सावली अध्याय ५ वा

।। श्री ।।
।। अथ पंचमोऽध्याय: ।। श्री गणेशाय नम: ।
श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

श्रोते व्हावें सावधान । पुढील कथेचें करितों निरुपण । श्रवणें साधाल समाधान । भवभय हरोनी ।। १ ।।

या संसार-चक्रांत । चित्त राहे चिंताग्रस्त । आधिव्याधींनी त्रस्त । शरीर राही माणसाचें ।। २ ।।

पोटापाण्याची चिंता । जीव धडपडे सुखाकरितां । कोठून लाभेल स्वस्थता । नामस्मरण करावया ।।३।।

म्हणोनि संसार जनांनी । श्रवणभक्ती करोनी । सहज, सुलभ साधनीं । सुसंधी ऐसी सोडूं नये ।। ४ ।।

श्रवणें साधाल भक्ति । श्रवणें साधाल शांति । श्रवणें साधाल मुक्ति । देवी सान्निध्य लाभोनी ।। ५ ।।

म्हणोनी करितों विनंती । लक्ष देऊनी ऐका महती । प्रेमाब्धीस येईल भरती । जानकीकथा-श्रवणाने ।। ६ ।।

ऐशाच एका शुभदिनी । सर्व बैसले पुढील प्रांगणीं । सुख संवाद विनोदें करूनी । चाललासे सर्वांचा ।। ७ ।।

तेव्हां दूर असे कोठोनी । मंजुळ स्वर येती कानीं । लक्ष घेतले वेधोनी । सर्वांचेच क्षणांत ।। ८ ।।

जैसे जवळ येती स्वर । कीं ते सनईचे सुस्वर । आईस विचारती सत्वर । काय असेल ते सांगावें ।। ९ ।।

म्हणे कार्य चाललें स्वर्गात । इन्द्र असे यज्ञ करित । म्हणोनी आमंत्रणा येत । कार्यानिमित्त श्रीगजानन ।। १० ।।

येती वाजत गाजत । तेचि ध्वनी तुम्ही ऐकत । असें म्हणोनी स्वहस्त । पढें केला जानकीनें ।। ११ ।।

तेंव्हा हातावर पडलेला । शेंदुराचा खडा दिसला । तो सर्वांनीच पाहिला । दृष्टीसमोर साश्चर्य ।। १२।।

पहा मज श्रीगणपती । यज्ञाचें आमंत्रण देती । त्याची पहावी प्रचिती । करामध्यें माझीया ।। १३ ।।

हातांत घेऊनीं पाहती । तों ती गणेशमूर्ति । शेंदुराची घडली होती । म्हणूनी सर्व वंदिती ।। १४ ।।

म्हणे मूर्ति ठेवा देवांत । पाहुणे म्हणोनि राहत । श्रीगणेश आपुल्या घरांत । पंधरा दिन पर्यंत ।। १५ ।।

मूर्ति ठेवलीं देव्हार्यांत । रोज मिष्टान्ने होते करित । पाहुण्यास होते सन्मानित । पूजाअर्चा करोनियां ।। १६ ।।

पूर्ण होतां पंधरा दिवस । तो मूर्ति जाहली अदृश्य । मुली विचारती आईस । कोठे गेले श्रीगणपती ।। १७ ।।

म्हणे जैसे आले तैसे गेले । आग्रहानें माझ्या राहिले । कार्यानिमित्त परतले । येथोनियां आज ते ।। १८ ।।

कैसें जानकीचें थोरपण । देवांदिका देती आमंत्रण । श्रीगणेश करिती सन्मान । पृथ्वीवरी येऊनियां ।। १९ ।।

पुराणांत वाचल्या कथा । भूलोकीचें राजे युद्धाकरितां । स्वर्गात जाती पराक्रमाकरिता । सन्मानित देवादिक ।। २० ।।

तैसे आजही कलियुगांत । देव सन्मानुनी आमंत्रित । जानकी सारिखे श्रेष्ठ संत । पाहिले नयनीं प्रत्यक्ष ।। २१ ।।

