सावली अध्याय ९ वा

।। श्री ।।
।। अथ नवमोऽध्याय: ।। 

श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

असो, दादांचे शेतावर । काम करिती जे मजूर । लक्ष द्याया त्यांचेवर । दादा जाती प्रतिदिनी ।। १ ।।

गुरेंही चरती शेतांत । त्यांनाही असती पाहत । परि डोळा चुकवूनि शिरत । दुसर्यांच्या ती शेतांत ।। २ ।।

जरी पकडुनी आणिती परत । तरी पुन्हां गुरें शिरत । सर्व शेते असती उकरित । नासाडी करिती पिकांची ।। ३ ।।

ऐसें कुणा एकाचे शेतांत । गुरें शिरुनी होती खात । तो मालक येई रागांत । त्यांना मारावया धावतसे ।। ४ ।।

दादा समजावूनि सांगती । मी करिन नुकसान भरती । परी तो न ऐके विनंती । गुरें मारीन वदतसे ।। ५ ।।

वादावरीं वाद वाढत । कोणी न ऐके परस्परांत ।। ६ ।।

म्हणे मी कोर्टाकडून । नुकसान घेईन भरुन । तुझा गर्व मी उतरवीन । गणदेवी गावांत ।। ७ ।।

केस चालती कोर्टात । बहुत दिनमासापर्यंत । परी निकाल नव्हता येत । असंख्य येती अडचणी ।। ८ ।।

जेव्हां जेव्हां भेटे दादांना । अपशब्द बोले तयांना । सदैव करी अवहेलाना । रस्त्यांमध्ये तयांची ।। ९ ।।

दादा बहुत कोपती । तरी उणा शब्द न बोलती । कारण कोर्टाची माहिती । बहुत होती तयांना ।। १० ।।

ऐसें वर्ष गेले उलटून । परी निकाल न आला म्हणून । शेतकरी जाई संतापून । दादांवरी अधिकच ।। ११ ।।

जरी पाणी वाहे शेतांतून । तरी त्याचें शेत गेलें सुकून । जवळील शेतें मात्र जाण । सुंदर पिकांनीं नटलीं ।। १२ ।।

त्याच्याच एकट्या शेतांत । किडी पडती अकस्मात । पिकें करिती भस्मसात । कारण न कळे तयाला ।। १३ ।।

प्रयत्न केले बहुत । परी एकटेंच सुकें शेत । दोष दैवाला देत । हताश होऊनि वैसला ।। १४ ।।

तेव्हा शेतकर्यास सांगे पत्नी । कीं जानकीच्या पाया वंदुनी । क्षमा मागावी चरणीं । मार्ग निश्चित सांपडेल ।। १५ ।।

तेव्हां दादा घरांत नसतांना । तो जानकीचे धरुन चरणा । करोनियां क्षमा याचना । रक्ष रक्ष म्हणतसे ।। १६ ।।

जानकी सांगे त्यास । पतीचे पाय धरावेस । कोर्टातुनि काढावी केस । तेंव्हाच सुखी होशील ।। १७ ।।

पतीचा केलेला अपमान । पतिव्रता न साहे जाण । म्हणोनि तुजला हें शासन । आम्हींच केलें असे ।। १८ ।।

तिची विनंती ऐकून । केस घेतली काढुन । दादांची क्षमा मागून । समेट केला झडकरी ।। १९ ।।

पुन्हां जानकीस वंदून । आतां घ्यावें संभाळून । कृपादृष्टी वळवून । शेतावरी माझिया ।। २० ।।

जानकी निघे भरभर । जाई त्याचे शेतावर । पाणी वाहे पाटावर । त्याच्या सवें चालतसे ।। २१ ।।

करांतून काढी पिंजर । नी पाण्यांत टाकी भरपूर । त्याच्या संपूर्ण शेतावर । पाण्यात पिंजर पसरली ।। २२ ।।

