।। श्री ।।
।। अथ षष्ठोऽध्याय: ।।
श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।
ऐसें हे जानकीचें जीवन । अगाध लीलेनें भरलें पूर्ण । तर्क वितर्क बुद्धी ज्ञन । पांगुळे पडती जाणावया ।। १ ।।
या विज्ञानाच्या युगांत । तर्क वितर्क वाढले बहुत । कार्यकारणा शोधित । राहतील चिकित्सक ।। २ ।।
परि न होईल समाधान । अथवा त्यांचें भ्रमनिरसन । केवळ चमत्कार पाहून । नमस्कार करिती अंधत्वें ।। ३ ।।
परि चमत्कारांत नाही मोठेपण । संत त्याहून श्रेष्ठ असती जाण । भक्तांना विश्वास बसावा म्हणून । दिव्य दाखविती करून ।। ४ ।।
जेव्हां दिव्यत्वाची येते प्रचिती । तेव्हां विनम्र भावें वंदिती । भक्ति उमलोनियां चित्तीं । दृढ चरण धरिती ते ।। ५ ।।
असो, जानकीचे एक आप्त । गुप्ते म्हणुनि कुटुंबांत । त्यांचे कुळीं पुत्र जन्मत । आनंद होई म्हणोनियां ।। ६ ।।
पूर्वी बाळंतिणीच्या खोलींत । पूर्ण अंधार असत करीत । त्यामुळें मुळीं न कळत । बाळ सर्वांगी तें कैसें ।। ७ ।।
विश्वास ठेविती सुईणीवर । सांगे सर्वांग आहे सुंदर । म्हणोनि न जाती सत्वर । बाळ बघाया अंधारीं ।। ८ ।।
पूर्वीं तिला न कोणी शिवती । छायाही न पडूं देती । कोणी बघावया न जाती । सक्ती असे कुटुंबात ।। ९ ।।
ऐसे दहा दिवस जाती । उजेडांत बाळास आणिती । सर्व आश्चर्ये बघती । बाळ असे चक्षुहीन ।। १० ।।
परिवार आई घाबरून । आतां काय करावें म्हणून । डॉक्टरांस पाचारून । आणिला कीं सत्वर ।। ११।।
डॉक्टर पाहे तपासून । तों खाचाच आहेत म्हणून । सर्वांना सांगे निक्षून । यास उपाय कांही नाहीं ।। १२ ।।
सर्व जाहले निराश । कैसें अंधत्व आलें बालकास । कैसें त्याचें भावीं आयुष्य । सचिंत झाली माऊली ।। १३ ।।
पति-पत्नी गेले घाबरून । कैसें निपजलें बाळ चक्षुहीन । आपुल्या दैवास देती दूषण । धांवा करिती देवाचा ते ।। १४ ।।
जय जगदंबे कुलस्वामिनी । कृपा आम्हावर करोनी । बाळास या दृष्टी देवुनी । संरक्षावें गे जीवनीं ।। १५ ।।
अपराध जरी असेल घडला । तरी प्रायश्चित्त न द्यावे बालकाला । पायीं पदर असे पसरला । शिक्षा मजला द्यावी कीं ।। १६ ।।
ऐसें आई करितां रुदन । तों जानकीचें जाहलें स्मरण । म्हणे बायजीस बोलावून । आणावें कीं लौकरी ।।१७ ।।
निरोप गेला गणदेवीस । जानकी येई सावकाश । पाहोनियां बालकास । अंकावरी तिनें घेतलें ।। १८ ।।
अश्रु भरल्या नयनीं । आई लागे जानकीच्या चरणीं । म्हणे कृपा बाळावरी करोनी । अंधत्वा त्याच्या परिहारावें ।।१९ ।।
जरी त्याची पुण्याई असेल उणी । तरी माझी द्यावी कढोनी । परि त्याला दृष्टी देवुनी । जीवन फुलवावें सत्वर ।। २० ।।
तेवहां बाळास घेऊन मांडीवर । हात फिरवला अंगावर । म्हणे काशिनाथा लौकर । उघड लोचन आपुले ।। २१ ।।
सर्व जिज्ञासेनें होते पाहत । तों ‘काशिनाथ’ डोळे उघडीत । दृष्टी येऊनी लोचनांत । टकमकां पाहें सर्वांकडे ।। २२ ।।