बहुत सुकन्यांनंतर । एकच जन्मला उदरीं पुत्र । पदरीं कीं कृपाप्रसाद । जानकीचा असे तो ।। २२ ।।

तो आप्ताघरीं असे राहत । शिक्षणानिमित्त होता मुंबईत । त्याच्या पोटांत होते दुखत । कळा वाढती भयंकर ।। २३ ।।

के.ई.एम.चे दवाखान्यांत । त्याला ठेविलें उपचारार्थ । आणि पोटाचेंही त्वरित । ऑपरेशन करिती ।। २४ ।।

परि रक्त वाहे जखमेंतूनी । तें जराही न थांबे क्षणीं । जखम पाहती उघडोनी । पुन: पुन: धन्वंतरी ।। २५ ।।

घालती टांके परतून । तरी तैसेची येई घडून । रक्त वाहे जखमेंतून । उपाय काहीं सुचेना ।। २६ ।।

पुन्हां पुन्हां जखम उघडती । टांके परतोनी घालिती । सहावेळा घडे पुनरावृत्ती । मति कुंठली धन्वंतरींची ।। २७ ।।

बापु अशक्त झाला भारी । आतां घाबरला मनांतरी । तार गणदेवीस करी । यावें म्हणोनी त्वरित ।। २८ ।।

दादा जाती घाबरून । मजकूर करिती कथन । त्यांत पैशांची होती चणचण । काय करावें कळेना ।। २९ ।।

उभय प्रार्थिती देवास । आरोग्य लाभावें पुत्रास । तोंचि जानकी देई पतीस । खडी साखर काढोनियां ।। ३० ।।

म्हणें मोजून पहावें किती । खडी साखरेचे खडे असती । एकी असे भाग्यवती । पुत्रास हो तुमचिया ।। ३१ ।।

खडे पाहती मोजून । तों एकी निघतां आनंदून । पुत्र वाचेल म्हणून । पाया वंदिती जानकीच्या ।। ३२ ।।

प्रवासादि खर्चा कारण । पैसेही दिले काढून । म्हणे मुलास दिलें अभयदान । चिंता मुळीं करूं नये ।। ३३ ।।

उभय येती मुंबईत । तैसेचि जाती दवाखान्यांत । डॉक्टर होते तपासीत । बापूस कीं तेथवा ।। ३४ ।।

जवळ जाऊनी बैसली । आई बापूनें ओळखिली । चौकशी पुत्राची केली । डॉक्टरजवळी तियेनें ।। ३५ ।।

दाखवा कोठूनी येतें रक्त । पोटावरुनी फिरवी हात । गुलाबाचें फूल निघे करांत । डॉक्टरांचे समोर ।। ३६ ।।

तेंचि फिरविलें जखमेवरून । तोंचि रक्त गेलें थांबून । डॉक्टर करिती वंदन । जानकीच्या पायांना ।। ३७ ।।

बापु होऊनिया चांगला । आपुल्या घरींहीं परतला । मात्र डॉक्टरांना लाभला । आशिर्वाद जानकीचा ।। ३८ ।।

जानकीचा फोटो काढून । दवाखान्यांत दिला लावून । आजही त्यास वंदून । कार्य करिती आपुलें ।। ३९ ।।

जानकीच्या एका भाचीची । गोष्ट घडलीं गंमतीची । उत्कटभक्ति प्रेमाची । कथा असे निराळी ।। ४० ।।

तिचा पाय होता दुखत । रोग मुरला अंगांत । तैं ठेविती दवाखान्यांत । मुंबईमध्यें तियेला ।। ४१ ।।

डॉक्टर पाहती तपासून । म्हणे शस्त्रक्रिया करून । पाय घेतल्यास कापून । भय मग नाही मुलीला ।। ४२ ।।

जरी न कापाल पाय । औषधाचा न चाले उपाय । रोगी जिवानिशीं जाय । स्पष्ट सांगती सर्वांना ।। ४३ ।।

निर्णय डॉक्टरांचा ऐकून । भाची जाई घाबरून । म्हणे मज घडावें दर्शन । बायजींचे त्यापूर्वी ।। ४४ ।।