सर्व कीड गेली मरुन । सुकलीं पाने गेलीं गळून । पुढें हिरवेपणानें डोलून । शेती पिकली तयाची ।। २३ ।।

जैसें आई मारिते मुलाला । कारण केवळ हट्ट केला । परी शांत होता तयाला । कुरवाळिते हृदयीं धरी ।। २४ ।।

तैसी अपराधाची दिली जाण । शिक्षा स्वयें त्यास करून । परी निष्पाप पाहुनि मन । संरक्षिलें त्या भक्ताला ।। २५ ।।

एक कामगार होता नवीन । त्याने मासे आणिले मारून । वरी उत्तम केले भोजन । परी खवला अडकला घशांत ।। २६ ।।

बोटें घालूनियां घशांत । त्यानें प्रयत्न केला बहुत । परी खवला न बाहेरी येत । गळ्यामधेंच अडकला ।। २७ ।।

बंद झाले भोजन । खाणें पिणें तोंडांतून । निद्राही न येई म्हणून । हैराण बहुत जाहला ।। २८ ।।

दादांस कळतां हकिकत । म्हणे तुज नेईन दवाखान्यांत । तुवां लौकर यावें वाड्यांत । उदईक सकाळी ।। २९ ।।

सकाळींच आला कामगार । परी जाण्यास होता उशीर । त्यास बैसवोनी ओट्यावर । दादा जाती गांवांत ।। ३० ।।

जानकी सहज आली बाहेर । तों बैसला होता मजूर । तिनें विचारपूस केल्यावर । कारभ कळलें येण्यांचें ।। ३१ ।।

जानकी मालूस असे सांगत । चहा आणावा त्वरित । परी तो खुणेनें असे सांगत । पिववत नाही म्हणून ।। ३२ ।।

तेव्हा जानकी सांगे हंसून । काळजी न करावी म्हणून । तोंचि मालू आली घेऊन । चहा चांगला तयांपुढे ।। ३३ ।।

मालकिणीची आज्ञा म्हणून । चहा गेलासे पिऊन । तोंचि त्याला आलें कळून । घशांत काही नाहीसें ।। ३४ ।।

तो स्वत:च गेला चक्राऊन । कैसा चहा गेलो पिऊन । खवला गेला निघून । साफ झाला गळा कीं ।। ३५ ।।

त्याचे डोळे आले भरुन । कृतज्ञतेनें धरिले चरण । तोंचि दादा आले बाहेरून । म्हणती चलावें आतां झडकरी ।। ३६ ।।

तेव्हां तो सांगे आनंदून । आतां न उरलें कारण । माऊलींची कृपा म्हणून । मुक्त झालों असें मी ।। ३७ ।।

एकदां कुसुम, मालू, कलावती । सहज बैसल्या ओट्यावरती । गप्पांवरुनी गप्पा निघती । नद्यांविषयी त्यांच्यांत ।। ३८ ।।

गंगा, सिंधू, गोदावरी । नर्मदा, तापी, कावेरी । श्रेष्ठ कोण आहे तरी । कृष्णा, यमुना कीं चंद्रभागा ।। ३९ ।।

कोणाचा उगम कोठुनि । वाहती कोणत्या प्रदेशांतुनि । पवित्र कोणत्या कारणांनीं । झाल्या असती सर्व त्या ।। ४० ।।

गंगा आली स्वर्गांतुनि । श्रीशंकराचे जटेमधुनि । भगीरथाचे प्रयत्नांनी । पावन करायला भूमीला ।। ४१ ।।

म्हणोनि श्रेष्ठ गंगा नदी ती । कैलासावरुनीं येई भूवरती । जीवांस देई सद्गती । स्नानें पावन करोनियां ।। ४२ ।।

वेगें येई हिमालयांतुन । प्रचंड आवाज करी गर्जून । थंड स्फटिकापरी जीवन । धों धों वाहे वेगानें ।। ४३ ।।

हृषिकेश आहे श्रेष्ठ ठिकाण । काशी देई पुण्य जोडून । देवऋषीचे पवित्र जीवन । गंगा आहे भूमंडळी ।। ४४ ।।

