सावली अध्याय ८ वा

।। श्री ।।
।। अथ अष्टमोऽध्याय: ।।

श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

स्वत: जानकीचे प्रपंचात । सहा अपत्यें होती नांदत । पैकी पांच मुलींच्या संगत । एक सुपुत्र लाभला ।। १ ।।

वत्सला आणि ताराबाई । चिमणेनंतर बापू येई । कुसुमचे पाठीवर येई । एक पुत्री कलावती ।। २ ।।

मुलींचे लग्नानंतर । नातवंडांनीं भरलें घर । असा हा जानकी संसार । बाळगोपाळांनीं नांदतसे ।। ३ ।।

गायी वासरें होती गोठ्यांत । उत्तम धान्य येई शेतांत । कमतरता नव्हती कशांत । प्रपंचू-परमार्थु एकु केला ।। ४ ।।

जे परमार्थ उत्तम साधती । साधूपरी ठेवूनियां वृत्ती । आणि प्रपंचांत न गुंतती । स्थितप्रज्ञासारखे ।। ५ ।।

वृत्ती सदैव राही शांत । संसारीं आपत्तींत न कोपत । अद्वैत भावना मनांत । जागृत राहे प्रेमरूपें ।। ६ ।।

परंतु दादा जणु जमदग्नी । या रेणुकेस लाभले जीवनीं । खडाष्टक होई संसारांतूनी । क्षुल्लक ऐशा कारणे ।। ७ ।।

नवरात्राचे असतां सुदिन । म्हणोनी पुढील प्रांगणांतून । गरबे करिती सर्व मिळून । मुलें-मुली दरूवाड्याचीं ।। ८ ।।

जैसे गरबे येती रंगांत । मुली आईस विचारीत । गीतें गांवींत गरब्यांत । आम्हां सवें खेळोनियां ।। ९ ।।

मुलींची ऐकून विनवणी । जानकी खेळे गरब्यांतुनी । रंग भरतां रिंगणीं । समयभान विसरती ।। १० ।।

घरांत शिरण्या होता उशीर । तेव्हां दादा कोपती पत्नीवर । म्हणे ‘थेरडीस’ न शोभे ‘थेर’ । मुलांसवें नाचण्याचे ।। ११ ।।

तेव्हां जानकी सांगे पतीला । कीं गरब्यांत फेर धरण्याला । लहान थोरांसही लाभला । हक्क येथें खेळण्याचा ।। १२ ।।

गरबा एक भक्तिप्रकार । एथें सारिखा लहान थोर । देवी स्वत: धरी फेर । भक्तांसवे गरब्यांत ।। १३ ।।

परि गोष्ट न पटे पतीला । म्हणे थोरांस न शोभती लीला । मुखी वारंवार धरिला । सूर तोचि टोंचणीचा ।। १४ ।।

ती शब्द न काढी मुखांतून । पतिव्रता वांकडे न धरी मनांतून । म्हणे पतीस द्यावी जाण । देवतांच्या लीलेची ।। १५ ।।

तेचि दिनीं रात्रींला । आगीचा डोंब उसळला । लोकांचा गलबला झाला । सर्व जमती घरापुढे ।। १६ ।।

घरास आग लागली । दरुवाड्याची मंडळी जमली । घरांतील मंडळी झोंपली । लोक उठविती दादांना ।। १७ ।।

दादा उठोनियां पाहत । तों आग लागली घरांत । गवर्या, लाकडे खोलींत । सुकें गवतही होतें ज्यांत ।। १८ ।।

ज्वाळा उंचावरी पसरती । पाहतां उपजे मनांत भिती । पाण्यांच्या बादल्या फेकिती । सर्व आणूनी घरांत ।। १९ ।।

तेव्हढ्यांत जमले गांवकरी । पाण्याच्या फेकिती घागरी । आग जराही न शमे तरी । ज्वाळा भडकती अधिकचि ।। २० ।।

ऐसी रात्र गेली उलटोन । थांबण्याचें न दिसे लक्षण । लोकही जाती थकून । परि आग नावरे तयांना ।। २१ ।।

येवढा प्रकार चाले घरांत । परि जानकी बैसली कोपर्यांत । गांभीर्याची दखलही न घेत । स्वस्थचित्तें बैसली ।। २२ ।।