जोंवरी घडे न दर्शन । तोंवरी न करावें ऑपरेशन । अतिदीनपणे विनवून । सांगतसे सर्वांना ।। ४५ ।।

परी रोगाची पाहून गंभीरता । निर्णयही घेती त्वरिता । आणि शस्त्रक्रियेकरितां । टेबलावरी नेती तियेला ।। ४६ ।।

औषध गुंगीचे देऊन । पाय टाकिती कापून । तै शुद्धीवर येवून । किंचाळून ओरडे ती ।। ४७ ।।

बायजीचें न घडतां दर्शन । पाय कशास टाकला कापून । राग जाता मस्तकांतून । बेशुद्धींतच निवर्तली ती ।। ४८ ।।

जानकीच्या नांवें टाहो फोडून । तिचा आत्मा गेला निघोन । तिचें क्रिया कर्म उरकोन । आप्त सर्व परतती ।। ४९ ।।

इकडे जानकी पडली आजारी । अशक्त जाहली भारी । डॉक्टरही बोलाविता घरीं । परी गुण कांही पडेना ।। ५० ।।

म्हणोनी करिती विचार । कीं मुंबईस न्यावें सत्पर । निष्णात डॉक्टरांचा उपाय । हिच्यावर करावा ।। ५१ ।।

जानकीस आणिती मुंबईत । आणि शिंघाणीच्या दवाखान्यांत । ठेविली त्याच वॉर्डात । जेथे भाची होती निवर्तली ।।५२ ।।

योगायोग आला जुळून । कीं जानकी रुग्ण म्हणून । त्याच वॉर्डात आली धावून । हांक आत्म्याची ऐकून ।। ५३ ।।

नित्य फिरे वॉर्डात । रोग्यांची चौकशी असे करित । स्वत: मात्र मुखांत । पाणीही न घे तेथलें ।। ५४ ।।

डॉक्टर येऊनी तपासती । औषध घ्याया विनविती । जरी देहास येई अशक्ति । तरी ती न ऐके कुणाचें ।। ५५ ।।

ऐसे दहाबारा दिन होती । डॉक्टर मात्र आश्चर्य करिती । कैसी रुगणाची विचित्र स्थिती । अन्न पाण्याविना राहतो ।। ५६ ।।

एके दिवशीं मध्यरात्रींला । एक स्त्रीरोगी घाबरला । किंचाळुनी ओरडला । परिचारिका जमती सर्व ।। ५७ ।।

धडपड रोग्याची चाले । कोणी त्यावर करिती हल्ले । त्याला उचलोनी फेकलें । सर्व पाहती प्रत्यक्ष ।। ५८ ।।

जरी डॉक्टरही जमले । तरी वाटे कीं आयुष्य खुंटलें । वेळों वेळीं ऐसेंचि घडलें । कुजबुजती सर्व जण ।। ५९ ।।

त्या विशिष्ट पलंगावर । कोणी रुग्ण ठेवितां सत्वर । रात्रीचा घावरोनि भयंकर । मृत्यूमुखी पडतसे ।। ६० ।।

ऐशाचपरी आजपर्यंत । रोगी पलंगावरी मरत । तैसेचि घडे प्रत्यक्षांत । म्हणोनी सर्व बोलती ।। ६१ ।।

जानकी ऐकोनी उठली । रुग्णाजवळ उभी राहिली । नजर तिच्यावर रोखिली । तैसी शांत शांत होतसे ।। ६२ ।।

अंगावरी फिरविला हात । म्हणे आतां वाटतें शांत । नमस्कार जानकीला करित । डॉक्टर पाहती टकमकां ।। ६३ ।।

श्रेष्ठ डॉक्टर येती धांवत । जानकीच्या पायां वंदित । तेव्हां ती सांगे हकीकत । पलंगावरील मृत्यूची ।। ६४ ।।

म्हणे स्त्रीरुग्ण आला होता । त्याचा पाय कापला होता । त्याला येथेंची ठेविला होता । मृत्यू पावला पलंगावरी ।। ६५ ।।

तिच्या देह विसर्जनाला । तुम्हीं तो पाय न दिला । तो आजही तैसाच राहिला । म्हणोनी पिशाच्च झाली ती ।। ६६ ।।

