सावली अध्याय ७ वा

।। श्री ।।
।। अथ सप्तमोऽध्याय: ।।
श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।।

श्रोते मज सांगती । कीं तूं जी सांगतोस महती । ऐकून होतां प्रसन्न चित्तीं । उत्सुकता आमुची अधिक वाढे ।। १ ।।

जैसें जैसें चाले कथानक । आमची तैसीच वाढतसे भूक । श्रवणाचेंही पूर्ण सार्थक । होत असे कीं आमुच्या ।। २ ।।

अमृतापरी जानकीजीवन । आम्हांस करिते रे पावन । सुखी मार्गाचें आचरण । सुभक्तासी लाभतसे ।। ३ ।।

जानकीचें हें दिव्य जीवन । दीपस्तंभापरी जाणून । तेंचि जीवनलक्ष्य करून । जगता कृतार्थ वाटतें ।। ४ ।।

कल्पतरूपरी हें जीवन । देते मन:शांति नी समाधान । सर्व दु;खाचें होई शमन । मन चरणीं लीन होई ।। ५ ।।

तरी चातकापरी वाट पाहुन । सर्व इंद्रीये एकवटून । आम्हीं बैसलो एकाग्रमन । पुढील कथानक ऐकावया ।। ६ ।।

जैसा अभिषेक होई शंकरावरी । एकेक थेंब पडे पिंडीवरी । तैसी ओवी थेंबापरी । कथाकलशांतून टिपकते ।। ७ ।।

तुझ्या कथाकथनाच्या अभिषेकानें । आमुची प्रसन्न होतात मनें । चित्त नाचें भक्तिभावानें । आनंदउर्मी दाटतात ।। ८ ।।

तरी न करावा उशीर । मुखीं घालावें मधुक्षीर । जानकी-जीवन-नीर । तृष्णा आमुची शमवाया ।। ९ ।।

तुमच्या तृष्णेचें कराया शमन । पाणपोईतून काढून जीवन । ओंजळींत देतो भरून । संतृप्त व्हावें म्हणुनिया ।। १० ।।

असो,कुसुमताईचे घरांत । झाली पिशाचबाधा निर्मित । सहोदर झाले भयभीत । जीवनघडी विसकटली ।। ११ ।।

कुणी पडतसे आजारी । कुणी अमिष्टासारखें करी । शांती जाहली वैरी । घरांत त्या सर्वांना ।। १२ ।।

त्यांत कावीळ झाली नणंदेला । कोणी न उरलें घरकामाला । म्हणोनि कळविलें आईला । कालेस द्यावें धाडून ।। १३ ।।

घरांत होईल आधार । घरकामाला लागे हातभार । तरी पाठवावें लौकर । विलंब कांही करू नये ।। १४ ।।

काला जावयास निघाली । तों खरुज रात्रींत उमटली । सर्वांगी खरूजेनें भरली । स्थगीत जाहले जाण्याचें ।। १५ ।।

मुलीची ऐकून पत्रकाहाणी । काला जाऊं न शके म्हणोनि । जानकी निघे गणदेवीहूनी । बडोद्यास आली त्वरित ।। १६ ।।

पिशाचबाधा केली दूर । कावीळही जाहली पसार । सर्व पीडितांचा नूर । पार बदलून गेला कीं ।। १७ ।।

शांती निर्मिली घरांत । मनें झाली भीतिमुक्त । म्हणोनि दर्शनास निघत । पावागडीं कालिकेच्या ।। १८ ।।

कुटुंब मंडळी निघती । सवें जानकीसही घेती । मंदिराचे पायथ्याशीं येतीं । दुपारपर्यंत सर्वजण ।। १९ ।।

दोनशें पायर्या चढून । मंदिरांत येतां थकून । तोचि दुपार झाली म्हणून । मंदिर बंद होतसे ।। २० ।।

पुजारी सांगतसे सर्वांना । आतां न यावें दर्शना । सायंकाळी यावें पुन्हां । फिरोनियां माघारीं ।। २१ ।।

भोजनाची वेळ जाहली । म्हणोनि द्वारे बंद केली । कनवटीस किल्ली लाविली । तोही निघाला झडकरी ।। २२ ।।