परी आपल्या नाहीं दैवांत । नुसते दर्शन तिचे पवित्र । मग स्नानें व्हावें पुनीत । हें तो अशक्य या जीवनीं ।। ४५ ।।

ऐसें चालता संभाषण । तों आई आली मागून । सर्व एकून बोले हसून । चला गंगा दाखवितें तुम्हांला ।। ४६ ।।

मुली जाती आनंदून । टाळ्या वाजविती नाचून । म्हणे कधीं जायचें आपण । प्रवासाला आई गे ।। ४७ ।।

आई म्हणे प्रवास कसला । अग, इथेच आणते गंगेला । तुम्हांस मिळेल पहावयाला । बसल्या बसल्या येथेंच ।। ४८ ।।

उभी राहिली डोळें मिटून । ध्यान धरी गंगेला स्मरुन । पाण्याचा प्रवाह समोरुन । धों धों वाहतांना दिसला ।। ४९ ।।

प्रचंड गर्जनेचें करिती श्रवण । वाटे प्रवाह येई उंचावरून । शुभ्र पांढरे दिसे जीवन । अंगणामधून वाहतांना ।। ५० ।।

हळूहळू आलें ओट्यापर्यंत । मुली हात घालिती पाण्यांत । अंगावरी ते शिंपडीत । हर हर गंगे म्हणोनिया ।। ५१ ।।

तीर्थ घालिता मुखांत । तो थंडगार ऐसें वाटत । थंडी भरे शरीरांत । हात पाण्यांत घालतांना ।। ५२ ।। ।

मुली जाती आनंदोन । म्हणे गंगेचे झालें दर्शन । आईच्या पाया वंदून । पूजन करिती गंगेचें ।। ५३ ।।

तेव्हां आई मुलींना सांगत । गंगा आली दारांत । तिज स्थान देऊ घरांत । देवाजवळ आपुल्या ।। ५४ ।।

तैसी देवखोलींत शिरली । देवाजवळ उभी राहिली । बाहेरील गंगा गुप्त झाली । तैशा मुली येती घरांत ।। ५५ ।।

देव्हार्याखालील जागेंत । बोट दाखवूनि सांगत । तिज स्थान दिलें भूमींत । कान लावूनी एकावें ।। ५६ ।।

स्थानावर लावितां कान । तों आवाज येई भूमींतून । खळखळाट नदीचा ऐकून । प्रवाह वाटे वाहतसे ।। ५७ ।।

जो जो येई घरांत । कान स्थानावर लावित । गंगेचा प्रवाह ऐकत । आश्चर्य पावे मनोमनी ।। ५८ ।।

भगिरथाने आणिली स्वर्गातुन । त्या गंगेस आणिले ओढून । वाहविलीस अंगणांतून । केवळ दर्शनाकारणे ।। ५९ ।।

पूर्वी आणिलीस पिशाच्चें उद्धराया । आतां केवळ दर्शन द्यावया । धन्य धन्य तुझी ही किमया । अपूर्व वाटे आम्हंला ।। ६० ।।

एकदां जानकी उठे लौकर । परि अंधार होता बाहेर । तरीही घरांत करी वावर । सकाळच्या प्रहरी ।। ६१ ।।

चहाचे ठेवावया आधण । चुलीजवळ जाई आपण । जवळ बोळा पडला जाणून । सहज उचलला तियेनें ।। ६२ ।।

वाटे रात्री केले चुलीस । ते पोतेरे पडले बाजूस । उचलोनि सावकाश । बाजूस कीं करावें ।। ६३ ।।

बोळा समजुनि उचलला । तोंचि डंख झाला हाताला । सर्प बोटाला चावला । आणि सत्वर पळाला तेथून ।। ६४ ।।

हांक मारिली पतीस । सांगती सर्प डसला बोटास । धांवत येती पहावयास । तों रक्त दिसे बोटाला ।। ६५ ।।