जेव्हां तुम्हीं करितां ऑपरेशन । तेव्हां तुमचे मागें उभी राहून । माझा पाय द्यावा म्हणून । आजही ती मागतसे ।। ६७ ।।

जेव्हां तुम्हीं देतां इन्जेक्शन । तेव्हां मनांत जाता घाबरून । वाटे कुणी हाता धरून । रोखितसे तुम्हाला ।। ६८ ।।

ऐसी ती सांगता हकिकत । डॉक्टर आश्चर्याने बघत । कारण तैसेंचि होतें घडत । जैसें बोलली जानकी ।। ६९ ।।

तपास केला त्वरित । तो पाय होता दवाखान्यांत । तो सोपस्कारें विसर्जित । केला तयांनी तेधवा ।। ७० ।।

भाचीस केले पिशाच्चमुक्त । आणि इतरां केलें बंदिस्त । सर्व डॉक्टर बनती सुभक्त । आशिर्वाद मागती जानकीचा ।। ७१ ।।

तिचा फोटो घेतला काढून । शस्त्रक्रियेच्या खोलींत लावुन । नित्य तयाला वंदुन । सत्कार्य करिती आपुले ।। ७२ ।।

दुसरे दिनी जानकी उठोन । म्हणे घरीं चलावें परतोन । परी डॉक्टर तिजला विनवून । रहावें म्हणोनी सांगती ।। ७३ ।।

म्हणे मज कांहींही न झालें । यांचि कार्यापरत्वें आलें । कार्य माझें पूर्ण जाहलें । आतां येथे न राहणें ।। ७४ ।।

त्यानंतर कधींहीं । ऐसा त्रास झाला नाहीं । वॉर्ड पिशाच्चमुक्त होई । श्रीजानकीच्या कृपेनें ।। ७५ ।।

लेक येई दुपारी । तों जानकीची जाहली तयारी । म्हणे चलावें आपुल्या घरीं । येथूनियां सत्वर ।। ७६ ।।

दवाखान्यांतून निघती । महालक्ष्मीच्या दर्शना येती । जी समुद्रतीरीं होती । प्रसिद्ध देऊळी मुंबईच्या ।। ७७ ।।

ती वेळ मध्यानीची होती । दुकानेंही बंद होती । प्रसाद पुष्पेंही न मिळती । रिक्त हस्ते जाती म्हणोनियां ।। ७८ ।।

पुजारी भोजनासी निघाला । म्हणोनी द्वार बंद करूं लागाला । म्हणे आता न होई दर्शनाला । पुन्हां यावें सायंकाळी ।। ७९ ।।

निराश झाली मनांतून । काय देवीचें न घडे दर्शन । इतक्या दूर आलो लांबून । व्यर्थ शीण झाला असे ।। ८० ।।

तोंचि पुन्हा द्वार उघडोन । पुजारी सांगे विनवून । तुम्ही त्वरित घ्यावें दर्शन । मज जाणें असे भोजनाला ।। ८१ ।।

रिक्त हस्तें प्रवेशून । श्रीलक्ष्मीचें घेती दर्शन । जय जय महालक्ष्मी म्हणून । नम्रभावें वंदिती ।। ८२ ।।

महालक्ष्मी-काली-सरस्वती । तीन देवींच्या सुंदर मूर्ती । जानकीं भेटे अतिप्रीती । भगिनींना आपुल्या ।। ८३ ।।

स्वकरें पदर पसरोन । ओटींतून घेई काढोन । नारळ फुलें नी खण । पुजार्याला देतसे ।।८४ ।।

श्रीलक्ष्मीकडे पाहे हंसोन । कालाही पाहे तत्क्षण । तो देवीचा मळवट भरेल । कुंकूं लागलें आपोआप ।। ८५ ।।

गोल कुंकू होते कपाळावर । वाढूं लागलें तें भरभर । पुजारीही पाहे चमत्कार । वंदन करितो पायांना ।। ८६ ।।

म्हणे इतकी वर्षे सेवा केली । परी ऐसी भक्ति न पाहिली । धन्य धन्य तूं माऊली । कृपा करावी मजवर ।। ८७ ।।