परी पुजार्याला सर्व विनवीत । परिश्रम जाहले बहुत । उतरोनि चढण्याचें अंगात । त्राण नुरलें आमच्या ।।२३।।

कृपा करोनि आमुच्यावर । द्वारें उघडावीत लौकर । दर्शन घेऊनियां सत्वर । आम्ही निघूं तुझ्यासवें ।। २४ ।।

आम्हीही आलो लांबून । डोंगर चढतां गेलो थकून । दुपार जाहली, लागलें ऊन । भुकाही लागल्या आम्हांला ।। २५ ।।

तरी थोडी कळ सोसून । महाद्वार द्यावें उघडोन । श्रीकालिकेचें व्हावे दर्शन । त्याचीच भूक आम्हंला ।। २६ ।।

परि पुजारी गेला संतापून । कांहीं पायर्या गेला उतरोन । रागें म्हणे मी न उघडीन । महाद्वार या वेळी ।। २७ ।।

सर्व निराश होऊन पाहत । काय आहे देवीच्या मनांत । भक्त उभे राहिले दारांत । परि दर्शन घडेना तयांना ।।२८ ।।

जैसा पायर्या गेला उतरुन । तोंचि भुंगे आले गडावरून । पुजार्याभोंवती फिरून । चावूं लागले तयाला ।। २९ ।।

तसा धांवत फिरे माघारी । म्हणे माऊली, आवरी आवरी । अपराधाची क्षमा करी । उघडून देतों द्वार मी ।। ३० ।।

पुजार्याची उडतां गाळण । सर्व हसती पोटे धरून । तोंचि सांगे जानकी विनवून । भुंग्यांना ती तेधवां ।।३१ ।।

अरे ! तो उघडण्यास आहे तयार । तुम्ही न करावा प्रहार । बाजूस होऊनी सत्वर । मार्ग द्यावा तयाला ।। ३२ ।।

तैसे भुंगे गेले निघोन । महाद्वार दिलें उघडोन । सर्व जाती आनंदून । गाभार्यांत प्रवेशिती ।। ३३ ।।

कालिकेचें घेतां दर्शन । अतिप्रसन्न सुंदर छान । पूजनादि आरती करोन । नम्रभावें वंदिती ।। ३४ ।।

जानकी स्वकरांते पसरोन । उभी राहतां तत्क्षण । बर्फीचा पुडाआला निघोन । सर्व पाहती आश्चर्याने ।। ३५ ।।

म्हणे प्रसाद दिला देवीने । तुमचीं प्रसन्न पाहुनि मनें । आशिर्वादही दिला अंबेने । प्रसन्न होऊनी तुम्हांला ।। ३६ ।।

पुजारी होता पाहत । त्याला प्रसाद देऊनी करांत । सांगे संतुष्ट ठेवी सुभक्त । जे जे येतील दर्शना ।। ३७ ।।

भक्त जेव्हा संतोषतील । देवी तेव्हां प्रसन्न राहील । तुजवरी कृपाही करील । हट्ट मात्र करूं नये ।। ३८ ।।

पुजारी लागला चरणीं । आई क्षमा करावी म्हणुनी । पुन्हां ऐसा न वागेन जीवनीं । आण आज घेतसे ।। ३९ ।।

देवीदर्शनाने संतोषून । फराळादि सर्व उरकोन । सर्व फिरती परतोन । गड उतरावया लागले ।। ४० ।।

विनोदें गप्पा गोष्टी करीत । गडही होते उतरत । तोंचि कानावरी येत । एक डरकाळी वाघाची ।। ४१ ।।

कर्कष ऐकुनी डरकाळी । भयभीत झाली मंडळी । सर्व स्त्रीपुरुषांची उडाली । त्रेधा तेव्हां भयंकर ।। ४२ ।।

एकमेकां राहती बिलगून । तों व्याघ्र आला समोरून । कांहीं अंतरावर थांबून । पुनश्च डरकाळी फोडी तो ।। ४३ ।।

समोर वाघास पाहून । मुलांची उडे गाळण । सर्व उभे श्वास रोखून । भयभीत ऐशा नजरेने ।। ४४ ।।

