श्री बायजी बावनी

।। जय जानकी दुर्गेश्वरी ।।

जय जगदंबा जय जननी । जय जय बायजी स्वरुपिणीं ।।१।।
कृपा असावी भक्तगणीं । नम्र विनंती तव चरणीं ।।२।।
सुभक्त होती बालपणीं । नित्य मालजाई पूजनी ।।३।।
दूध भुजंगा पाजूनी । प्रसन्न केला शूलपाणी ।।४।।
नवरात्रीच्या प्रथम दिनीं । तुजला नेती उचलोनी ।।५।।
नवदुर्गेसह राहूनी । गीतें, जोगवा, गाऊनी ।।६।।
पुन्हा प्रकटली या अवनीं । कडापकरणीच्या चरणीं ।।७।।
गणदेवीला आलीस । प्रकट जाहली भक्तांस ।।८।।
भक्तां होई संतोष । नित्य वंदिती चरणांस ।।९।।
गंगा दारी आणलीस । मुक्त पिशाच्चे केलीस ।।१०।।
भुंजग मणिधर येऊनी । नित्य वंदितो तव चरणी ।।११।।
निघती कोनाड्या मधुनी । असंख्य श्रीफल क्षणोंक्षणी ।।१२।।
अगाध ऐसी तव करणी । प्रकटें कल्पतरु भुवनीं ।।१३।।
दर्शन देशी भक्तांस । देवी स्वरुपीं दिसतेस ।।१४।।
नवरात्रीच्या दिवसांत । दिसशीं दोन स्वरुपांत ।।१५।।
घरांत आणी गर्ब्यात । दादा आश्चर्ये बघत ।।१६।।
गणदेवीला राहूनी । धांवा भक्तांचा श्रवुनी ।।१७।।
नवसारींत तूं प्रकटलीं । भक्तां संरक्षित झाली ।।१८।।
चक्षुहीन शिशु पुत्राला । चक्षू अर्पूनि तोषविला ।।१९।।
त्रिंबक बुडता पाहून । धांवुन घेशीं उचलोन ।।२०।।
वीट उडाली ती जैसी । झेलून पाठीवर घेशीं ।।२१।।
खोपकरांना संरक्षी । सार्वांभूतीं तव साक्षी ।।२२।।
वीज चमकतां नभांतून । दाखविशीं तिज रोखून ।।२३।।
दिव्यशक्ती ही पाहून । जन करिती पदीवंदन ।।२४।।
महिमा तुमचा जाणून । स्वर्गांतुन ये गजानन ।।२५।।
आमंत्रण तुज देऊन । देवही करिती सन्मान ।।२६।।
हट्ट पुरविला बालेचा । दर्शन महिमा हा साचा ।।२७।।
गंगा आणुनी दारांत । कन्येला तूं दाखवित ।।२८।।
वायु वेगे गेलीस । पावांगडी-अंबाजीस ।।२९।।
तिथे चुंदडी नेसविली । ती कन्येला अर्पियली ।।३०।।
करणी गर्भावर केली । अपंग बालिका झाली ।।३१।।
कृपादृष्टिने न्याहळिले । सुदृढ तिज ततक्षणीं केले ।।३२।।
पावागडी महाकालीला । दर्शन घेण्यास्तव गेलां ।।३३।।
भ्रमर धांवले सहाय्यार्थ । उघडुनी दरवाजा देत ।।३४।।
व्याघ्र येऊनि मार्गांत । तव चरणाला वंदीत ।।३५।।
कलश घेऊनी येइ करीं । बाल कालिका सामोरी ।।३६।।
पाणी पाजुनियां गेली । प्रचिती भक्तांना अली. ।।३७।।
आळ चोरिचा लग्नांत । घेउनि केले कलंकित ।।३८।।
सालंकृतरुप दाखवुनी । भयभीत केले सकल मनीं ।।३९।।
निपुत्रिकाला पुत्र दिलें । तूं कुलदीपक वांचविले ।।४०।।
जें जें भक्तां मनीं वसले । तें तें अर्पुनि तोषविले ।।४१।।
सयाजी राजे धीमंत । भुंगा होऊनिया येत ।।४२।।
दर्शन मरणोत्तर घेत । वंदुनि पदकमलां जात ।।४३।।
अगम्य पाहुनि ही लीला । स्तवनें प्रार्थूं बायजीला ।।४४।।
परलोकीं तूं गेलीस । तरिही भक्तां पावलीस ।।४५।।
स्वप्नामध्यें येऊन । किंवा सन्मुख प्रकटून ।।४६।।
मार्ग सुभक्ता दाखविशीं । इच्छित फल प्राप्ती देशीं ।।४७।।
ऐसा महिमा बायजीचा । निशिंदिनीं मनी हा स्मरायचा ।।४८।।
सुसंधी होईल जी प्राप्त । प्रेमें गावे हे गीत ।।४९।।
वरद कृपा त्यां लाभेल । बायजी भक्तां उद्धरील ।।५०।।
जय जगदंबा जय जननी । जय जय बायजी स्वरुपिणी ।।५१।।
कृपा असावी भक्तगणीं । नम्र विनंती तव चरणीं ।।५२।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*