दादा मनांत गेले समजून । कीं आपण कोपलों गरब्यावरून । आज मलाच ऐसें नाचवून । शरण आणिलें देवीनें ।। २३ ।।

जेव्हां पहाट गेली उजाडोन । सर्व प्रयत्न झाले शून्य । तेव्हां घराचे भविष्य जाणोन । जानकीजवळ जाती स्वत: ।। २४ ।।

साष्टांग करोनि नमन । म्हणे आगीचे करावे शमन । काय पहात बैसलां येथून । शरण आलों पायीं मी ।। २५ ।।

स्वत: उठविती तिला धरून । गडू तीर्थाचा दिला उचलोन । म्हणे शिंपडावें आगीवरून । तीर्थ आपुल्या हातानें ।। २६ ।।

जानकी हांसे मनांतुन । तीर्थ शिंपडे ज्वालेवरून । म्हणे शांत व्हावें अग्नीनारायण । ॐ शांति शांति म्हणोनियां ।। २७ ।।

सर्व आश्चार्यानें होते पाहत । अग्नी हळू हळू गेला विझत । जो रात्रीभर नव्हता आवरत । तो शांत झाला झडकरी ।। २८ ।।

अपार फेकिलें होते पाणी । तरिही नावरला होता अग्नी । परि जानकीच्या तीर्थ शिंतोड्यांनी । आग गेली विझून ।। २९ ।।

गवर्या, लाकडे होतें गवत । झळ त्यांनाही न लागत । सर्व आश्वर्य होते करित । घरही वांचले म्हणोनियां ।। ३० ।।

त्यनंतरही बहुत दिन । कोळसे निघती जमिनीतून । आग धुमसत राहिली म्हणून । खणून काढिले सर्व ते ।। ३१ ।।

तेव्हां दादांस आलें कळून । जानकीची शांति परमपावन । परि कोपली की ती वडवानल । मग क्षमा नसे कोणा ।। ३२ ।।

मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू ऐसे । जानकीचें जिणें तैसें । तुकाराम जैसें सांगतसे ।। ३३ ।।

असो, नणंद होती कलावतीची । उपवर झाली लग्नाची । तिच्या वरसंशोधनाची । तयारी चालली घरांत ।। ३४ ।।

मुरलीधर नावांचे मुलाला । सहज दाखविती मुलीला । तेणें पसंत करितां वधूला । वाद चाले घरांत ।। ३५ ।।

मुलास नव्हते माता पिता । सहा भावंडांचा पोशिता । कोणी गणगोतही नव्हता । स्त्रीही नव्हती घरांत ।। ३६ ।।

प्रपंचाचा पडेल भार । म्हणोनी नाकारिती तो वर । तों जानकी सांगे विचार । बदलू नये आपुला ।। ३७ ।।

तुमची मुलगी सुखी होईल । जरी याची घरांत पडेल । भाग्य तिचे उजळेल । वासकरांचे कुटुंबात ।। ३८ ।।

ऐसा तिचा ऐकून विचार । लग्नाला दिला होकार । परंतु वासकरांचेकडील । स्त्री नव्हती कार्याला ।। ३९ ।।

तेव्हां जानकी सांगे मुरलीधरांना । मी तुमचीच आई जाणा । तुमचेकडून पुढारीपणा । लग्नांत मी घेईन ।। ४० ।।

कार्यास प्रारंभ करावया । घाणा घेतला भरावया । चार चौघी जमती स्त्रिया । जातें फिरवीत बैसल्या ।। ४१ ।।

हळकुंडे टाकीत जात्यांत । मुखीं ओव्या गात गात । परि हळकुंडे भरडितां निघत । कुंकू बाहेर जात्याचे ।। ४२ ।।

कुंकू निघालें पसाभर । नववधूस दिधलें ओंजळीभर । म्हणे सौख्य लाभेल भरपूर । कुंकू लावावें प्रतिदिनीं ।। ४३ ।।

तीन चिमटी काढावें यांतून । तें कपाळी नित्य लावून । त्यांत तीन चिमट्या भर टाकून । सांभाळावे या प्रसादाला ।। ४४ ।।