ऐकून उठले सर्वजण । मनीं गेले घाबरुन । वाटे डॉक्टरास बोलावून । आणावें कीं सत्वरी ।। ६६ ।।

तेव्हां जानकी सांगे सर्वांस । बोलवूं नये डॉक्टरास । मी न घेई औषधास । तीर्थ मात्र द्यावें मजला ।। ६७ ।।

दिवसभर राहिली झोंपुन । काही न घे तीर्थावाचून । विष ठेविलें थोपवून । बोटावरीच आपुल्या ।। ६८ ।।

जेथें होतें चावलें । ते बोट काळे निळे झाले । तेथून नाही विष हललें । अंतापर्यंत जानकीच्या ।। ६९ ।।

कर्णिक मंडळी बिलीमोर्याहून । छबूताई येती कल्याणहून । सर्व जाती मिळून । गणदेवीस दादांकडे ।। ७० ।।

बहुत दिवसांनी येती । म्हणोनि आग्रह करिती । सावकाश जावें म्हणती । राहोनियां गणदेवीस ।। ७१ ।।

जानकीचा लाभेल सहवास । आनंदांत जातील दिवस । म्हणती आमच्या ह्यां डोळ्यांस । देवी दर्शन घडेल का ? ।। ७२ ।।

परि न आम्हीं केलें पुण्य । मग कोठून घडेल दर्शन । केवळ तुझेंच स्मरण । करुन राहू संसारी ।। ७३ ।।

जानकी पाही हासून । परी न बोले वचन । सर्व गेले झोंपून । मधल्या खोलींत देवांच्या ।। ७४ ।।

जैसी रात्र गेली उलटून । छबुताईची निद्रा गेली उडून । वाटे कोणी फिरे जवळून । कानोसा घेती शांतपणें ।। ७५ ।।

वाटे कोणी आहे फिरत । कपाटही असे उघडीत । बांगड्यांचा आवाजही येत । इकडे तिकडे फिरतांना ।। ७६ ।।

तै कर्णिकबाईस हालवून । हळूच पाहिले जागवून । म्हणे खोलीत फिरते कोण । पहावें स्वत: नयनानीं ।। ७७ ।।

तेव्हां त्या हळूच कुजबूजती । मला केंव्हाची आहे जागृती । मीही पाहतें सर्व एकांतीं । हालचाल ही सर्व ।। ७८ ।।

तेंव्हा दोघींनाही दिसलें । झोपाळ्यावर कोणी गेलें । वरी सुंदर गालिचें अंथरले । सुंदर सजविला तो फुलांनीं ।। ७९ ।।

कोणी देवता आली दिसून । झोपाळ्यावर बैसली येऊन । झोकें देती उभ्या राहून । दोघी जणी तिजला ।। ८० ।।

मुकुट होता शिरावरती । कंकण करांत लखलखती । सुवर्ण बुट्टे शालूवरती । तेज दिसले अलौकिक ।। ८१ ।।

डोळे किलकिले करून । दोघी पाहती बिलगून । परी मनांत जाती भिऊन । कुशी बदलून झोंपल्या ।। ८२ ।।

दुसरे दिनीं उठती लौकर । चहाही घेती सत्वर । जानकीस सांगी प्रकार । रात्रींचा सर्व घडलेला ।। ८३ ।।

तेव्हां जानकी सांगे हसून । राहिलांत काय झोंपून । जागृत मजला करून । कां न उठविलें मला तुम्ही ।। ८४ ।।

जगदंबा होती प्रत्यक्षांत । जरी पाया तिचे वंदीत । सार्थक जन्माचें होत । परि दुर्दैवें मुकलांत ।। ८५ ।।

दोघी हळहळती मनांत । परी भितीनें केला घात । संधी आणून देती संत । परी कर्म आडवें येतसे ।। ८६ ।।

काहीं दिवस राहून । दोघी जाती गणदेवीहून । परी सद्भाग्याचा तो क्षण । जीवनांत त्या न विसरती ।। ८७ ।।

