सावली अध्याय १२ वा

।। श्री ।।
।। अथ द्वादशोऽध्याय: ।।
श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

जानकीचें हें स्वर्गारोहण । कल्पनेंद्वारे घेतलें जाणून । परि तेथें न रहावें रेंगाळून । पुनश्च यावें धरणीवरीं ।। १ ।।

स्वप्नापरी सारें जीवन । आतां संपलें हें जाणून । सर्व धावले आप्तजन । निरोपासवें झडकरी ।। २ ।।

कोणा कळविलें दूरध्वनिनें । कोणास कळविलें तारेनें । कोणास प्रत्यक्ष बोलावणें । धाडिलें असे दादांनीं ।। ३ ।।

वार्यासवें बातमी पसरली । तैसी सर्व गणदेवी लोटली । गांवोगांवीची मंडळी जमली । दर्शन घ्याया जानकीचें ।। ४ ।।

कुसुम निघाली बडोद्याहून । परि गाडींत असतां घडलें दर्शन । एक ज्योती येई दिसून । वाटे दूर दूर चाललीसे ।। ५ ।।

तै चरकली मनांतून । हृदयांत उठे भीतिकंपन । देवास प्रार्थी मनांतून । पूर्णायुषी करावें जननीला ।। ६ ।।

काहीं सुकृत होतें म्हणून । आई लाभलीसे पुण्यवान । पोरकें न करावें दयाघन । आम्हांस या जीवनीं ।। ७ ।।

अश्रु वाहती नयनांतून । हृसयांचे वाढे स्पंदन । आईचें ते सुहास्य वदन । पाहूं शकूं का पुन्हां कधीं ।। ८ ।।

कलावती निघे मुंबईहून । बिलीमोर्यास उतरली जाण । घोडा गाडींत बैसून । चाललीसे घराकडे ।। ९ ।।

तैं तिज दिसे समोरून । सुंदर झोपळ्यांवर बैसून । आई चाललीसे सजून । देवी रूपानें कुठेतरी ।। १० ।।

दृश्य गेलें जवळून । विरूद्ध दिशेनें गेले निघून । चर्रर्र झाले मनांतून । हृदयीं भीति उद्भवली ।। ११ ।।

वाटे आई गेलीसे निघोन । लोकास या सोडून । पोरके जाहलों कीं आपण । छत्र गेलें म्हणोनियां ।। १२ ।।

सर्व कन्या आल्या धावून । पुत्र आला मुंबईहून । दारी लोकांची गर्दी पाहून । अंतर्यामी समजले ।। १३ ।।

कुसुम जाहली बेभान । धांवत सुटे रस्त्यावरून । तिरडीस ठेवी धरून । म्हणे आईंस न न्यावें माझिया ।। १४ ।।

परि तिजला घेती सावरून । म्हणे शोक घ्यावा आवरून । प्रसंगीं ठेवावें सावधान । शांत व्हावें झडकरी ।। १५ ।।

तै तिजला स्मरला तों दिन । विनोदें आईनें केलें कथन । कीं सुवासिनीस येतां मरण । काय आम्हीं करावें ।। १६ ।।

तेव्हां स्फुरण चढलें अंगांत । वाटे आतां न बसावें शांत । तांतडीनें करितसे प्रवृत्त । पुढील कार्यास्तव सर्वांना ।। १७ ।।

सुगंधलेपन केलें वाटून । पाणी करून घेतलें उष्ण । तिज पाटावरी बैसवून । अभ्यंगस्नान घालितसे ।। १८ ।।

हिरवा चुडा-साडी नेसवून । श्रीफळनें ओटी भरून । वेण्या फुलांनीं सजवून । मळवट तिचा भरलासे ।। १९ ।।

जैसे कुंकूं लावलें कपाळावरून । तें झरूं लागलेसें पाहून । सुवासिनींना घेई बोलावून । स्वकरें त्यांना तें अर्पितसे ।। २० ।।

सुवासिनींनो यावें उठून । प्रसाद आईचा घ्यावा म्हणून । पतिव्रतेचें लेणें समजून । प्रसाद घ्यावा मळवटीचा ।। २१ ।।