ऐसा घडतां मंगल शकुन । त्यांचे शुभ मंगलही होऊन । जानकीचा आशिर्वाद लाभून । संसारघडी स्थिरावली ।। ४५ ।।

एका चामड्याचे कारखान्यांत । वासकर होते नोकरींत । परि दैवाची चक्रें फिरत । भाग्योदय जाहला ।। ४६ ।।

जेथे नोकरी होते करित । जवळील जागा भाड्यानें घेत । कारखानदार होती भाग्यवंत । जानकीच्या पूर्ण कृपेनें ।। ४७ ।।

सुळे नांवाचे होते गृहस्थ । भोळे भाबडे देवभक्त । त्यांना साधुची लागे संगत । नादीं लागती तयाच्या ।। ४८ ।।

साधु करी नाना प्रकार । किंवा दाखवितसे चमत्कार । सुळे भुलुनी जाती साधुवर । सेवा करिती अखंड ।। ४९ ।।

म्हणे देवी कृपा करिल । जरी पैसे मज तूं देशील । माझ्या सवेसी राहतील । तुझ्या मुली सदैव ।। ५० ।।

जैसे तो शब्द काढी मुखांतून । पतिपत्नी पाळिती वचन । कळे न कैसे जाती भुलून । आज्ञा पाळिती साधुची ।। ५१ ।।

सुळे पत्नीजवळून । मंगळसूत्रही घेतले मागून । म्हणे वैराग्यापरी जाण । जीवन तुम्हीं जगावें ।। ५२ ।।

सोनें नाणें घेई मागून । देवी यज्ञाचें सांगे कारण । म्हणे परीक्षा निष्ठेची पाहून । देवी प्रसन्न होईल तुम्हांवरी ।। ५३ ।।

ऐसें काढून घेतां सर्व धन । दोन वेळेचें महागलें जेवण । तरीही न उघडती लोचन । परमभक्ती जडलीसे ।। ५४ ।।

येतां नवरात्रीचे सुदिन । साधु म्हणे येतों जाऊन । पुण्यास मी यज्ञा कारण । देवी याचना करावया ।। ५५ ।।

जैसा साधु गेला घरांतुन । मुली स्पष्ट सांगती कारण । आम्ही न करूं सेवा जाण । ऐशा भोंदू साधूची ।। ५६ ।।

कुजबुज चाले घरांतून । नापसंती दर्शविती प्रत्येक जण । परि सुळ्यांना न पटे कारण । साधूस गुरु केला म्हणोनि ।। ५७ ।।

ऐसे चैत्राचे आले सुदिन । म्हणोनी हळदीकुंकवाचे कारण । सुळे पत्नी येती एक दिन । जानकीकडे त्या निमित्तें ।। ५८ ।।

स्त्रियाही जमल्या बहुत । सुळे पत्नी बैसली कोपर्यांत । शून्य ऐशा नजरेंत । देहभान विसरती ।। ५९ ।।

जानकीची सहज गेली नजर । म्हणोनि बोलवी आपुल्यासमोर । शिरीं ठेवोनियां कृपाकर । म्हणे काय मूर्खपणा चालविला ।। ६० ।।

अजुनी ना उघडती लोचन । सारें लुटून नेलें तरी धन । काय बैसलीस डोळे मिटून । जागृत व्हावें झडकरी ।। ६१ ।।

कुंकू ठेविलें हातावर । तों तें उडू लागलें वरचेवर । म्हणे साधू नाचवी तुमचें घर । ऐसेंचि त्याच्या इच्छेपरी ।। ६२ ।।

हा साधू आहे भोंदू । केवळ आहे संधिसाधू । त्याचा सोडावा नादू । नातरी विपरीत घडेल ।। ६३ ।।

हें कुंकू लावावें सर्वांना । जेणें शुद्ध होईल कल्पना । विकल्पित झाल्या मना । ज्ञान जागृती येईल ।। ६४ ।।

त्या सर्वांना कुंकू लावती । तै झोपेंतून येई जागृती । ऐसी शुद्ध होऊन मति । सुळे पतिपत्नी सावरले ।। ६५ ।।

