सावली अध्याय ४ था

।। श्री ।।
।। अथ चतुर्थोऽध्याय: ।।
श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

मागील अध्यायीं कथिलें । की दरुवाड्यांत घर घेतलें । जें भुताटकीनें होतें घेरलें । ते मुक्त केलें माऊलीनें ।। १ ।।

भुतें मुक्त झाली ऐकून । पूर्वीचा मालक आला धावून । म्हणे मज द्यावी खोदून । संपत्ती माझ्या घरातली ।। २ ।।

खोदतांना कांहीं पडलें । ते बांधून देईन चांगलें । वाटे नशिब माझें उघडलें । कृपें प्रयत्न द्यावा करून ।। ३ ।।

जानकी सांगतसे तयाला । कीं मूळ पुरुष तेथें बैसला । भुजंग होऊनी राहिला । वावरतसे सदैव ।। ४ ।।

तुवां न करावा प्रयत्न । अपमृत्यु न घ्यावा ओढून । तुझ्या दैवात नाही धन । व्यर्थ श्रम करूं नये ।। ५ ।।

परी नम्र वंदनें विनवून । परवानगी घेई मिळवून । संरक्षण घेई मागून । दैवाचा योग पहावया ।। ६ ।।

हळु हळु पाहे खोदून । परी कोळसे आले निघोन । जानकी बोले हांसून । हेंचि कर्मात लिहिलें तुझ्या ।। ७ ।।

तेव्हां खजील झाला मनांत । दुर्दैव आपुलें म्हणत । अपराधाची क्षमा मागत । मूर्खपणाबद्दल आपुल्या ।। ८ ।।

तो भुजंग होता सेनापती । ज्यानें पुरली होती संपत्ती । त्याने न घेतली मुक्ती । दर्शना येई जानकीच्या ।। ९ ।।

रात्र रात्र ती न झोंपत । पहाटे पर्यंत असे जागत । कधीं उठोनिया जात । मागील अंगणांत ।। १० ।।

तिला उठतांना पाहून । कुसुमही उठे तत्क्षण । हळूच जाई मागून । ओट्यावरती उभी असे ।। ११ ।।

अंधारलेल्या रात्रींत । आई तिला विचारीत । तुज काय असे दिसत । समोर पहावें म्हणून ।। १२ ।।

ऐसें वाटे कीं दुरून । एक दिवा येई दिसून । वाटे प्रकाश कीं सरकून । आपुल्या दिशे येतसे ।। १३ ।।

हळु हळु आला जवळ । तेव्हा जाणवें वळवळ । तो भुजंग होता केवळ । मणिधर नाग प्रत्यक्ष ।।१४ ।।

थोडा असतां तो दूर । खुणेनें थांबवी त्या सत्वर । मुलींस पुसे घाबरणार । नाहीं ना तू तयाला ।। १५ ।।

नकारार्थी हलविता मान । तै येण्याची त्या केली खूण । भुजंग जवळ येऊन । फणा ठेवितसे पदकमलीं ।। १६ ।।

तेंव्हा प्रत्यक्ष घडे दर्शन । जेव्हां बैसला फणा उघडोन । शिरीं मणी होता म्हणून । प्रकाश पडे चोहींकडे ।। १७ ।।

सुपासारिखा मोठा फणा । वरी जखमेच्या दिसल्या खुणा । म्हणून जानकीच्या दर्शना । वाटे कीं आलासे ।। १८ ।।

फण्यावरी फिरविला हात । कुंकू लाविलें जखमेंत । वरी तयाला सांगत । पंधरा दिन यावें तुवां ।। १९ ।।

जातांना दिसलें शरीर । लांबलचक काळे भोर । परी वृद्ध वाटला जर्जर । केस पिकलेले देहावरी ।। २० ।।

प्रश्न कुसुमनें विचारला । हा कोण कोठुनी आला । म्हणे हाचि जो धनावरला । दर्शन घ्याया आलासे ।। २१ ।।