हर्ष जाहला कुटुंबांत । जयजयकार जानकीचा करीत । आम्हांस केले चिंतामुक्त । पायीं वारंवार वंदिती ।। २३ ।।
तूं मुक्यास देसी वाणी । पांगोळ्यास नेशी गिरिवरुनी । आंधळ्याच्या दिलें नयनीं । तेज आपुल्या कृपेनें ।। २४ ।।
ऐसी प्रार्थना केली मनीं । तोंचि बाळास उचलोनि । आईच्या ओटींत देऊनी । म्हणे सांभाळी याला प्रेमानें ।। २५ ।।
ऐसे हे संत शिरोमणी । भक्तांचा भाव पाहोनी । करिती अगाध करणी । लीलया ते कृपेनें ।। २६ ।।
ऐशाच कृपेची दुसरी कथा । मी तुम्हास कथितों । आता यावरून संतमहत्ता । तुम्हां येईल कळुन ।। २७ ।।
एक हिरा नामें सुभक्त । गर्भार होती प्रत्यक्षांत । अंगानें चांगली गरगरीत । गर्भ तेजानें प्रतिदिनीं ।। २८ ।।
खरोखरीच दिसे सुंदर । तेव्हा कुणाची लागे नजर । दुष्ट स्त्रियेला उपजुनी मत्सर । करणी करी तिजवरी ।। २९ ।।
तें पोट लागलें उतरुं । आता गर्भ लागे झरु । तेज लागलें ओसरुं । हिराचें तें तेधवा ।। ३० ।।
हिरा गेली घाबरन । डॉक्टरही पाही तपासून । परी कांहींच कार्यकारण । सांपडेना तयाला ।। ३१ ।।
ऐसी ती जातां झरून । दिवस तिचे आले भरुन । तिच्या कृश ऐशा देहांतुन । दुर्बल पुत्री जन्मली ।। ३२ ।।
पुत्री जन्मली ती विक्षिप्त । एक पाय होता गळ्यात । दुसरा उलटा होता देहांत । ध्यानही होतें विद्रूप ।। ३३ ।।
हिरा जाय घाबरुन । बाळ विद्रूप जन्मले म्हणून । जानकीचा धांवा करुन । रडूं लागली तेधवा ।। ३४ ।।
काय माझ्या दुर्दैवांत ?। ऐसी पुत्री जन्मा येत । कैसें सांभाळू जीवनांत । लुळें पांगुळे बालक ।। ३५ ।।
दृष्ट कोणाची लागली । पूर्ण कळी न फुलली । जन्मतांच कीं करपवली । कळी माझ्या कुशीची ।। ३६ ।।
माझ्या बाळाचें लुळेपण । मज पाहवेना एक क्षण । त्यापरतें माझे जीवन । नष्ट होऊं दे माऊली ।। ३७ ।।
माझे उरलेलें सर्व जीवन । बालकास द्यावे संपूर्ण । सुदृढ देहातें करुन । दीर्घायुषी करी त्या ।। ३८ ।।
हांक हिरेची करुण । जानकीस आली कळून । बघण्यास आली धावून । एकवीस दिवसानंतर ।। ३९ ।।
मांडीवर बाळास घेऊन । स्वयें त्या पाही निरखून । म्हणे यास करणी करुन । पिळलें असे कोणीतरी ।। ४० ।।
तिन्ही सांजेच्या वेळेंत । उतारा करावा नियमित । नित्य सव्वा महिन्यापर्यंत । बालकावरुन आपल्या ।। ४१ ।।
ऐसें हिरा असतां करीत । सव्वा महिना आला भरत । तों जानकी येऊन सस्मित । बाळास द्यावें म्हणतसे ।। ४२ ।।
म्हणे हिचे कपडे घ्यावे काढून । ते खड्ड्यांत टाका पुरुन । बाळाते आंघोळ घालुन । करी माझ्या दे हिरे ।। ४३ ।।
तैसें करोनियां हिरा ती । बाळास देई जानकी हातीं । हृदयी धरोनी प्रीती । घुमुं लागली आनंदानें ।। ४४ ।।
हात फिरवून अंगावरून । वरी उंच उडवून । त्वरित घेई झेलून । आनंदानें जानकी ।। ४५ ।।
