जानकीच्या घरच्या कोनाड्यात साक्षात कल्पतरु नांदू लागला. हवी असलेली वस्तू त्या कोनाड्यात मिळत असे. एकदा कोनाड्यातला नारळ पाहून दादा कृद्ध झाले. त्यांनी नारळ फेकून दिला. पुन्हा पाहतात तर दुसरा नारळ तिथे दिसला. तो ही फेकला तर तिसरा, चवथा, पाचवा असा बघता बघता नारळांचा ढीग जमला. दादांनी जानकीपुढे शरणागती पत्करली. नारळ मोजून पाहिले तर बरोबर एक हजार होते. दादांनी जानकीची क्षमा मागितली आणि आदिशक्तीला वंदन केले.

जानकी आता दीन-दु:खितांचे अश्रू पुसू लागली. ती सुशिक्षित नव्हती तरी तिला सर्व भाषा अवगत होत्या. ओव्या, भजने, अभंग हे ती नित्यनियमाने गात असे. देवी-देवतांची सुंदर वर्णनपर गीते जानकी झोपाळ्यावर बसून जेव्हा गात असे त्यावेळी तिथे उपस्थित असणार्‍यांना तिच्या जागी प्रत्यक्ष दुर्गा भवानी दिसत असे. तिची नखशिखांत सुंदरता, भव्यता आणि तेज पाहून डोळे दिपून जात.

एकदा गणदेवी गावात प्लेगची साथ आली. पटापट माणसे मृत्युमुखी पडू लागली. सगळीकडे आकांत पसरला. गाव खाली करुन माणसे जंगलात पळू लागली. जानकीने स्वत: गावात फिरुन रोग्यांची सेवा केली. आपले सर्व सामर्थ्य पणाला लावून रोगाचे उच्चाटन केले. शिर्डीच्या साईबाबांप्रमाणेच रोगाला सीमेवर रोखले.

आता लोक जानकीचा जयजयकार करु लागले. अनेकांना जीवनदान मिळाले. मुखाने ओव्या गात जानकीने गोष्टी सांगत सांगत अनेक साधुसंतांची दर्शने घडवली. ज्याला सर्वत्र ईश्वर दिसतो तो कधी प्रेमात अंतर करीत नाही. त्याला मनुष्य, पशु, पक्षी, प्राणी सर्व सारखेच असतात. जानकी आईही अशीच परमेश्वर स्वरुप साध्वी होती. तिने कळत नकळत असंख्य चमत्कार केले. आपल्यातील दिव्यत्वाची प्रचिती दिली आणि या सिद्धिचा उपयोग मात्र सदैव जनकल्याणार्थ केला.

जानकी आईने १९४६ साली चैत्र नवमीला, रामनवमीच्या शुभदिनी भरदुपारी कैलासगमन गेले. ही तिथी आणि वेळ तिने एक वर्षभर आधीच पंचांगात लिहून ठेवली होती. आज जानकी आई जरी देहाने आपल्यात नसली तरी ती चराचरात वास्तव्य करुन आहे. तिचा कृपा कटाक्ष भक्तांवर सदैव आहे आणि त्याची प्रचिती वेळोवेळी येतच असते.

जानकी आईचे पद्यरुपी जीवनचरित्र म्हणजेच “सावली” ही पोथी आपल्याला सदैव प्रेमाची सावली देतच असते.