तो जेथें आहे रहात । तेथील झाड पडलें डोक्यांत । तेणें जखम झाली फण्यांत । अंगारा लावण्या आला तो ।। २२ ।।

असा तो नित्य असे येत । दिन पंधराव्यापर्यंत । सर्व मुली त्याला पाहत । रात्रींच्याच समयीं ।। २३ ।।

ऐंसा कर्दनकाळ कालिया । येई जानकीपदां वंदाया । त्याला देऊनी प्रेम माया । पूर्ण बरा केलासे ।। २४ ।।

ज्याला सर्वत्र दिसे ईश्वर । तो प्रेमांत न करी अंतर । पशु-पक्षी-नर सर्वांवर । सारखीच माया करी सदा ।। २५ ।।

जानकीच्या गौशाळेंत । एक रेडाही होता बसत । उंच धिप्पाड शांत । भीति वाटे बघणार्याला ।। २६ ।।

घराचे पुढील भागांत । रेड्याला होतें बांधत । खांबाला ओट्यालगत । वेगळाची गुरांपासुनी ।। २७ ।।

जानकी सर्वांना सांगत । हा बंधु होता पूर्व जन्मांत । आतां रेडा होऊनी राहत । सदैव माझ्या घरीं ।। २८ ।।

नित्य रात्रीं झोपण्यापूर्वी । जानकी बसे ओट्यावरीं । रेडा मान ठेवी मांडीवरी । थोपटीत असे तयाला ।। २९ ।।

वरी तयासी बोलत । वाटे तोही साद देत । अंगावरी फिरवुनी हात । उठा म्हणतां उठतसे ।। ३० ।।

ऐसी मुक्या प्राण्यांच्या संगत । तिचें चाले मनोगत । तेही हुंकारुनी व्यक्त । भाव आपुला करिती ।। ३१ ।।

एकदां गणदेवी गांवांत । देवीचा रेडा होता फिरत । होता आडदांड, दणकट । गोंधळ घाली गांवांत ।। ३२ ।।

नासधूस करी शेतांत । तरीही कोणी नावरीत । देवीचा म्हणूनी भीत । मारावया तयाला ।। ३३ ।।

त्याच्या लाथा गोंधळांत । गांव झाला भयभीत । त्याला पाहुनियां पळत । मुलें, गुरे, माणसेंही ।। ३४ ।।

ऐसा तो फिरत फिरत । आणि येऊनीयां मस्तींत । उभा ठाकला रागांत । झुंज घ्याया घरापुढें ।। ३५ ।।

दादांचा रेडा होता शांत । परी येणारा होता रागांत । नजरेला नजर देत । उभे राहिले समोर ।। ३६ ।।

दादांनी पाहिलें समोर । तों चित्र होतें भयंकर । वाटे झुंज आता होणार । मरेल रेडा आपुला ।। ३७ ।।

म्हणोनि सांगती जानकीला । कीं कुर्हाड द्यावी मजला । मीं आपुल्याच रेड्याला । जीवें मारितों स्वहस्तें ।। ३८ ।।

याची न आतां धडगत । तो न ठेविल जीवंत । त्यापूर्वीच घालू दे डोक्यांत । घाव माझ्या कुर्हाडीनें ।। ३९ ।।

जानकी आली धावत । आणि नजर रेड्यावरी रोखीत । तेव्हा पती क्रोधे सांगत । काय बघशी वेड्यापरी ।। ४० ।।

तूं न ऐकशील जरी । मी उडी घेईन सामोरी । रेड्यांचे मध्यंतरी । उभा राहीन त्वरीत ।। ४१ ।।

ऐसें पतीचें ऐकतां भाषण । जानकीने उचलला रज:कण । तो रेड्याप्रति फेकून । जावें म्हणे येथूनी ।। ४२ ।।

तैं तो क्रोधे भरलेला । रेडा माघारी फिरला । भयें तेथोनीं पळाला । पुन्हा न आला गावांत ।। ४३ ।।