ऐसें तियेंशी खेळून । हिरेच्या ओटींत फेकून । म्हणे ठेवि हें सांभाळून । बाळ सुदृढ चांगलें ।। ४६ ।।
सर्व आश्वर्ये होतें पाहत । जीव आणुनी डोळ्यांत । विश्वासही नव्हता बसत । बघणार्यांना घटनेवर ।। ४७ ।।
जें अशक्य होतें जीवनांत । तें स्पष्ट घडलें प्रत्यक्षांत । बाळ सर्वांग सुंदर होत । पांगुळपणा दवडूनी ।। ४८ ।।
हृदय आले उचंबळोनी । हिरा लागे जानकीचरणीं । चरण धुतले अश्रुंनी । जानकीचे प्रीतीनें ।। ४९ ।।
जय जानकी कृपा करोनी । मज धन्य केलेस जीवनीं । देहचर्माच्या चपला करोनी । तव पदी घालीन ।। ५० ।।
ऐसें मी केलें तरी । हे अनंत उपकार माझेवरीं । न फिटतील जन्मांतरीं । ऋण तुझें हे प्रचंड ।। ५१ ।।
यावरुन भक्तजन । तुम्हां येईल कळून । कीं संताचें हे श्रेष्ठपण । श्रद्धाच केवळ जाणूं शके ।। ५२ ।।
तेथें नसे कार्यकारण । त्याला नसे विशिष्ट प्रमाण । केवळ त्यांची इच्छा म्हणून । अतर्क्य ऐसें घडू शके ।। ५३ ।।
मुलीचें नांव ठेविलें रेवती । संसारीं झाली भाग्यवती । होई धनसंतानप्राप्ती । जानकीच्या कृपेनें ।। ५४ ।।
छबूराव प्रधानांचे मुलीला । अल्प आजार जडला । उपचारार्थ ते तिजला । दवाखान्यांत ठेविती ।। ५५ ।।
उपचार करिती बहुत दिन । परि व्यर्थ गेले यत्न । कायावाचें झाली क्षीण । मृत्यु पावली मुलगी ती ।। ५६ ।।
नेण्याची सर्व तयारी जाहली । तिज बाहेर असे काढिली । रस्त्यावरी येतां जाहली । जागृत कीं ती बालिका ।। ५७ ।।
पुन्हां आणिती दवाखान्यांत । डॉक्टरही तिजला तपासित । वाटे जाहली कीं जिवंत । उपचारार्थ तिला ठेविती पुन्हां ।। ५८ ।।
कांही दिवद ठेवून । तिज घरीं गेले घेऊन । तिची चर्या गेली बदलून । विस्मृति झाली घराची ।। ५९ ।।
तशी वागणूकही बदलून । भाषाज्ञान, जातिस्मरण । विसरून गेली सर्व म्हणून । आश्चर्य करिती मनांत ।। ६० ।।
कुणासही न ओळखे ती । संकुचित जाहली वृत्ती । पदार्थ चोरून खाई ती । बावरलेल्या नजरेनें ।। ६१ ।।
ऐसें तिचें पाहून वर्तन । घरांत शंका होत उत्पन्न । निष्णात डॉक्टरांसी आणुन । दाखवावी की पुन्हां तिला ।। ६२।।
श्रीखंडूभाई देसाई सर्जन । डॉक्टर प्रख्यात होते म्हणून । त्यांचा अध्यात्म प्रगति जाणून । मुलीस नेती दाखवावया ।। ६३ ।।
नाडी पाहतां तपासून । म्हणे मुलीत नाही चैतन्य । मूळ आत्माच बदलून । दुसराच वावरें शरिरीं ।। ६४ ।।
परकाया प्रवेशून । दुसर्याच्या शिरला देहांतून । म्हणोनियां विस्मरण । तुमच्या मुलीस जाहले ।। ६५ ।।
तेव्हां प्रधान त्यांना सांगती । जेव्हां हिची गेली प्राणज्योती । दुसरीही मुलगी वारली होती । त्याच वेळीं त्याच स्थळीं ।। ६६ ।।
ती जातीची वारली होती । आम्हीं तिला पाहिली होती । एकाच वॉर्डात होती । दवाखान्यांत त्या वेळी ।। ६७ ।।
तिचे प्रेताजवळून नेता हिला । प्राण मुलीत तिचा संचारला । आम्हांस अति आनंद झाला । जिवंत झाली म्हणोनियां ।। ६८ ।।