तोंचि जानकी पुढें होऊन । वाघाजवळ जाऊन ।हात फिरवी अंगावरुन । म्हणे शांत व्हावें बच्चा तूं ।। ४५ ।।

तुझी इच्छा केली पूर्ण । आतां जावें परतोन । तोंचि नतमस्तक होऊन । व्याघ्र वंदन करीतसे ।। ४६ ।।

जानकीची आज्ञा ऐकून । ब्याघ्र गेला पळून । श्वास सुटकेचा सोडून । सर्व झाले जणूं सचेतन ।। ४७ ।।

थोडे होऊनियां शांत । घाम सर्वांगाचा पुसत । तशांत कोरड पडे मुखांत । पायही गेले गळून ।।४८ ।।

तेव्हा जानकी सांगे हसून । फुकाच गेलात घाबरुन । भेटावया आले देवीवाहन । प्रेमानें मजला तें ।। ४९ ।।

सर्व सांगती जानकीला । तुमचेपरीं न धैर्य आम्हांला । आमचा जीव असे घाबरला । प्रत्यक्ष पाहतां व्याघ्राला ।। ५० ।।

अति शोष पडतां तोंडांत । पाण्याचा शोध होते करीत । तों समोरून येतांना दिसत । एक सुंदर बालिका ।। ५१ ।।

कुमारिका गोरी सुंदर । आली नेसून रेशमी परकर । सस्मित आली समोर । करीं कलश घेऊनियां ।। ५२ ।।

म्हणे तुम्हांस पाहिजे पाणी । आणिलें मी कलश भरोंनी । थंडगार घ्यावे पिऊनी । देत असें मी तुम्हांला ।। ५३ ।।

सर्व होऊनियां हर्षित । पाणी पिऊनि झाले तृप्त । तैसी ती हंसत हंसत । निघून गेली बालिका ।। ५४ ।।

जैसी बालिका गेली निघोन । एकमेकां विचारती जाण । अरे ! ती कोण कोठली म्हणून । विचारलें नाही कोणीही ।। ५५ ।।

चांदीचा कलश आली घेऊन । चांदीच्या पेल्यानें पाणी पाजून । कोण आली जंगलामधून । भर प्रहरीं दुपारच्या ।। ५६ ।।

तेव्हां जानकी सांगे हंसून । ती कालिका होती म्हणून । तुम्हांस पाणी गेली पाजून । प्रत्यक्ष बालिकेच्या रूपानें ।। ५७ ।।

तुम्हास नाही हें कळले । परी मी होते ओळखिले । अप्रत्यक्षरित्या दर्शन घडविलें । महाकालिकेनें तुम्हांला ।। ५८ ।।

तरी आतां न करावी चिंता । सर्व भार टाका तिचे माथां । योगक्षेम पालनकर्ता । तीच एकटी जगांत ।। ५९ ।।

तीच उत्पन्न करीते भीति । तीच आहे सौख्यदात्री । याची प्रत्यक्ष आली प्रचीति । आज तुम्हांला सर्वांना ।। ६० ।।

सर्व गेले आनंदून । चैतन्य संचारलें देहांतून । भराभर गड उतरुन । गृहा गेले आपुल्या ।। ६१ ।।

आत्माराम खोपकर म्हणुनी । जानकी सुभक्त होते मनीं । प्रयत्न नोकरीचे कारणीं । करीत होते सर्वत्र ।। ६२ ।।

गरिबीची परिस्थिति म्हणून । त्यांत नोकरी नव्हती जाणून । धरिती जानकीचे चरण । मार्गदर्शन घ्यावया ।। ६३ ।।

जानकी तयांना सांगत । फोटोग्राफी शिकावी त्वरित । उज्ज्वल यश आहे दैवांत । त्यांत कीर्ति मिळेल ।। ६४ ।।

परि कॅमेरा घ्यावया विकत । पैसेही नव्हते हातांत । उसन्या पैशानें घेत । विश्वास ठेवूनी शब्दावरी ।। ६५ ।।