एकामागून एक उठती । प्रसाद कुंकू करीं घेती । कुंकू झरे भालावरती । खंड न पडे त्यांत ।। २२ ।।

ऐशा किती म्हणून स्त्रिया येती । तीन चारशे तें घेऊनी जाती । तैसे पुरूषही धांवती । प्रसाद कुंकू घ्यावया ।। २३ ।।

परी संध्याकाळ होते म्हणून । हात घेतलासे आवरून । यात्रा निघे घरांतून । जणुं अश्रूंच्या पुरांत ।। २४ ।।

काहीं मंडळी पुढे गेली । तों चंदनाच्या दोन मोळी । त्यांच्या पुढ्यात ठेविल्या । लाकूडतोड्या भिल्लाने ।। २५ ।।

म्हणे आम्हांस पाठविलें सांगून । कीं ज्या बाईस येतील घेऊन । तिजकरितां द्यावीं नेऊन । चंदनाचीं लांकडें ही ।। २६ ।।

आश्चर्य वाटे मनांतू । कोण गेला असेल देऊन । चिता रचती सुंदर जाण । यात्रा येई तोंवरी ।। २७ ।।

सरणावर ठेवितां कलेवर । जानकीचा करिती जयजयकार । कृपा असूं दे बालकांवर । म्हणोनि प्रार्थिती पुन: पुन: ।। २८ ।।

तुवां केलेस उपकार । आपुल्या बालकांवरी अपार । ऋणही नाही फिटणार । असंख्य जन्म घेतले तरी ।। २९ ।।

अनंत अपराध झाले हातून । परी तूं क्षमा दृष्टीने पाहून । प्रेमें घेतलेंस सांभाळून । विसर पडेल त्याचा कसा ? ।। ३० ।।

आतां आम्हांस कोण पाहील । तूंही ना पुन्हां दिसशील । कोण मायेचा हात फिरवील । पाठीवरून आमुच्या ।। ३१ ।।

तुझा आम्हां होता आधार । म्हणोनि चालला हा संसार । आतां कोणाकडे पाहणार । पोरकें करून गेलीस ।। ३२ ।।

ऐसे भक्तांचे मनांतुनी । विचार आले तरंगुनी । अश्रूभरल्या नयनांनी । श्रद्धांजली वाहिली सर्वांनी ।। ३३ ।।

जड पावलांनी परतले स्मशानांतून । आठवणीनें जाहले बेचैन । दुसरे दिवशी जाती परतून । राख सारावया चितेची ।। ३४ ।।

चिता सुंदर दिसली दुरून । भस्म चंदनाचें होतें म्हणून । वाटे शुभ्र चादर पसरून । समाधीवरी ठेवली असे ।। ३५ ।।

सुगंधानें भरला परिसर । वाटे वसंतानें केली बहार । झाडें उभीं सभोवार । चौर्या ढाळित समाधिवरी ।। ३६ ।।

राख पाहती उकरून । तों अस्थी न येती दिसून । कर्पुराचे खडे निघती चितेंतून । आश्चर्य करिती मनोमनीं ।। ३७ ।।

जय जय जानकी जननी । कर्पुरांसी झालीस त्रिभुवनीं । त्याची साक्ष पटावी म्हणुनी । कर्पुर दाखविलेस आम्हांला ।। ३८ ।।

वारंवार त्यांना वंदोनि । घरी आणिती फुलें म्हणोनी । दर्शन घेतां सर्वांनी । विसर्जिले ते नदींत ।। ३९ ।।

अस्थी न मिळती चितेत । वाटे सदेह गेली स्वर्गांत । कलियुगी दाखविलें सत्य । कर्पुर-खडे चितेंत ।। ४० ।।

दु:ख अपार जाहलें । पूर्ण आयुष्य कां न लाभलें । आतां कीर्तिरूपे उरलें । जीवन सारे जानकीचे ।। ४१ ।।

परी जाणून घ्यावे सुभक्त जन । कोणा न लाभे अमरण । जो जो जन्मला असे जाण । जाणें असे तयाला केव्हां तरी ।। ४२ ।।