परि देसाई तयांना सांगती । कीं विचित्र आहे रुग्णस्थिति । वैद्यकीय इलाजही नसती । दैवी मार्गासी बघावें ।। ६९ ।।
तैं प्रधान त्यांना सांगती । कीं आम्ही न जाणूं दैवी व्यक्ती । कृपा करोनिया मति । सुचवावी आम्हाला ।। ७० ।।
तेव्हां देसाई तयांना सांगत । कीं गणदेवीस जावें त्वरित । उलगडा होईल निश्चित । मार्ग सापडेल तुम्हांला ।। ७१ ।।
जैसे प्रधान येती गणदेवींत । जानकी मुलींना असे सांगत । आज पहावया मिळेल गंमत । एका मुलीची तुम्हांला ।। ७२ ।।
आत्मा बदलून आली । परकायेंत प्रवेशली । मरुनी जिवंत राहिली । ऐंसी मुलगी येईल ।। ७३ ।।
मुलींना वाटली गंमत । वाट आश्चर्याने पाहत । प्रधान घेऊनियां येत । मुलीला आपुल्या सवें ।। ७४।।
सर्व बैसोनियां घरांत । वृत्तांत होते कथित । तोचि जानकी सर्व सांगत । पुढील कथानक मुलीचें ।। ७५ ।।
जेव्हां हिचा गेला प्राण । तेव्हां दुसरीस एका आलें मरण । तोचि जीव पुन्हां प्रवेशून । हिच्या देहीं वावरतो ।। ७६ ।।
ती वारली जातीची होती । तैसी राहे तिच्या स्मृति । तुमच्या प्रपंचाची माहिती । कैसी तिजला असणार ।। ७७ ।।
तेव्हां मुलीस त्या विचारती । कशास आलीस या देहीं । सस्मितवदने सांगे ती । इच्छा राहिली भोगांची ।। ७८ ।।
मी गरीब होते म्हणून । खावयास मिळे न अन्न । मौज-नाना आनंद । भोगावया आलें मी ।। ७९ ।।
मी न जाईन देहांतुन । सर्व इच्छा करीन पूर्ण । मला न द्यावें ढकलून । पायीं विनंती करीतसे ।। ८० ।।
प्रधान जाती घाबरुन । सर्व ऐकून संभाषण । म्हणे कैसें भविष्य जीवन । माझ्या मुलीचें कळेना ।। ८१ ।।
जानकीच्या पायां पडती । म्हणे काहीं सुचवावी युक्ति । हिचें जीवन तुमचें हातीं । सोपविलें म्हणोनियां ।। ८२ ।।
म्हणे तुमच्या मुलीचा प्राण । पुन्हां न येईल परतोन । तिनें जन्म घेतला म्हणून । जगांमाजी पुनश्च ।। ८३ ।।
तिचें ऐसें हे कलेवर । घरांत न ठेवावें खरोखर । तरी यावर तुमचा विचार । काय आहे तो सांगावा ।। ८४ ।।
पुढील सर्व भविष्य जाणून । प्रधान सांगती विनवून । ऐसें हें मृत-जीवन । आमुच्या घरीं नसावें ।। ८५ ।।
जेथें मुलीचा नाही प्राण । तेथें प्रीती न होई उत्पन्न । ऐसा हा देह सांभाळुन । काय आम्हीं करावे ।। ८६ ।।
स्पष्ट कल्पना आहे मला । काय होईल या मुलीला । मनोनिश्चय आमुचा झाला । चिंतेतून सोडवावें ।। ८७ ।।
तैसें मुलीला घेतलें बोलावून । मुस्कटात दिली एक ठेवून । तोंचि तिचा प्राण जाऊन । कलेवर पडले तेथें ।। ८८ ।।
असो, एकदां गणदेवी गांवांत । लग्न होतें कुण्या घरांत । म्हणोनियां आमंत्रित । केलें जेवावया सर्वांना ।। ८९ ।।
जानकीस ते सांगत । कीं तुम्हीं यावें निश्चित । आशिर्वाद हवा लग्नांत । वधुवरांना म्हणोनियां ।। ९० ।।