ऐसा तो घेऊनिया विकत । कलाही ती केली हस्तगत । तें दैव त्यांचे उघडत । नोकरी लाभली सरकारी ।। ६६ ।।

महाराष्ट्र सरकारांत । फोटोग्राफीचे खात्यांत । प्रमुख जागेवरी लाभत । उत्तम नोकरी तयांना ।। ६७ ।।

त्यांचें कार्य पाहुनी चांगलें । बढती मिळोन वर चढले । गौरवास पात्र झाले । यश, कीर्ति मिळवोनि ।। ६८ ।।

असो, एकदां मुंबईत बंदरांत । माल जाहाजामधून उतरत । कळे न कैसा त्यांच्यात । स्फोट जाहला सकाळीं ।। ६९ ।।

सर्व मुंबई गेली हादरुन । लोक पळती जीव घेऊन । वाटे बॉंब फुटला कोठुन । हलकल्लोळ माजला ।। ७० ।।

सोन्याच्या विटा होत्या बोटीत । त्याही इतस्तत: उडत । कांहीं घरें हादर्यानें पडत । आगी लागल्या बंदरांत ।। ७१ ।।

त्यांत बातमी आली कानीं । दुसराही स्फोट होईल म्हणूनि । वाटे बंदरची फुटोनी । पाणी शिरेल शहरांत ।। ७२ ।।

परी फोटोग्राफर म्हणूनि । खोपकर धांवती तत्क्षणीं । बंदरावरती जाऊनि । फोटो काढती जहाजाचा ।। ७३ ।।

जहाज पेटलें दूर समुद्रांत । तरी भीतिही होती मनांत । परि कर्तव्या न चुकत । फोटो घेती घटनेचा ।। ७४ ।।

ते फोटो असतां घेत । दुसरा स्फोट तेव्हांच होत । भीतीने त्रेधा उडत । आवाजाने भयंकर ।। ७५ ।।

पाणी उडे उंचावरती । आगीचे लोळही पसरती । रंग आकाशांत दिसती । लाल लाल भयंकर ।। ७६ ।।

विटा उडती बोटीतुन । त्या अंगावर येतां पाहून । सांभाळ जानकी म्हणून । डोळे मिटून बैसले ।। ७७ ।।

तरीही वीट गेली चाटून । खोपकरांचे खांद्यावरुन । परि दुखापत न झाली म्हणून । उपकार मानिती जानकीचे ।। ७८ ।।

ऐसे वाचतां संकटांतून । गणदेवीस जाती दर्शना लागुन । नवजीवन दिधलें म्हणून । लोटांगण घालिती जानकीला ।। ७९ ।।

सांगती सर्व अद्भुत कहाणी । कैसा वाचलों स्फोटांतुनी । तुझ्या नांवाची अगाध करणी । कृपा आई केलीस तूं ।। ८० ।।

तेव्हां जानकी सांगे हंसून । अरे ! तुझे दु:ख झेलून । तेथें प्रत्यक्ष मी येऊन । डाव्या खांद्यावरी घेतलें मी ।। ८१ ।।

डावा खांदा दाखविती उघडोन । तो विटेचा ठसा आला दिसोन । वाटे खोल वैसलास रुतून । पाठीवरी तियेच्या ।। ८२ ।।

ठसा पाहतां पाठीवरी । सर्व अश्चर्य पावले मनांतरी । काळजी वाहशी कितीतरी । सुभक्तांची तूं आपल्या ।। ८३ ।।

खोपकरासी आले गहिंवरून । आपुलें मरण घेतलें ओढून । अश्रुजलातें शिंपून । चरण धुतले जानकीचे ।। ८४ ।।

जय जानकी आई म्हणोनि । आपुल्या बाळास सांभाळोनि । धन्य केलेस या जीवनी । कृपा अपार केलीस ।। ८५ ।।

पाहुनि फोटोचे नैपुण्य । कौतुकासी पात्र होती म्हणून । अनेक बक्षिसें मिळवून । धन-प्रतिष्ठा पावले ।। ८६ ।।

कुसुमताई सुळे म्हणून । एक नास्तिक बाई जाण । दैववादावर विश्वासून । राहत असे आपुल्या ।। ८७ ।।