साधु न आला परतुन । तो परस्पर गेला समजून । केवळ जानकीकृपें करुन । भोंदूगिरी तयाची न चाले ।। ६६ ।।

म्हणोनियां श्रोतेजन । बोध घ्यावा कथेवरुन । कीं सावध असावें प्रपंचातून । अंधश्रद्धा ठेवू नये ।। ६७ ।।

साधु ओळखावा लक्षणांवरुन । गुरुही करावा पारखून । केवळ चमत्कार पाहून । नमस्कार आपण करूं नये ।। ६८ ।।

एकदां ताराबाई माहेरपणाला । बडोद्याहूनी येती गणदेवीला । तेव्हां त्यांच्या पतीला । चेंडू लागला खेळतांना ।। ६९ ।।

तेव्हां पती होते बडोद्यांत । क्रिकेटचा खेळ असतां खेळत । चेंडू नाकावरी बैसत । रक्त वाहे भळभळां ।। ७० ।।

रक्त थांबे ना म्हणून । दाखल करिती दवाखान्यात । वाटे हाड गेले मोडून । शस्त्रक्रिया लागेल कराया ।। ७१ ।।

तेचि दिनी गणदेवींत । जानकी पतीला असे सांगत । तारेस पाठवावे बडोद्यास । उदईक सकाळीं झडकरी ।। ७२ ।।

ऐसें सांगून ओट्यावरी । स्वत: धांवे झडकरी । सर्व येती बाहेरी । काय झाले म्हणोनियां ।। ७३ ।।

रक्त वाहे नाकांतून । सर्व आश्चर्य करिती पाहून । तेव्हां सांगे समजावून । प्रकार त्यांना बडोद्याचा ।। ७४ ।।

म्हणे चेंडू लागला जावयाला । तो जोरानें नाकावर बसला । तोचि घाव मी झेलला । रक्त पाहिलें जें तुम्ही ।। ७५ ।।

त्यांचे रक्त नाही थांबत । माझी आठवण आहे करीत । मुलीस पाठवावें त्वरित । प्रसाद देते लावण्याला ।। ७६ ।।

असतां निघण्याचे तयारींत । तों तारच मिळे हातांत । म्हणे पिंजर टाकावी मुखांत । निश्चिंत असावें मानसीं ।। ७७ ।।

तारा येई बडोद्यांत । तडक जाई दवाखान्यांत । कळे कीं पती नाहींत शुद्धीत । रक्तही न थांबे नाकाचें ।। ७८ ।।

डॉक्टर करीत होते विचार । शस्त्रक्रिया करावी लौकर । परि बेशुद्धींतल्या रुग्णावर । कार्य कराया न धजती ।। ७९ ।।

जैसी तारा जवळ बैसली । पतीस जागृती आली । म्हणे आई का न आली । बघायला ती मजला ।। ८० ।।

तेव्हां तारा जाई आनंदून । म्हणे आईस आले मी घेऊन । प्रसाद लांबून दाखवून । पिंजर लाविली नाकाला ।। ८१ ।।

खडीसाखरेचे पाणी करुन । तेहीं दिलें तोंडातून । आणि आश्चर्य आलें घडून । रक्त थांबलें क्षणांत ।। ८२ ।।

डॉक्टर आलें धावून । पाहती तों रक्त गेले थांबून । सायंकाळी परतून । घरी पाठविलें तयांना ।। ८३ ।।

ऐसी परपीडा केली हरण । स्वत:चे अंगावर झेलून । जानकीचें हें अलौकिकपण । कुणा ना आकळे कधींही ।। ८४ ।।

लक्ष्मणराव प्रधान । अटरा वर्षांचे असतां जाण । जानकीच्या दर्शनाकारण । गणदेवीस येती एकदां ।। ८५ ।।

जैसे मस्तक ठेविती चरणांवर । तैसे फुलें दिली ओंजळीभर । भावें घेऊनियां सत्वर । बाजूस बैसती निष्ठेने ।। ८६ ।।

विचारमग्न असतां लक्ष्मण । जानकीचे लक्ष गेले म्हणून । बाळा कशास थांबलास अजून । प्रश्न पुशिला प्रेमानें ।। ८७ ।।