जानकी न जाय कुणाकडे । परि आग्रहाचें पडे सांकडें । गांवांत न व्हावें वाकडें । म्हणोनियां ती जात असे ।। ९१।।
मुलांची मावशीही होती । तिला घेऊनिया सांगाती । दोघी लग्नघरीं जाती । त्या सकाळपासोनी ।। ९२ ।।
लग्न चाले श्रीमंती थाटांत । तेथें गरीबांस न विचारित । लक्ष कुणीही न देत । दखल न घेती तयांची ।। ९३ ।।
त्यातून कपडेही नव्हते चांगले । म्हणोनि सर्वांनी दुर्लिलें । म्हणती भिकारी हे आले । कशास आमुच्या लग्नाला ।। ९४ ।।
तै कुणा मुलीच्या डोक्यांतील । हरवले सोन्याचें फूल । जिवाची होऊन घालमेल । शोधाशोध चालली ।। ९५ ।।
यजमान बहुत संतापले । म्हणे तुम्हींच असेल घेतलें । जानकी मावशीस वदले । उद्देशून क्रोधानें ।। ९६ ।।
जोंवरि न सांपडेल फूल । तुम्ही येथोनी न हलाल । याचि कोपर्यांत बैसाल । तुम्ही दोघी तोंवरि ।। ९७ ।।
जैसें लग्नही पडलें पार । तैसी टळून गेली दुपार । भोजनादि सर्व व्यवहार । पार पडला की सर्वांचा ।। ९८ ।।
दोघी बैसल्या कोपर्यांत । त्यांना कोणीही न विचारीत । भोजन पाणीही ना देत । सायंकाळपर्यंत ।। ९९ ।।
जैसी वेळ रात्रीची होत । तैसे दादा येती शोधत । म्हणे पत्नी न आली घरांत । सांगा कोठे असे ती ।। १०० ।।
यजमान जाहला सामोरी । म्हणे लग्नांत जाहली चोरी । ती सांपडेना तोंवरी । न त्या येथून हालतील ।। १०१ ।।
दादा जाती संतापून । कुर्हाड येती घेऊन । म्हणे यावें माझ्या समोरून । आळ कोणी घेतला असे ।। १०२ ।।
माझ्या पत्नीस म्हणता चोर । लाज न वाटे हरामखोर । आमुच्यासारिख्या गरिबावर । आळ घेता चोरीचा ।। १०३ ।।
प्रसंग पाहून गंभीर । जानकी धांवली समोर । म्हणे आवरा कुर्हाड सत्वर । न येथें कार्य तियेचें ।। १०४ ।।
वर्हाडी मंडळी जमली । त्यांना उद्देशून ती बोलली । काय श्रीमंतीची जाहली । सर्व बाधा तुम्हाला ? ।। १०५ ।।
तुम्हीं पहावें आम्हांसमोर । कोण श्रीमंत आहे खरोखर । रोखून पहावें नजर । दिसून येईल तुम्हांला ।। १०६ ।।
वर्हाडी पाहती रोखून । तों दोघींत येई दिसून । नखशिखांत अलंकार घालून । उभ्या असती समोर ।। १०७ ।।
मुकुट लखलखे शिरावरी । रत्न-माणिकांच्या होत्या गळसरी । बाजुबंद चमकती दंडावरी । पायीं पैंजण सोनियाचे ।। १०८ ।।
शालु सुंदर भरजरी । कंबरपट्टा शोभें वरी । अंगठींत होते भारी । हिरे-मौक्तिक जडलेले ।। १०९ ।।
रुप पाहतां ते सुंदर । भयभीत झाले लग्नघर । जानकी तेथोनियां सत्वर । निघोनि गेली स्वगृहा ।। ११० ।।
डोळे विस्फारुनि पाहती । वर्हाडी ते आश्चर्य करिती । म्हणे कैसी आमुची मति । भ्रष्ट झालीं तयेवेळीं ।।१११ ।।
म्हणोनियां भक्तजन । गरिबीचा न करावा अपमान । जया जैसें दिलें जीवन । त्यांत संतोष मानावा ।। ११२।।
इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम षष्ठोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।
Leave a Reply