विश्वास नव्हता देवावर । म्हणे दैव असतां बलवत्तर । सौख्य लाभे जीवनभर । देव न कांहीं करूं शके ।। ८८ ।।

तिज अपत्यें होती दोन । एक मुलगा दुजी कन्या जाण । ऑपरेशन घेतलें करवून । प्रपंच नको म्हणूनियां ।। ८९ ।।

वाटे आहे सुखी जीवन । तोंचि अपघात आला घडून । त्यांत मुलगा पावला मरण । आकाश कोसळलें तिचेवरी ।। ९० ।।

पुत्र-वियोग न साहून । कुसुम जाहली बेचैन । परी उपाय काहीं म्हणून । निश्चित नव्हता तिजपुढें ।। ९१ ।।

तिची पाहुनियां दु:खस्थिति । कुणास उपजली सन्मति । म्हणे जानकीची होता उपस्थिती । मार्ग कांही सापडेल ।। ९२ ।।

म्हणोनियां तिज विचारिती । तेव्हां कुसुम देई संमती । पुत्रवियोगाची आपत्ति । साहूं न शके माऊली ।। ९३ ।।

जोंवरी न कोसळे आपत्ति । तोंवरी न कळेल महती । देवाची होईलही स्मृति । मनुष्यास तेधवां ।। ९४ ।।

जानकीचे लागतां चरणी । म्हणे तूं आलीस पुत्रकांक्षेनी । परि गर्भाशय घेतला काढोनी । काय सांग मी करुं शकें ।। ९५ ।।

पूर्वी न केलास विचार । मग दैवांत कोठूनि येणार । परि विश्वसितां मजवर । प्रयत्न पाहीन करोनी ।। ९६ ।।

पुत्रप्रेमाच्या कांक्षेनें । कुसुम सांगते नम्रपणे । आपण जें सांगाल तें यत्नें । भक्तिभावें करिन मी ।। ९७ ।।

उपासना सांगतां तिजला । काहीं महिने करावयाला । गर्भाशय कीं उत्पन्न झाला । पोटामाझी तियेच्या ।। ९८ ।।

डॉक्टर पाहती तपासून । तों गर्भाशय आला दिसून । पुत्रकांक्षेची फिरुन । आशा उत्पन्न जाहली ।। ९९ ।।

तेव्हां निष्ठेनें वैसोनि चरणीं । म्हणे आई तुझी अगाध करणी । आतां पुत्र द्यावा फिरूनी । ओटीमध्ये माझिया ।। १०० ।।

तेव्हां जानकी देई हंसून । एक श्रीफल ओटीतुन । म्हणे पुत्र दिला औक्षवान । चिंता न करावी मुळींच ।। १०१ ।।

पुढें विश्वासुनी सेवा केली । तों कुसुम गर्भवती झाली । सुपुत्रवती ती झाली ।। १०२ ।।

अभक्त झाली सुभक्त । वरी कृपाछत्राखालीं येत । जानकीचे असंख्य भक्त । कृतार्थ जाहले जीवनीं ।। १०३ ।।

म्हणोनियां श्रोतेजन । तुम्हांस दिले ओंजळ भरून । जानकीचे मधुजीवन । तृष्णा-तृप्ती करावया ।। १०४ ।।

संतुष्ट तुम्ही व्हावें म्हणून । धरून बैसलों श्रीचरण । कीं स्फूर्ति द्यावी उतरोन । जानकीजीवन वर्णावया ।। १०५ ।।

तैसेंच जानकीच्याही । चरणीं । माथा ठेवुनी मनोमनीं । जीवन प्रकट करावें म्हणोनि । वारंवार प्रार्थितसे ।। १०६ ।।

तेव्हां जानकी सांगे हंसोनि । तुझ्या लेखणींत उतरोनि । मी प्रकट जाहलें भुवनीं । वाड़मयमूर्ति म्हणोनियां ।। १०७ ।।

जया आवडेल माझी भक्ति त्यांने वाचावी ही सप्तशती । मी नित्य राहीन सांगाती । सुभक्ताजवळ माझिया ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम सप्तमोऽध्याय: ।
श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु ।
शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*