देवादिक गेले निघोन । संतही झाले विलीन । जीवांस लाभले भ्रमण । जन्म-मरण-फेर्यांचे ।। ४३ ।।

कर्मानुसार जन्म घेणें । पुन्हा परतोनियां जाणें । हें जे जाणती आत्मज्ञानें । दु:ख न होई तयांना ।। ४४ ।।

जानकी सारिखें संतजन । ते पुन्हा न येती परतोन । ते मुक्त झाले पावन । कैलासपदीं स्थिरावले ।। ४५ ।।

परी भक्तिभावें करितां पूजन । संत वचनास राहती जागून । नित्य देती अभयदान । अढळ श्रद्धा असूं द्यावी ।। ४६ ।।

म्हणोनियां भक्तजन । कुशंका टाका मनांतून । जानकी जवळ आहे जाणून । कर्म मार्ग आचरावा ।। ४७ ।।

ऐसी मनांत पटतां खूण । सर्व स्वत:स घेती सावरून । क्रियाकर्म घेतलें उरकोन । दिन तेराव उजाडला ।। ४८ ।।

असंख्य येती भक्तजन । तैसेची जमले आप्तजन । सुपिंडास करिती वंदन । वारंवार भक्तीनें ।। ४९ ।।

पुजेस बैसतां सुवासिनी । पेटी पाहती उघडोनी । तेरा साड्या आल्या दिसूनि । विचार करिती तेधवां ।। ५० ।।

पहिल्या बसतील तेरा जणी । त्यांची ओटी भरावी साड्यांनी । इतरांस हळदकुंकू देऊनी । पूजन करावें आपण ।। ५१ ।।

ऐशा विचारें करितां पूजन । तों साड्या निघती पेटींतून । एकेकीस देतां जाण । पुन्हां पेटी दिसे भरलेली ।। ५२ ।।

एकामागुनी एक काढीती । ऐशा तीनशेंवर साड्या निघती । सर्व सुवासिनी संतुष्टती । तृप्त होती भोजनें ।। ५३ ।।

भोजनें झाली असंख्यात । प्रसादें होती सर्व तृप्त । अखेर एक गरीब स्त्री येत । पूजन केलें तिचेंही ।। ५४ ।।

पेटी पाहिली उघडून । तों शालू निघाला आंतून । तो तिजला कीं देऊन । संतुष्ट केलें तियेला ।। ५५ ।।

ऐसें नवल घडलेलें पाहुन । आप्त जाती गोंधळून । म्हणे आईचें राहिलें देवपण । अजुनही आपणासवें ।। ५६ ।।

असे दृष्टीस न ये दिसून । तिचें अस्तित्व येतें कळून । आपणांस न गेली सोडून । अदृश्य रूपें वावरतसे ।। ५७ ।।

देव्हार्यास वंदिती सर्वजण । तो प्रकाश आला दिसून । येती हिरे माणकें चमकून । आंत कोणी लाविल्यापरिं ।। ५८ ।।

तो अपूर्व पाहिला प्रकाश । तेथें जानकीचा झाला भास । सर्व करिती सावकाश । नमस्कार निर्गुण रूपाला ।। ५९ ।।

जय जय जानकीजननी । अनंत नमनें तव चरणीं । आम्हालागी उद्धरोनि । पार करावें भवभयीं ।। ६० ।।

तुला ना आदि-अंत-वा पार । परि आम्हांस तुझा आधार । कृपा करावी वारंवार । बालकांवरी आपुल्या ।। ६१ ।।

तूं नित्य रहावीस स्मरणांत । गोड नांव रहावें मुखांत । तुझे गुण गांवे दिनरात । हेंचि द्यावें वरदान ।। ६२ ।।

ऐशा एकेक आठवणींनीं । लोचन आले भरोनी । गतवर्षाचा दिन मनीं । उभा राहिला तयांच्या ।। ६३ ।।

गेल्या चैत्र शुद्ध अष्टमीला । आईनें यज्ञ होता करविला । तन्निमित्त मेळा होता जमला । आज दिन कैसा उगवला ।। ६४ ।।

वाटे त्या यज्ञानिमित्र । आईस भेटले सर्व आप्त । तैसेची भेटतीं सर्व भक्त । कीं अखेरचेच तिजला ।। ६५ ।।