पुजार्याची ऐकून वाणी । जानकी बोले संतोषुनी । अरे अनन्य भावें वंदूनी । शरण जावें माऊलीला ।। ८८ ।।

कोणाचीं न दुखवावीं मनें । सेवा करावी काया-वाचा-मने । सर्व करावीं समर्पण कर्मे । महालक्ष्मीच्या पायाशीं ।। ८९ ।।

ऐसें तू वागतां जाण । श्री लक्ष्मी होईल प्रसन्न । तूंही सुभक्त होऊन । सुखी होशील जीवनीं ।। ९० ।।

ऐसा आशिर्वाद देऊन । दोघी निघती तेथून । कांहीं दिवस विश्रांती घेऊन । गणदेवीस परतती ।। ९१ ।।

दुसर्‍या जागतिक युद्धाकरितां । परदेशांत जाण्याकरितां । डॉक्टर देशपांड्यांचे करितां । वॉरंट निघाले मिलिटरीचें ।। ९२ ।।

निघोनियां त्वरित । दाखल व्हावें कॅम्पात । जो युद्धावर होता प्रत्यक्षांत । भारतीय सैन्याचा ।। ९३ ।।

युद्धाची गंभीरता जाणूनि । गणदेवीस जाती धावूनी । जानकीच्या लागती चरणीं । आशिर्वाद घ्यावा म्हणोनि ।। ९४ ।।

जय जय जानकीजननीं । कृपा असूं दे रणांगणी । जय रणचंडिके धावूनि । रक्षावें तूं आम्हांला ।। ९५ ।।

श्रीफल घेतलें मागुनी । तें सौभाग्यवतीस देऊनि । म्हणे बाळ येईल सात वर्षांनीं । तोंवरी सांभाळावें हें ।। ९६ ।।

चिंता न करावी मनांत । सुरक्षित राहील युद्धांत । परतोनि येतां भारतांत तेव्हां नारळ फोडावा ।। ९७ ।।

देशपांडे युद्धावर जाती । तेथें विजयही पावती । सात वर्षांनंतर येती । मायभूमीला परत ।। ९८ ।।

तेव्हां विनम्र भावें वंदून । नारळ पहिला फोडून । पाण्यासह ताजा आंतून । निघता आश्वर्य पावले ।। ९९ ।।

सर्वांना आश्चर्य वाटलें । श्रीफळ ताजें कैसें राहिले । देशपांडे मनी कृतार्थ झालें । कृपाछत्र देखोनिया ।। १०० ।।

जी चळवळ चाले भारतांत । तिचें भविष्यही ती वर्तवीत । सर्व भक्तांना सांगत । पडसाद तेव्हांच्या राजकरणाचें ।। १०१ ।।

गौरव टिळकांचा करुनि ।म्हणे याचा प्रभाव पडे जनीं । परी कारावासातें भोगुनि । कर्म मार्ग सांगेल ।। १०२ ।।

जरी स्वतंत्र न होईल भारत । तरी जन ज्ञानें करील जागृत । नेते बुद्धिमंत ज्ञानवंत । लाभतील भारताला ।। १०३ ।।

गांधीची अहिंसा चळवळ । इंग्रजांना होईल कपाळशूळ । जनजागृतीचा वडवानल । भडकेल की भारतीं ।। १०४ ।।

गांधीच्या नेतेपदाखालीं । पारतंत्र्याची तुटेल सांखळी । भारत होईल भाग्यशाली । स्वतंत्रता त्याला लाभेल ।। १०५ ।।

भारत स्वतंत्र होईल । परी लाडक्या नेत्यास अंतरेल । खून गांधीचा होईल । सत्य सांगते तुम्हांला ।। १०६ ।।

तरी ऐकावें श्रोतेजन । तैसें देशात आलें घडून । सर्वसाक्षी जीवन । याचि डोळा पाहिलें की ।। १०७ ।।

म्हणोनियां श्रोतेजन । जानकीचें हें सर्वज्ञपण । एकटा तोची जाणेल सूज्ञ । जो अनन्यभावें वंदील ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम पंचमोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*