अधिकमास आला म्हणून । जानकीनें केला पण । नैवेद्य देवास वाढीन । कमळाचिये पानावरी ।। ८८ ।।

बब्बड असती घरांत । ती त्यांना असे सांगत । पानें आणुनियां द्यावींत । व्रताचिये कारणें ।। ८९ ।।

बब्बडराव होते नास्तिक । बहुत करिती तर्क वितर्क । ईश्वरीसत्तेचा नव्हता धाक । त्यांच्या मनांत कधींही ।। ९० ।।

ईश्वर म्हणुनी कोणी नाहीं । मग सत्ता त्याची कैसी येई । मनोनिर्मित भ्रम होई । सर्व भक्तांना म्हणतसे ।। ९१ ।।

भक्ति म्हणजे मनोविकृति । दुबळेपणाची अंतिम शक्ति । टेंभा ज्ञानाचा मिरविती । इतरां मूर्ख समजूनी ।। ९२ ।।

ऐसी जरी होती प्रवृत्ति । तरी जानकीचें मात्र ऐकती । जें जें कार्य सांगेल ती । आनंदानें करिती ते ।। ९३ ।।

कमळांच्या पानासाठीं । तळ्यावर जाती सायकलवरती । पानें तोडूनियां घेती । रुमालांत बांधुनियां ।। ९४ ।।

गाठोडें घेतलें बांधून । सायकलीस ते अडकवून । चढून बैसतां आपण । रुमाल सुटला पानांचा ।। ९५ ।।

पानें उडालीं सर्वत्र । तीं गोळा करून एकत्र । पुनश्च बांधिली रुमालांत । स्वार झाले झडकरी ।। ९६ ।।

जरा पुढें नाही जात । तोंचि रुमाल सुटे परत । पानें उडती सर्वत्र । पूर्वीपेक्षां अधिक ।। ९७ ।।

पुन्हा गोळा केली हातांत । गच्च बांधिली रुमालांत । सायकलीसही बांधित । गाठोडें तें दोरीनें ।। ९८ ।।

जरा पुढें गेले चालुन । तों तैसेची आले घडून । पुन्हा पुन्हा उचलोन । पाने गोळ केली त्यांनी ।। ९९ ।।

ऐसें पाच वेळां आले घडून । शेवटी गेले कंटाळुन । सहज उद्गारले वचन । काय देवीची इच्छा असे ।। १०० ।।

तेव्हां विनंती केली मनांतुन । आतां पानें न द्यावीं निसटून । सरळ येथुनि जाऊन । जानकीचे पायांस वंदिन ।। १०१ ।।

मजला आलें कीं कळून । मनुष्याचें हें कळसूत्रीपण । अकर्त्याचें हे कर्तेपण । चालविता कोणी वेगळाची ।। १०२ ।।

माझी तीव्र इच्छा असून । कांही न चाले शहाणपण । मज दुसर्या कोणी अडवून । ठेविलें असे इच्छेनें ।। १०३ ।।

ऐसी विनंती करतां जाण । ते सरळ येती दुचाकीवरुन । जानकींचे पायां वंदून । सर्व सांगती हकिकत ।। १०४ ।।

तेव्हां जानकी सांगे हंसून । तुम्हां आले ना कळून । केवळ तिचीच इच्छा म्हणून । जीवमात्र चालती ।। १०५ ।।

अरे ! तिच्या या सत्तेविण । हलत नाहीं पवन-पान । तरी मी मी काहीं करुन । अहंकार करूं नका ।। १०६ ।।

बब्बडराव गेल समजून । जानकीचें भक्त झाले तेथून । दृढ श्रद्धा पायीं ठेवून । सुभक्त जाहलें तिचे ते ।। १०७ ।।

त्यावरून भक्तजन । जानकीचें कळेल श्रेष्ठपण । शिवशक्ति एकवटून । प्रकटली होती भारतीं ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम नवमोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*