचंड चंडिका म्हणोनी ।। ५३ ।।

तिची प्रचंड काया पाहून । देवादिक जाति संतोषून ।
आपापलीं आयुधें काढून । भेट देती माउलीला ।। ५४ ।।

कोणी देती वस्त्रभूषणें । कोणी अलंकार कंकणें ।
शस्त्रादि युद्ध साधनें । देऊनियां भूषविती ।। ५५ ।।

वरी स्तुती केली अपरंपार । पदी वंदोनी वारंवार ।
माये करी गे उपकार । बालकांवरी आपुल्या ।। ५६ ।।

दैत्य माजले फार । केला राज्यांचा अपहार ।
घेतला देवांचा अधिकार । बळकावोनियां सर्व ।। ५७ ।।

तेव्हां अभय देऊनी देवांना । प्रचंड करोनिया गर्जना ।
म्हणे तुमची ऐकून प्रार्थना । प्रसन्न जाहलें असें मी ।। ५८ ।।

ती सज्ज जाहली युद्धाला । पाहोनी दैत्य सावध झाला ।
परी मारिती झाली दैत्याला । युद्धामध्ये त्वरित ।। ५९ ।।

राज्य अर्पिले इंद्राला । देवांनाही हर्ष जाहला ।
ऋषि मुनिंनी जयघोष केला । स्तुतिस्तोत्रांनी माऊलीचा ।। ६० ।।

चंडिका जाहली प्रसन्न । म्हणे तुम्हा देते मी वचन ।
जेव्हां जेव्हां पिडाल दैत्यांपासून । तेव्हां अवतरेन मी रक्षावया ।।६१।।

तुमचा करीन मी सांभाळ । कुलें उद्धारीन सर्वकाळ ।
मनोवांच्छित तें देईन । अभय असे तुम्हाला ।। ६२ ।।

ती तिची अभयवाणी । कलीयुगीं येते दिसूनी ।
जन्म घेऊनी नाना योनी । वचनाला ती जागत असे ।। ६३ ।।

मानवतेचें करावया कल्याण । दु:खांचे कराया निवारण ।
पतितां कराया पावन । अंबिका जन्मे मृत्युलोकीं ।। ६४ ।।

तेची जाहले संत । कलियुगी प्रत्यक्षांत ।
देवी आज्ञेनें वागत । कार्य कराया तियेचें ।। ६५ ।।

ऐसी ही अभिनव कथा । जन्म घेई जगन्माता ।
साहोनी स्त्रीजन्मव्यथा । दया ठेवुनी अंतरी ।। ६६ ।।

कारण या कलियुगांत । द्वेष कलह वाढती बहुत ।
दु:ख पावती साधुसंत । सुख-शांती नासली।।६७।।

स्वार्थ वाढला बहुत । भेदभाव करिती देवांत ।
सत्याचा जाहला अंत । मानवताही लोपली ।। ६८ ।।

दु:खें गांजली जनता । हाक ऐके जगन्माता ।
चित्त प्रेमाने द्रवतां । धांव घेई झडकरी ।। ६९ ।।

महाराष्ट्र राज्यांत । महाड जवळील जिल्ह्यांत ।
पोलादपुरच्या गांवांत । अंबा असे जन्मली ।। ७० ।।

चित्रे रामकृष्ण गणपत । वडील लाभती भाग्यवंत ।
त्यांचे कुळी जन्मा येत । सुकन्या एक सुलक्षणी ।। ७१ ।।

‘दुर्गा’ नांव असे ठेवीलें । चित्र्यांचे भाग्य उदेलें ।
स्वप्न आईनें रंगविलें । तेंचि भंगले नियतीमुळे ।। ७२ ।।

मनुष्य करितो कल्पना । परि नियतीचे विकल्प नाना ।
पूर्व नियोजित संकल्पांना । अर्थ वेगळाच लाभतो ।। ७३ ।।

दुर्गेची आई निवर्तली । दुर्गा पोरकी जाहली ।
तिज आजोळी असे धाडिली । मालुस्तें गावांत ।। ७४ ।।

आजोबा आणि आजी । दुर्गेवर होते राजी ।
तिची सांभाळून मर्जी । प्रेम माया ते करिती ।। ७५ ।।

हळूहळू वाढलें बालपण । परि वेगळेंच दिसे लक्षण ।
पूजा अर्चा देवध्यान । यांत मग्न होई ती ।। ७६ ।।

मालुस्त्याची ग्राम देवता । मालजाई नामे असतां ।
नित्य तिच्या पूजेकरितां । फक्त कुमारिका लागतसे ।। ७७ ।।

पांचव्या वर्षापासून । दुर्गा जाई फुलें घेऊन ।
पूजा करी आनंदून । श्रीमालजाई देवीची ।। ७८ ।।

कधी म्हणे आजोबाला । मज दूध द्यावे नैवेद्याला ।
बालपणाच्या हट्टाला । नाही कोण म्हणणार ।। ७९ ।।

नित्य जाई मंदिरांत । दूध नेई नियमीत ।
परि आजोबाचे मनांत । शंका असे जाहली ।। ८० ।।