तेव्हां प्रत्यक्ष आशीर्वाद घ्याया । आतां विदेहासी वंदाया । दैवाचीही अद्भुत किमया । कळो न येई मानवा ।। ६६ ।।

परि ज्यानें केला यज्ञ । तो हें सर्व होता जाणून । तो मंत्र तंत्राचें साधन । भरपूर होता जाणत ।। ६७ ।।

ज्याचें नाव नव्हतें चांगलें । वाटे त्यांनेच कांहीं केलें । आईच्या शक्तिस कीं बांधलें । यज्ञ करोनि तेधवां ।। ६८ ।।

मांत्रिक जेठालाल पुराणी । त्याची वाईट होती करणीं । त्याच्या दुष्कृत्याचें कारणीं । आई गेलीसे लौकर ।। ६९ ।।

दु:ख झाले चिमणेला । उगाच पाठविलें पुराणीला । आज दिन नसता दिसाल । भाग्यहीना आम्हांला ।। ७० ।।

ऐसे तर्क वितर्क वाढती । कोणी नाना शंका घेती । सर्व पुराणीवरी चिडती । शोधण्यास सांगती तयाला ।। ७१ ।।

ऐसे कांही गेले मास । तों पुराणी आला घरास । दादांच्या तो पायास । नम्र होऊनी वंदितसे ।। ७२ ।।

म्हणे, कोठें गेली माऊली । जी सद्भाग्यें मज लाभली । माझ्या कृपेची ही सावली । आजन्म केलें ऋणी मला ।। ७३ ।।

तैं सर्व जाती कडाडून । मेल्या ढोंग करतोस जाणून । आईवरी विद्या करून । तिला परलोकीं पाठविलेंस ।। ७४ ।।

तिचा अपराध होता कोणता । जेणें घालविलीस आमुची माता । काय कर्मांची झाली सांगता । ऐशा तुझ्या दुष्कृत्यानें ।। ७५ ।।

तेव्हां तो सांगे विनवून । मी काहींही न केलें म्हणून । यज्ञ केला मजकारण । विद्या समर्पित कराया ।। ७६ ।।

मी जी केली विद्या संपन्न । तें दुष्कर्माचे होतें साधन । त्यातून सोडवावें म्हणून । प्रार्थिलेंसे माऊलीला ।। ७७ ।।

केवळ तिची आज्ञा म्हणून । यज्ञ आणिला घडवून । समर्पित केली विद्या मलीन । शुद्ध झालों तिच्या कृपें ।। ७८ ।।

जिनें मजवर केला उपकार । तिला कैसें मी मारणार । तिचा अधिकार होता थोर । मी जाणिला मंत्रसामर्थ्यें ।। ७९ ।।

ऐसी ही परमपूज्य माऊली । पूर्वसुकृतें मज लाभली । तिच्या चरणरजस्तलीं । रहावें आम्हीं पामरांनीं ।। ८० ।।

तिनें आपुलें हे मरण । मज सांगितलें होतें पण । गौहत्येची शपथ घातली म्हणून । सांगू न शकलों तुम्हाला ।। ८१ ।।

पंचांग द्यावें काढुन । तेथें घेतलासे लिहुन । निर्वाणाचा तो शुभदिन । मजकरवीं माऊलीनें ।। ८२ ।।

तैं पंचांग काढून पाहती । तेंथें तारीख लिहिली होती । चैत्र नवमीची शुभतिथी । समय साडे बारांचा ।। ८३ ।।

सर्व आश्चर्य करिती पाहून । आई निश्चित होती जाणून । अगाऊ एक वर्षापासून । निर्वाण दिन आपुला ।। ८४ ।।

उगाच बोललों बिचार्याला । अपराध नसतां दोष दिला । पारा रागाचा उतरला । क्षमा मागती पुराणीची ।। ८५ ।।

म्हणे आईची ही अगाध करणी । आम्हांस न आली कळूनी । फुका तर्क वितर्कांनी । शंकित जाहलों आपण ।। ८६ ।।