धांवा राजाचा ऐकून । धावून आले नारायण । गजेन्द्रा मोक्षांतें देऊन । उद्धरिला पशु कीं ।। ४४ ।।

जैसें ज्ञनदेवांनी । म्हैशामुखीं वेद म्हणवुनी । मुक्ति पशुला देऊनी । धन्य केलें जीवनीं ।। ४५ ।।

तैशीच म्हैशाची मूकवाणी । ऐकून धावली जननी । मुक्त दोघांना करूनी । पावन केलें जीवनीं त्यां ।। ४६ ।।

जेव्हां चिचुंद्री फिरे घरांत । वाटे श्रीलक्ष्मीच कीं वावरत । ऐसा जुना आहे प्रघात । परंपरेनें ऐकलेला ।। ४७ ।।

ऐशाच एकदां सात । चिचुंद्र्या फिरती घरांत । वावरती देव खोलींत । सायंकाळचे समयाला ।। ४८ ।।

मुलीही होत्या खोलींत । त्यांना वाटली गंमत । कैशा या फिरती रांगेत । शेपटीला धरोनियां ।। ४९ ।।

मालू सांगे आजीला । कैशा गंमतीनें चालल्या । चिचुंद्र्या पहावयाला । येई तूं झडकरी ।। ५० ।।

जानकी येऊनिया पाहत । तों पाठोपाठ होत्या सात । म्हणे झाकोनिया त्वरीत । टाकावें कीं तयांना ।। ५१ ।।

जैशा शिरती कोपर्यांत । वरी वस्त्रातें टाकीत । आणि झाकोनियां ठेवीत । रात्रभरी तयांना ।। ५२ ।।

दुसर्या दिवशीं सकाळीं । आठवण तयांची जाहली । वस्त्र सारोनी पाहिली । स्थिती कैशी असे म्हणोनियां ।। ५३ ।।

जैसें वस्त्र केलें दूर । चिचुंद्र्या नव्हत्या समोर । गुलाबाची फुलें सुंदर । सात होती ऐवजी ।। ५४ ।।

चिचुंद्र्यांची फुलें झालीं । ती सर्वांनींच पाहिलीं । श्रीलक्ष्मीच कीं अवतरली । वाटतसे तयांना ।। ५५ ।।

घरांत चाले संभाषण । तों दादा येती समोरून । फुलें हातांत घेऊन । मुलीं दाखविती तयांना ।। ५६ ।।

जानकी पुजा होती करित । म्हणे घ्यावी फुलें हातांत । आनंदानें होतीं नाचत । सर्व पाहती टकमक ।। ५७ ।।

फुलें उधळली शिरावर । आणि काय आश्चर्य तर ! । रुपये होऊन घरभर । पसरलें कीं सर्वत्र ।। ५८ ।।

सर्व धावले खोलींत । म्हणे पाऊस पैशांचा पडत ।आश्चर्यें होऊनीं स्तिमित । पदीं लागतीं जानकीच्या ।। ५९ ।।

तेव्हां ती बोलें हांसून । दादांनाच उद्देशून । मी हीच लक्ष्मी जाणा । तुमच्या घरची असे कीं ।। ६० ।।

चांदीचे रुपये मोजून । पाहतां बेचाळीस निघाले जाण । म्हणे ठेवा कीं हे जपून । श्रीकृपाप्रसाद तुम्हांपाशीं ।। ६१ ।।

तैशीच दुसरी घडली कथा । तीन चिंबोर्या येती एकदां । पाणेर्याजवळ वैसतां । सहज लक्ष गेलें कुणाचें ।। ६२ ।।

तेव्हां जानकी तया बोलली । कीं झाकाव्या त्या टोपलीखालीं । रात्रभर तैशीच ती ठेवावी । झांकोनियां तयांना ।। ६३ ।।

दुसरे दिनी सकाळी टोपली काढोनी पाहिली । चिंबोर्याऐवजी दिसली । तीन लिंगें चिमुकली ।। ६४ ।।