दुर्गेवरी ठेवुनी पाळत । मागोमाग जाती मंदिरांत ।
दृश्य पाहतां प्रत्यक्षांत । आश्चर्य करिती मनोमनी ।। ८१ ।।

मालजाईला फुले वाहिली । नमस्कारोनिया परतली  ।
शिवपिंडी जवळ आली । पारावरी बाहेर  ।। ८२ ।।

फुलें वाहिलीं पिंडीवर । दूध ठेविलें समोर ।
केला तिने नमस्कार । तोंचि आश्चर्य देखिलें ।। ८३ ।।

भुजंग आलासे समोरून । दूध गेलासे पिऊन ।
दुर्गा मात्र वंदून । निघालिसे झडकरी ।। ८४ ।।

ऐसे घडतसे नित्य । आजोबा ठेवितीं मनांत ।
वाटे सारें हे अघटित । नात ही कैसी कळेना ।। ८५ ।।

मालुस्त्याच्या सीमेवर । झाड आळूचें सुंदर ।
मुलें जाती वारंवार । खेळावया लपंडाव ।। ८६ ।।

त्याला मधुर फळें येती । ती तोडावया मुलें जाती ।
सर्प वृक्षावर वावरती । म्हणोनी अशक्य मुलांना ।। ८७ ।।

परी दुर्गा जातां वृक्षाजवळी । सर्पाची होय पळापळी ।
फळें तोडुनियां सगळी । वाटीतसे ती मुलांना ।। ८८ ।।

ही गोष्ट कळली आजीला । आणि जीव दोघांचा घाबरला ।
धाक घालितसे मुलांना । जाऊं नये म्हणोनिया ।। ८९ ।।

त्या आळूचे झाडाभोंवती । भुतांची आहे वस्ती ।
तरी न जावें सीमेवरती । सांगतसे मुलांना ।। ९० ।।

ऐसे कांहीं मास लोटले । वरी नवरात्र जैसे दिवस आले ।
आणि मुलांचे लक्ष गेलें । सीमोल्लंघन करावया ।। ९१ ।।

नवरात्र जैसे उजाडलें । पुनश्च सर्व गोळा झाले ।
आणि फिरावया गेले । आळूचेच झाडापाशीं ।। ९२ ।।

जैशी संध्याकाळ झाली । तैसीं मुलें घरीं परतालीं ।
मात्र दुर्गा न दिसली । म्हणोनी चिंता करिती सर्व जण ।। ९३ ।।

अजोबांचे व आजीचें । पाणी पळालें तोंडचें ।
कोठे दुर्गेला शोधावयाचें । रात्र झालीसे भयाण ।। ९४ ।।

जमले सर्व गांवकरी । शोध घेती सर्बतोपरी ।
वाटे की श्वापदाकरीं । बाळ गेलें की कळेना ।। ९५ ।।

घरीं जाहला आकांत । कारे देवा पाहसी अंत ।
दुर्गेला देई अंकांत । झटकरी आमुच्या ।। ९६ ।।

ऐसे काही दिवस लोटले । वाटे आतां सर्व संपलें ।
तोंची कानीं वृत्त आलें । दसर्याचेच शुभ दिनी ।। ९७ ।।

गांवकरी होता सांगत । कीं कडाप्याच्या मंदिरांत ।
दुर्गेला मी पाहत । तरी चलावें झडकरी ।। ९८ ।।

आजोबा जाती धांवत । तों दुर्गा दिसली मंदिरांत ।
गाढ होती निद्रिस्त । देवी कालिकेच्या सन्निध ।। ९९ ।।

सावध करूनी तिजला । घरीं आणिती दुर्गेला ।
आनंदी – आनंद जाहला । आभार मानीती देवाचे ।। १०० ।।

कोठें होतीस म्हणोनी । तिज पुसिलें सर्वांनी ।
म्हणे देवीच्या सन्निधानीं । गेले होते खेळावया ।। १०१ ।।

मज भेटल्या देवता । त्यांनी उचलोनी नेतां ।
राहिलें त्यांचे सांगाता । आज धाडती येथें त्या ।। १०२ ।।

रास – गरबा खेळलें । गीतें जोगवा गायीले ।
मिष्टान्न बहुत जेवलें । आनंदानें दिन तेव्हां ।। १०३ ।।

वाटें न यावें परत । बहुत होते आनंदात ।
वाटे की देवीसंगत । सोडूं नये कधींही ।। १०४ ।।

हट्ट धरिला बहुत । कीं मज न पाठवावे परत ।
परी सांगती निश्चिंत । असावें तू धरतीवरी ।। १०५ ।।

तुज संगे आम्ही राहूं । सुख दु:ख सारें साहू ।
तव कीर्ति आम्ही पाहूं । विजयी होशील लाडके ।। १०६ ।।

मी जाहलें जागृत । तेव्हां आजोबा होते संगत ।
ऐसा अनुभव सांगत । दुर्गा होती सकळांना ।। १०७ ।।

ऐसे जानकीचें बाळपण । सांगता माझें मन ।
पुढील कथेचे करितों निरूपण । सावधचित्तें परिसावे ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम प्रथमोऽध्याय: । श्री जगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*