ऐसे दिन मास लोटले बहुत । सर्व आपुल्या कार्यांत रत । जानकीची स्मृती ठेविती मनांत । दिवस-रजनी-अविरत ।। ८७ ।।

मालु एकटीच होती गणदेवीस । तों मावशी आली बाळंतपणास । वेळ न मिळे अभ्यासास । परिक्षेमुळे तियेला ।। ८८ ।।

वेळ जात असे कामांत । अभ्यास न होत दिवसांत । मन चिंतेनें होई ग्रस्त । कैसें होईल तें कळेना ।। ८९ ।।

रात्रीं पाहतसे जागून । तों शरीर जाई थकून । अभ्यास न होई पूर्ण । परीक्षा आली तोंडावरी ।। ९० ।।

घरांत मावशी बाळंतीण । तिची सेवा करावी सर्वांगीण । कधीं शाळेस बुट्टी मारून । रहावें लागे तियेला ।। ९१ ।।

ऐशी चिंतेने असतां ग्रस्त । रात्री पुस्तक होती वाचित । हळुवारपणें कोणी हात फिरवीत । ऐसा भास झाला मालुला ।। ९२ ।।

हळूच मागें पाही वळून । तों आजी आली दिसून । जवळ बैसलीसे येऊन । घाबरू नकोस बोलली ।। ९३ ।।

जरी तुझा अभ्यास नाहीं झाला । तरी निश्चिंत जावें परीक्षेला । प्रश्न सुटतील सर्व तुजला । आशीर्वाद आहे माझा ।। ९४ ।।

मालुस आलें गहिंवरून । आजीची अपार माया पाहून । सर्वांस सांगे आनंदून । आजी भेटली कीं मजला ।। ९५ ।।

मग परीक्षा दिली विश्वासून । आणि आश्चर्य आलें घडून । प्रश्न आलें तेचि जाण । जे जे वाचिलें होते मालुनें ।। ९६ ।।

परीक्षा जाहलीसे पास । आशीर्वाद आला फळास । आजीच्या नांवास ध्यास । घेतलासे मालुनें ।। ९७ ।।

यावरून भक्तजन । तुम्हां आलें असेल कळून । जानकी न गेली तुमच्यातून । विदेही-रूपें वावरतसे ।। ९८ ।।

पूर्वी होती स्वदेहांत । आतां राहते विदेहांत । परी भक्ताची ना सोडी संगत । कार्यकारणा धांवतसे ।। ९९ ।।

पूर्वी प्रत्यक्ष होती माऊली । आतां जाहली ती “सावली” । अखंड भक्तावर ती धरली । तिनें मायेची आपुल्या ।। १०० ।।

जैसे मेघ येती आकाशांत । सूर्याची तीव्र झळ रोखीत । तैसी जानकीचीं राही संगत । भक्तासवें आपुल्या ।। १०१ ।।

जो जानकीच्या राही सावलींत । तो दु:खातून झाला मुक्त । ऐसें हें जानकीचे सुभक्त । मोठ्या अभिमानें सांगती ।। १०२ ।।

म्हणोनियां सुभक्त जन । जानकी-कृपा करा संपादन । वारंवार तिज वंदून । धन्य व्हावें जीवनीं ।। १०३ ।।

जानकी प्रत्यक्ष कुलस्वामिनी । ऐसी भावना धरावी मनीं । याचना करावी आर्जवूनी । वारंवार चरणापाशीं ।। १०४ ।।

तूं कोठेंही बसशी त्रिभुवनीं । परि कूर्म दृष्टिनें पाहुनि । आम्हांस घ्यावें सांभाळोनी । भवभयापासोनी सदैव ।। १०५ ।।

जरी कांही चुकलें हातून । तरी राग न धरावा मनांतुन । भोळ्या भक्तीचें अजाणपण । जाणुनी क्षमा करावी ।। १०६ ।।

जोंवरी जीव आहे देहांत । तोंवरी नांव येऊ दे मुखांत । मुखानें तुझें गुण गात गात । आयुष्य संपूं दे आमुचें ।। १०७ ।।

हेंचि दान द्यावें म्हणून । हात पसरावे दोन । अखंडनाम संकीर्तन । अंतर्यामी चालवावें ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम द्वादशोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*