तीं मुलांना दिली वाटून । सांगे पूजेत ठेवा ही म्हणून । शिव करील कल्याण । सांभाळ तुमचा करोनी ।। ६५ ।।

द्राक्षापरि तीं होतीं लहान । आज सजीव जैशीं वाटून । मोठी झाली आहेत म्हणून । करिती सर्व आश्चर्य ।। ६६ ।।

आणि श्रावणमासापासून । तीर्थ निघे त्या लिंगांतून । वाटीही जाई भरून । वाहूं लागे तें बाहेर ।। ६७ ।।

तीर्थ वाटे जैसे अमृत । मधुर केशर मिश्रित । प्राशितां वाटे अद्भुत । करणी अशी देवीची ।। ६८ ।।

श्रावणमासीं सोमवारीं । अभिषेक झाला शिवावरी । भोजनादि झालें दुपारीं । सर्व बैसलें अंगणांत ।। ६९ ।।

तैं अचानक वारा उठला । पानेंपाचोळा गोळा झाला । बेल झाडाजवळ जमला । एकत्र कैसा कळेना ।। ७० ।।

सर्व पाहती गंमत । ढीग पानांचा जमत । जणू वाटे तें दिसत । शिवलिंग समोरी ।। ७१ ।।

आश्चर्ये चर्चा चालत । तों जानकी येऊनी सांगत । प्रत्यक्ष आले भोलेनाथ । दर्शन तुम्हां द्यावया ।। ७२ ।।

वार्यासवें आली फेरी । प्रचिती दाखविली समोरी । शिव अभिषेक स्वीकारीं । प्रसन्न असे तुम्हांवर ।। ७३ ।।

ती पाचोळ्यांची पिंडी । सर्वांनी भावें वंदिली । त्यानंतर ती विखुरली । नजरेसमोर तयांच्या ।। ७४ ।।

एकदां जानकीची मैत्रीण । आली तीर्थयात्रा करून । सांगे ती प्रवास वर्णन । मुली ऐकती उत्सुकें ।। ७५ ।।

आबुला आलें जाऊन । अंबाजीचें घेतलें दर्शन । अति सुंदत आहे ध्यान । नयन लोभावे ऐसें ।। ७६ ।।

तिचें ऐकून भाषण । उत्सुकता वाटे मनांतून । मुली सांगती विनवून । ती गेल्यावर आईला ।। ७७ ।।

काला सांगतसे आईला । कीं आपणही जाऊं आबुला । जरी तूं नेशील आम्हांला । आम्ही येऊ तुज सवें ।। ७८ ।।

परी हात लावूनी कपाळाला । ती सांगतसे कालेला । कीं येथे योग नसे लिहिला । तुम्हासवें जावया ।। ७९ ।।

तेव्हां मालू बोले हांसून । कीं मी मोठी जेव्हां होईन । तुज निश्चितच मी नेईन । माझ्यासवें अंबाजीला ।। ८० ।।

ऐसें विनोदें हास्य करून । त्यांचें चाले संभाषण । मुली गेल्या उठोन । अभ्यास आपुला करावया ।। ८१ ।।

तेचि सायंकाळचे समयीं । जानकी अंगणातून येई । दिसे अंगावर-डोई । चुंदडी असे घातलेली ।। ८२ ।।

चुंदडी पाहता शिरीं । काला हसून विचारी । आज काय विचित्र तरी । आई तुझें रूप हें ।। ८३ ।।

तेंव्हा ती सांगे हांसून । आबुस आलें जाऊन । चुंदडी भेट म्हणून । देवीं अंबेनें दिली असे ।। ८४ ।।

तिचें घेऊनियां दर्शन । पावागडीं गेलें तत्क्षण । महाकालिकेला भेटून । आतांच येथें पातलें ।। ८५ ।।

प्रेमें दिधलें आलिंगन । बर्फी दिली प्रसाद म्हणून । चुंदडी दिली ओटी भरून । माऊलीनें माझिया ।। ८६ ।।