ओंजळ आपुलीं पुढें करून । सांगे फुलांकडे बघून । म्हणे काय करावे ह्यांचे म्हणून । प्रश्न आला मनांत ।। ८८ ।।

तेव्हां हांसोन सांगे लक्ष्मणास । फुलें वहावी महादेवास । तुज दर्शन देईल तो खास । भोळा सांब सदाशिव ।। ८९ ।।

आणि तो तुजसवें बोलेल । काय हवें म्हणून विचारील । भाग्य तुझें उजळवील । मागून घ्यावें हवें तें ।। ९० ।।

तैसाची उठला लक्ष्मण । मंदिरांत गेला दर्शना कारण । गाभार्यासमोर उभा राहून । लक्षीतसे शिवपिंडीस ।। ९१ ।।

तोंचि त्यानें तेथें पाहिला । एक गलिच्छ वृद्ध बैसला । त्यानें आपुला पाय ठेविला । शिवपिंडीवरी प्रत्यक्ष ।। ९२ ।।

जैसा तो पाही लक्ष्मणास । तैसा प्रश्न पुसे सावकाश । कोणत्या आशेनें आलास । काय पाहिजे तुजला रे ।। ९३ ।।

त्याचें पाहुनिया गलिच्छपण । लक्ष्मण गेला गोंधळून । म्हणे सहज आलो दर्शनाकारण । महादेवाच्या मंदिरांत ।। ९४ ।।

परि तोचि प्रश्न पुसे परतोन । काय पाहिजे तुज म्हणून । तैं ओंजळ पुढें करून । दाखवीतो तयाला ।। ९५ ।।

म्हणे पाय घ्यावेत काढून । आपुले या पिंडीवरून । म्हणजे मी वाहीन । सर्व फुलें शिवावरी ।। ९६ ।।

वृद्ध हांसला मनांत । पाय बाजुला असे करित । लक्ष्मण उतरला गाभार्यांत । फुलें वाहण्या शिवावरी ।। ९७ ।।

त्याचा विक्षिप्तपणा पाहून । अनादर उपजला मनांतून । त्याचेकडे न पाहे ढुंकुन । फुलें अर्पुनी परतला ।। ९८ ।।

जैसा घरांत शिरला लक्ष्मण । तोंचि जानकीने केला प्रश्न । घडलें का बाळा शिवदर्शन । काय पुशिलें तयांनी ।। ९९ ।।

म्हणे मज न घडले दर्शन । परि एक गलिच्छ ब्राह्मण । पिंडीवरी ठेवुनियां आपुले चरण । बैसलेला पाहिला ।। १०० ।।

त्यानेच विचारला प्रश्न । तुज काय हवें म्हणून । परि मनांत न पटे खूण । निरुत्तर उभा राहिलों ।। १०१ ।।

जानकी हसली खदखदून । वेड्या काय केलेस म्हणून । ते शिव प्रत्यक्ष प्रकटून । दर्शन देण्या आले कीं ।। १०२ ।।

तैसाची गेला तो गोंधळून । आपुल्या दैवास दिलें दूषण । कैसे न ओळखिलें आपण । प्रत्यक्ष सांगितलें असतांना ।। १०३ ।।

त्याचें गहिवरून आलें मन । तै डोळ्यांत आले अश्रु भरुन । तें हात फिरवुनी पाठीवरुन । जानकी समजावितसे तयाला ।। १०४ ।।

तुज न कळतां घडलें दर्शन । तें व्यर्थ न होईल जाण । तुझें सुखी होईल जीवन । जरी न लाभे समृद्धी ।। १०५ ।।

तैसेंची पुढें आले घडून । सुख शांतीत जगले जीवन । आज निवृत्त झाले प्रधान । केवळ जानकीच्या वचनानें ।। १०६ ।।

संत देती संधी आणुन । परि दैवांत असतां उणेपण । दृष्टीसमोरून जाते निघून । भुरळ मनां पडतसे ।। १०७ ।।

ऐसें जानकीचें अलौकिकपण । अंतर्ज्ञाने व्यापिलें सर्वज्ञपण । भूत-भविष्य-वर्तमान जाण । तिज आकळे पूर्वीच ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम अष्टमोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*