देवाजवळ बैसली । चुंदडी मुलींना दाखवली । प्रसाद बर्फी वाटली । प्रवास वर्णन सांगोनियां ।। ८७ ।।

मनोवेगें जाऊनी । सर्व भगिनींना भेटूनी । आलें मी परतोनी । तुम्हांसवें रहावया ।। ८८ ।।

मुली पावती आश्चर्य मनीं । आई प्रत्यक्ष आहे भवानी । पूर्व पुण्याई म्हणूनी । जन्म घेतला आम्ही उदरीं ।। ८९ ।।

तो चुंदडी प्रसाद म्हणून । कालेच्या करीं देऊन । सांगे कीं ठेवी जपून । पूजेमध्ये आपुल्या ।। ९०।।

ती मुलीनें ठेवीली पूजेंत । परी आश्चर्य ऐसें घडत । ती चुंदडी जाते वाढत । हळू हळू लांबीनें ।। ९१।।

ऐसी ही प्रसादस्मृति । कालेची वाढवी भक्ति । सदैव ठेवी जागृती- । स्मरण आपल्या आईचें ।। ९२।।

एकदां आई असतां खुशींत । ओव्या होती पुटपुटत । महाकालिकेचे अतित । वर्णन होती गात ।। ९३ ।।

वर्णन होतें भव्यपणाचें । तिज कुंकू लागे मणाचें । कापड लागे कोसांचें । लांब इतुकें चोळीला ।। ९४ ।।

ऐशा कांहीं आशयाचें । वर्णन होतें भव्यपणाचें । तें ऐकतां कालेचें । मन आश्चर्य पावलें ।। ९५ ।।

ती सांगे विनवून । जैसे केलेस तू वर्णन । मज तैसे घडावें दर्शन । जीवनांत एकदां ।। ९६ ।।

ऐसे काहीं दिवस जाती । ती अंगणांत बैसली होती । कालेस बोलवी अतिप्रिती । जवळ बैस म्हणोनियां ।। ९७ ।।

म्हणें तुज पाहिजे दर्शन । महाकालिकेचें म्हणून । तिज पाचारिलें विनवून । आली असे येथें ती ।। ९८ ।।

पहावे समोर म्हणून । शिरीं कर देई ठेवून । कालेस घडे दर्शन । विश्वरूप माऊलीचें ।। ९९ ।।

अष्टभुजा होती समोर । काळी कांती भयंकर । जिव्हा लांब लाल बाहेर । शिरीं मुकुट सुंदर ।। १०० ।।

बैसली होती भूमिवर । वाटे आकाशास लागे शिर । सतेज पाहुनी शरीर । डोळे दिपले कालिचे ।। १०१ ।।

नखशिखांत होते अलंकार । हातीं आयुधें होती भयंकर । ऐसे रूप पाहतां सत्वर । काला पडली बेशुद्ध ।। १०२ ।।

मुली धांवल्या सभोवतीं । काय झालें कालेस म्हणती । तिज शुद्धीवर आणती । सर्व मिळोनी क्षणांत ।। १०३ ।।

सर्व शरीत झाले कंपित । आईच्या पाया असे पडत । जय जननी कृपावंत । इच्छा पूर्ण केलीस ।। १०४ ।।

तूं विश्वाची आहेस जननी । प्रत्यक्ष पाहिलें मी नयनीं । अणूरेणूंत भरुनी । अदृश्य रूपें राहिलीस ।। १०५ ।।

भ्रमाचें झालें निरसन । तुझ्या पूर्ण कृपें करोन । आतां कांहीं न मागेन । विश्वास पायी दृढ राहो ।। १०६।।

पिंड ब्रह्मांडाचें थोरपण । तुझेंच स्वरूप जाण । तें सगुण रूप घेऊन । जानकीरूपें आलीस तूं ।। १०७ ।।

ऐसें हें जानकीचें जीवन । जणुं कामधेनूचें पय:पान । तुम्हां यथेच्छ देतो प्राशून । ढेकर द्यावा तृप्तीचा ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम चतुर्थोऽध्याय: । श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।

शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*